पावसाळ्यात किचनमधील साहित्य लवकर खराब होतं. यासाठीच किचनमध्ये स्वयंपाकाचे साहित्य साठवताना विशेष काळजी घ्यायला हवी. विशेषतः पावसाळ्यात साखरेला तर अगदी पाणीच सुटतं ज्यामुळे या दिवसांमध्ये साखर लवकर खराब होते. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेचा परिणाम साखरेवर होतो. साखरेला पाणी सुटू लागलं की डब्यात असूनही साखरेला मुंग्या लागतात. यासाठीच पावसाळ्यात साखर नीट साठवून ठेवायला हवी. जाणून घ्या यासाठी काही स्पेशल टिप्स ज्यामुळे पावसाळ्यातही तुमच्या किचनमधली साखर राहिल कोरडी आणि स्वच्छ…
साखर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा
किचनमध्ये स्वयंपाकासाठी लागणारी साखर भरून ठेवण्यासाठी बऱ्याचदा प्लास्टिक अथवा स्टीलचे डबे वापरले जातात. मात्र पावसाळ्याच्या काळात साखर नेहमी काचेच्या बरणीत भरून ठेवणे तुमच्या सोयीचे ठरेल. कारण प्लास्टिक अथवा स्टीलच्या डब्यामध्ये बाहेरील उबदार वातावरणामुळे ओलसरपणा येऊ शकतो. मात्र काचेच्या बरणीला त्या मानाने ओलसरपणा नक्कीच कमी येतो ज्यामुळे तुमच्या घरातील साखर कोरडी राहिल.
साखर काढण्यासाठी कोरडा चमचा वापरा
साखरेच्या बरणीत नेहमी एखादा मापाचा चमचा असतो. कारण त्या मापानुसार चहा करताना अथवा गोडाचे पदार्थ करताना साखर वापरली जाते. मात्र लक्षात ठेवा हा चमचा कोरडा असायला हवा. चुकूनही जर चमचा ओला अथवा दमट असेल तर त्यामुळे तुमची पूर्ण बरणीतील साखर खराब होऊ शकते.
साखरेत तांदळाचे दाणे टाका
जरी तुम्ही प्लास्टिक अथवा स्टीलच्या डब्यातून काचेच्या बरणीत साखर काढून ठेवली तरी जर ती आधीच ओलसर असेल तर त्यामुळे ती काचेच्या बरणीतही खराब होऊ शकते. यासाठी साखर बरणीत काढून ठेवण्यापूर्वीच साखरेत काही तांदळाचे दाणे टाका. तांदळाचे दाणे तुमच्या साखरेतील सर्व आर्द्रता शोषून घेते. ज्यामुळे साखर लवकर खराब होत नाही.
लवंग साखरेत ठेवा
साखर पावसाळ्यात कोरडी ठेवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे साखरेमध्ये काही लवंगा टाकून ठेवणे. फार पूर्वापासून पावसाळ्यात साखर टिकवण्यासाठी हा उपाय वापरला जातो. साखरेत लवंग ठेवल्यामुळे साखरेला एक छान सुंगध येतो. शिवाय यामुळे साखर विरघळत तर नाहीच उलट साखरेला मुंग्याही येत नाहीत.
साखरेत टुथपिक ठेवा
साखरेत टुथपिक ठेवणे हा उपाय ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. पण काळजी करू नका कारण लाकडाच्या टुथपिकमुळे तुमच्या साखरेमधील ओलावा निघून जाईल. शिवाय साखरेमधून टुथपिक बाजूला काढणं तुम्हाला खूपच सोपं जाईल. पावसाळ्यात साखर टिकवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
झाकणाला टिश्यू पेपर लावा
साखर बरणीत ओतण्यानंतर ती वातावरणामुळे खराब होऊ नये यासाठी हा एक चांगला उपाय आहे. साखर बरणीत भरल्यावर वरून झाकणाच्या खाली एक टिश्यू पेपर लावून ठेवा. ज्यामुळे वातावरणातील ओलावा सर्वात आधी टिश्यू पेपरला लागेल. ज्यामुळे तो ओला अथवा दमट होईल आणि साखर खराब होणार नाही. टिश्यू पेपर ओलसर झाल्यावर तो लगेच बदला ज्यामुळे साखर खराब होणं वाचवता येईल.
आम्ही दिलेल्या या किचन टिप्स तुम्ही फॉलो केल्या का आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा. यासोबतच शेअर करा तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर माहिती आणि टिप्स जाणून घ्यायच्या आहेत.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
स्वयंपाकघरासाठी असे निवडा परफेक्ट स्टोरेज कंटेनर
किचन एक्सपर्ट बनण्याआधी लक्षात घ्या या 10 गोष्टी