DIY सौंदर्य

मांड्या घासल्याने होत आहे जळजळ, तर करा सोपा उपाय

Dipali Naphade  |  Feb 7, 2022
how-to-get-rid-of-chaffing-on-fatty-thighs-while-walking

बऱ्याचदा लेगिंग्ज आणि शॉर्ट्स घातल्यानंतर त्वचेवर रेडनेस आणि रॅशेस येतात. विशेषतः मांडीवर मांडी घासल्याने हा त्रास अधिक उद्भवतो. इतकंच नाही तर मांड्या घासल्याने त्वचेवर जळजळदेखील निर्माण होते. अधिक घाम आल्यास, मांड्यावर मांड्या घासल्या जातात. यामुळे त्वचेवर रॅशेस येणे, खाज येणे आणि अत्यंत त्रासदायक असे इरिटेशन होत राहते. तुम्हालादेखील असा त्रास असेल तर तुम्ही वेळीच काही सोपे उपाय जाणून घ्या. यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. मांड्या घासल्याने होणारी जळजळ थांबविण्यासाठी काही सोपे उपाय जाणून घेऊया. 

व्यायामानंतर करा मांड्या स्वच्छ 

मांड्या या मुख्यत्वे घामामुळे अधिक घासल्या जातात आणि त्रास होतो. व्यायाम केल्यानंतर खूप घाम येतो. त्यामुळे व्यायाम केल्यानंतर आपण अंग साफ करतो त्याप्रमाणे सर्वप्रथम तुम्ही मांड्या स्वच्छ टॉवेलने पुसून घ्याव्यात. यामुळे तुम्हाला मांड्या घासण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. तसंच लेगिंग्ज अथवा टाईट कपडे व्यायामानंतर घालू नयेत. व्यायाम करून झाल्यानंतर आंघोळ करून घ्या. जेणेकरून मांड्यांवर घाम जमून राहणार नाही. त्यामुळे मांड्यांनाही त्रास होणार नाही.  

कपड्यांचा वापर

बऱ्याचदा कपड्यांमुळे मांड्यांवर मांड्या घासल्या जातात. काही जणांना सॅटिन अथवा सिल्क कपडा सहन होत नाही आणि यामुळे मांड्यांवर रॅश येतात. पॉलिस्टर अतवा स्पॅनडेक्स असे मिक्स कपडे असतील तर बरेचदा मांड्यांवर मांड्या घासून अधिक त्रास होतो. यामुळे रेडनेसची समस्या अधिक दिसून येते. कपडे तुम्ही नेहमी सैलसर घाला. जेणेकरून तुम्हाला हा त्रास सतत होणार नाही. तुम्हाला नेहमी कपड्यांमुळे हा त्रास होत असेल तर घट्ट कपड्यांचा वापर करणे टाळा. 

व्हॅसलिनचा करा वापर

वर्कआऊट करण्याच्या आधी तुम्ही मांड्यांर व्हॅसलिन लावा. याचा तुम्हाला फायदा मिळतो. व्हॅसलिन लावल्यामुळे त्वचा घासली जात नाही आणि त्वचा काळीही पडत नाही. तसंच यामुळे लालसरपणा अथवा खाजही येत नाही. त्वचेला अधिक चांगले ठेवण्याचे काम व्हॅसलिन करते. व्हॅसलिन लावल्यामुळे घामाचा त्रास होत नाही. तसंच मांड्यांवर मांड्या घासल्या जात नाहीत. 

त्वचा कोरडी ठेवा 

मांड्यांजवळ सतत घाम येत असतो आणि यामुळे त्वचा रगडून त्याची जळजळ होते. लक्षात ठेवा की, तुमच्या मांडीचा भाग हा सुका अर्थात कोरडा राहायला हवा. जेव्हा तुम्ही स्कर्ट, शॉर्ट घालणार असाल तेव्हा तुमची मांडी ही कोरडी राहायला हवी अन्यथा मांडीवर मांडी घासून अधिक जळजळ होण्याची शक्यता असते. असे लहान कपडे घालण्यापूर्वी तुम्ही मांडीला पावडरही लाऊन घेऊ शकता. यामुळे घामापासून काही काळ तुम्हाला दूर राहाता येते आणि मांडी घासली गेली तरीही त्याचा त्रास होत नाही. 

अधिक पाणी प्या 

जास्त पाणी पिण्यामुळे तुम्हाला चमकदार त्वचा तर मिळतेच. पण त्याबरोबरच मांड्याचा लालसरपणा आणि जळजळ कमी करण्यासाठीही याची मदत होते. रोज दिवसातून कमीत कमी 8-10 ग्लास पाणी पोटात जायला हवे. पाणी पिण्यामुळे त्वचा हायड्रेट राहाते. तसंच त्वचेचा मुलायमपणाही टिकून राहातो. यामुळे त्वचा रगडली गेली तरीही त्रास होत नाही. 

स्वच्छतेकडे लक्ष द्या 

बरेचदा अंडरवेअर स्वच्छ नसेल अथवा काही कारणाने एक – दोन दिवस तीच अंडरवेअर घातली तर ही समस्या नक्कीच होते. त्वचेच्या या समस्येपासून वाचण्यासाठी नेहमी स्वच्छ अंडरवेअरच परिधान करा. घाणेरड्या चड्डीमुळे घाम आणि घाण दोन्ही जमा होते आणि यामुळे मांड्यांनाही त्रास होते. याशिवाय व्हजायनल स्वच्छताही राहात नाही. त्वचेवर लालसरपणा आणि जळजळ सुरू होते. त्यामुळे तुम्ही स्वच्छता ही पाळायलाच हवी. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य