DIY लाईफ हॅक्स

हातात गेला असेल बारीक काटा तर अशा प्रकारे काढता येईल

Vaidehi Raje  |  May 25, 2022
How To Remove Splinter

स्प्लिंटर्स, ज्यांना लाकडाचे तूस किंवा काटे देखील म्हणतात, हे लाकडाचे तुकडे आहेत जे त्वचेमध्ये पंक्चर करू शकतात आणि तुमच्या त्वचेत अडकू शकतात. हातात किंवा पायात काटा जाणे किंवा तूस जाणे खूप सामान्य आहे परंतु ते खूप वेदनादायक आहेत. लहान मुले खेळताना किंवा मोठी माणसे जर जुन्या लाकडाच्या वस्तू उचलून ठेवत असतील तर त्यावेळी हातात काटा किंवा तूस जाऊ शकते. बहुतांश वेळी असे होणे फार गंभीर नसते. आपण घरी काटा सुरक्षितपणे घरीच काढू शकतो.. परंतु काही वेळा हातात तूस गेलेले कळत नाही किंवा ते बाहेर निघत नाही जेव्हा तिथे जखम होते व त्यामध्ये इन्फेक्शन होते आणि मग ती एक गंभीर बाब बनते. अशा वेळी आपण ते घरी काढू शकत नाही. त्यात पस होतो, जखम खोलवर जाते. अशावेळी आपल्याला डॉक्टरांना भेटावे लागते. योग्य वेळी तूस काढून टाकले नाही तर मग त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊन जखम गंभीर रूप धारण करू शकते. तर आज आपण बघूया स्प्लिंटर किंवा काटा कसा काढायचा आणि वैद्यकीय मदत कधी घ्यायची. 

हातात काटा किंवा तूस गेल्यावर काय करावे 

हातात किंवा पायात किंवा जिथे कुठे काटा टोचला आहे ते प्रभावित क्षेत्र कोमट पाणी व साबणाने धुणे महत्वाचे आहे. हे संसर्ग टाळण्यास मदत करेल, कारण स्प्लिंटर ही तांत्रिकदृष्ट्या एक उघडी जखम आहे ज्यात पटकन संसर्ग होऊ शकतो. काटा काढण्यापूर्वी नेहमी काळजीपूर्वक बघा की तो तुमच्या त्वचेत कसा घुसला आहे, तो कोणत्या दिशेने टोचला आहे आणि त्याचा कोणताही भाग तुमच्या त्वचेच्या आत शिरला आहे का हे सर्व व्यवस्थित उजेडात बघा. तुमच्याकडे भिंग असेल तर तुम्हाला हे सगळे व्यवस्थित दिसू शकेल. भरपूर उजेड आणि भिंगाच्या मदतीने तुम्हाला काटा अधिक चांगल्या प्रकारे दिसू शकेल. काटा किंवा तूस हे दाबून बाहेर काढण्याचा कधीही प्रयत्न करू नका. यामुळे त्याचे लहान तुकडे होऊ शकतात आणि ते काढणे अधिक कठीण होऊ शकते.

How To Remove Splinter

काटा काढण्याची पद्धत – 1 

काटा पूर्णपणे काढून टाकण्यासाठी चिमटा वापरणे ही पद्धत सर्वोत्तम आहे.  जेव्हा तुमच्या त्वचेच्या बाहेर असतूस किंवा काट्याचा एक भाग त्वचेच्या बाहेर असतो तेव्हा तो चिमटीच्या मदतीने ओढून काढणे सोपे आहे. यासाठी चिमटा, रबिंग अल्कोहोल (स्पिरिट) आणि कापसाचे बोळे घ्या. कापसाच्या बोळ्याला स्पिरिट लावा व चिमटा निर्जंतुक करून घ्या. नंतर काट्याचा जो भाग बाहेर आहे तो पकडण्यासाठी चिमटा वापरा. काटा आत गेलाय त्याच दिशेने तो बाहेर ओढून काढा.

काटा काढण्याची पद्धत – 2 

जेव्हा काटा किंवा तूस पूर्णपणे तुमच्या त्वचेत आत शिरलेले असते तेव्हा ही पद्धत वापरा. यासाठी लहान सुई, चिमटा, स्पिरिट आणि कापसाच्या बोळ्याची आवश्यकता आहे. कापसाच्या बोळ्याला स्पिरिट लावून सुई आणि चिमटे निर्जंतुक करा. जिथे दुखापत झाली आहे ती त्वचा सुईच्या मदतीने हळूवारपणे उचला जेणेकरून तुम्ही काट्यापर्यंत पोहोचू शकाल. एकदा तुम्हाला काटा दिसला की बाहेर काढण्यासाठी चिमटा वापरा.

How To Remove Splinter

स्प्लिंटर खूप मोठे किंवा खोल असल्यास किंवा तुमच्या डोळ्यात किंवा डोळ्याजवळ ते स्वतः घरी काढण्याचा प्रयत्न करू नका. तसेच जर तुम्हाला शंका असेल की तुमच्या जखमेत संसर्ग झाला आहे, आणि तुम्हाला त्या भागात सूज, लालसरपणा, तीव्र वेदना जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा. डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी जखमेवर मलमपट्टी करा आणि त्यातून रक्तस्त्राव होत असल्यास तो थांबवण्याचा प्रयत्न करा.

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स