कोणताही करी असो वा असो भाजी त्यात नेहमीपेक्षा वेगळेपणा आणण्यासाठी फक्त एकाच मॅजिकची गरज असते. तो चटकदार म्हणजे मॅगी मॅजिक मसाला…. ज्यांना हे सिक्रेट माहीत असतं ते त्यांच्या स्वयंपाकात मॅगी मसाला नक्कीच वापरतात. पण यासाठी तुम्हाला बाजारातील तयार मॅगी मसाला वापरण्याची मुळीच गरज नाही. कारण तुम्ही तुमच्या घरी स्वतःच हा मॅगी मसाला बनवू शकता. तुमच्या नेहमीच्या रेसिपीत इतर साहित्यासोबत चमचाभर मॅगी मसाला टाकला तरी तुमचा पदार्थ सर्वात हटके आणि चमचमीत होऊ शकतो. यासाठीच जाणून घ्या मॅगी मसाला घरी कसा बनवावा.
फक्त नूडल्स नाही मॅगीपासून बनवा वेगवेगळ्या डिशेस
मॅगी मसाला बनवण्याचे साहित्य आणि कृती-
मॅगी मसाल्यामध्ये विविध प्रकारचे गरम मसाले असतात. ज्यामुळे या मसाल्याला एक वेगळाच स्वाद येतो.
मॅगी मसाल्यासाठी लागणारे साहित्य –
- चार चमचे कांद्याची पावडर (कांदा उन्हात वाळवून त्याची पावडर करा)
- चार चमचे लसणाची पावडर (लसूण उन्हात वाळवून त्याची पावडर करा)
- दोन चमचे कॉर्न फ्लोर
- दोन चमचे आमचूर पावडर
- एक चमचा पिठीसाखर
- दीड चमचा सुंठ
- एक चमचा हळद
- दोन चमचे जिरे पावडर
- तीन चमचे काळीमिरी पावडर
- एक चमचा मेथी पावडर
- तीन ते चार चमचे लाल तिखट
- दोन चमचे धणे पावडर
- दोन चमचे तेजपत्ता पावडर
- दोन चमचे मीठ
मालवणी मसाला रेसिपी मराठी (Malvani Masala Recipe In Marathi)
मॅगी मसाला बनवण्याची कृती –
जर तुमच्याकडे वरील सर्व मसाले अख्खे म्हणजेच न वाटलेल्या स्वरूपात असतील जसं की तेजपत्ता, मेथी, लाल मिरची, काळीमिरी उन्हात वाळवा आणि तव्यावर गरम करून नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या. वाटलेला मसाला चाळणीने गाळून घ्या. आधीच पावडर स्वरूपात मसाले तयार असतील तर ते फक्त मिक्स करा. तुमचा मॅगी मसाला तयार आहे एखाद्या हवाबंद डब्ब्यात तो भरून ठेवा आणि स्वयंपाकासाठी वापरा. मॅगी मसाला बनवल्यानंतर तुम्ही तो कमीत कमी एक महिना वापरू शकता. पदार्थांना चांगला स्वाद येण्यासाठी महिन्यातून एकदा असा मॅगी मसाला घरी बनवून ठेवा. जर यामध्ये कांदा आणि लसूण वाळवून त्याची पावडर करायला वेळ नसेल तर हे दोन घटक वगळा आणि पदार्थ बनवताना कांदालसणाची तयार पेस्ट वापरा.