बटाटा न आवडणारी माणसं फार थोडीच असतील.लहान मुलांनाही बटाट्याची भाजी प्रचंड आवडते. प्रवासाला नेण्यासाठी बटाट्याच्या काचऱ्या असोत की श्रीखंड पुरीचा बेत असताना मस्त उकडलेल्या बटाट्याची भाजी असो, चटपटीत बटाटेवडे असोत की बटाट्याची भाजी! आपल्याला एकूणच बटाटा प्रचंड आवडतो. एखादी भाजी कमी पडतेय असं वाटतं तेव्हा आपण त्यात बटाटा घालून भाजीची क्वांटिटी वाढवतो. डोसा चटणी असो की साबुदाणा खिचडी ,आपल्याला त्यासाठी बटाटा लागतोच. आता तर क्वान्टिनेन्टल क्विझिनसाठी सुद्धा बटाटे लागतात. एकवेळ घरात कुठली भाजी नसेल तर आपण कांदा बटाट्याचा रस्सा करून वेळ मारून नेतो. म्हणजेच थोडक्यात आठवड्याची भाजी आणताना त्यात कांदे व बटाटे बाय डिफॉल्ट आणले जातात.
बटाट्यातही असतात पोषणमूल्ये
लोकांनी कितीही नावं ठेवली तरी बटाटे हा फायबरचा उत्तम स्त्रोत आहेत. बटाट्यामध्ये पोटॅशियम, बी जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन ए, जस्त, लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स सारखी खनिजे देखील असतात. जर बटाट्याची साले काढून टाकली नाहीत तर त्यातून सी व्हिटॅमिन देखील मिळते.बाजारात मिळणाऱ्या बटाट्यांवर हानिकारक कीटनाशके फवारलेली असतात. त्यामुळे आपण आपल्या अंगणातच बटाटे लावणे, ही काही कठीण गोष्ट नाही. यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला कीटकनाशकांशिवाय पिकवले गेलेले बटाटे खाऊ घालू शकता.
अधिक वाचा – झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त आणि सोप्या टिप्स
बटाट्याची लागवड कशी करायची
बटाट्याचे बोटॅनिकल नाव हे सोलनम ट्युबरोजम असे आहे. बटाट्याची लागवड करणे सोपे आहे कारण ते वाढवण्यास सोपे आहेत. ते विविध प्रकारच्या मातीत वाढू शकतात. त्यांना पाणीही जास्त लागत नाही. तसेच ते सिझनल नसल्याने तुम्ही ते वर्षभरात केव्हाही लावू शकता. बटाटा अगदी थोड्याश्या जागेतही लावता येतो, त्यासाठी मोठ्या जागेची गरज नसते. ते आपण एखाद्या कंटेनरमध्येही लावू शकतो. कंटेनरमध्ये बटाटे लावल्याने त्यांचे रोग व कीड यांपासून रक्षण होते. तसेच जागाही वाचते. बटाटे जमिनीच्या आत वाढतात. त्यामुळे कंटेनरची निवड करताना ते खोल, मोठे व मजबूत असायला हवे. बटाट्याचे रोप चांगले वाढण्यासाठी किमान दहा लिटरचे कंटेनर असायला हवे. तसेच कंटेनरला ड्रेनेजसाठी छिद्रे करून घ्या. कारण बटाटे मातीच्या आत वाढतात. जर ते बराच काळ पाण्यात राहिले तर ते कुजतात. म्हणून आपण जेव्हा झाडाला पाणी घालतो तेव्हा ते त्या छिद्रांतून बाहेर पडणे आवश्यक आहे. कंटेनरमध्ये माती घालताना त्यात थोडे कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खत मिसळले तर झाडाची वाढ अधिक चांगली होते.
बटाटे लावताना आधी कंटेनरच्या तळाशी लहान दगड घाला आणि त्यावर माती घालण्यास सुरुवात करा. बटाट्याची ऍसिडिक माती चांगली. तसेच त्यात कॅल्शियमचे प्रमाण देखील चांगले असायला हवे. साधारण पंधरा सेंटीमीटर इतकी माती घातल्यानंतर ती हलक्या हाताने दाबून घ्या व त्यात बटाट्याचा कोंब आलेला कंद ठेवा. कोबी हा वरच्या दिशेने असायला हवा. एका कंटेनरमध्ये तीन ते चारच कंद लावा. व वरून साधारण दहा ते पंधरा सेंटीमीटर माती घाला. माती ही थोडीशी ओलसर असावी. नंतर हे कंटेनर सावली असलेल्या भागात ठेवा. व रोज त्यांना थोडे थोडे पाणी घाला. बटाट्यांना अंकुर फुटला कि मग हे कंटेनर सूर्यप्रकाशात हलवा. साधारण साठ ते नव्वद दिवसांत आपल्या बटाट्याची वाढ होईल. फक्त वाढ होताना त्याला बुरशी किंवा कीड लागणार नाही याची काळजी घ्या.
अशा रीतीने जर तुम्हाला बागकामाची आवड असेल तर तुम्ही घरीच बटाट्याची लागवड करण्याचा प्रयोग करू शकता.
अधिक वाचा – या कारणासाठी प्रत्येकाने करायला हवं गार्डनिंग, आरोग्य राहते ठणठणीत
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक