लाईफस्टाईल

दिवाळीला होणारा अति खर्च टाळण्यासाठी टिप्स

Aaditi Datar  |  Nov 2, 2021
दिवाळीला होणारा अति खर्च टाळण्यासाठी टिप्स

दिवाळी सुरू झाली आहे. दिवाळी हा एक असा सण आहे जेव्हा संपूर्ण भारतात उत्साह आणि आनंदाचं वातावरण असतं. खरंतर दिवाळीच्या निमित्ताने आवर्जून कुटुंबियांना आणि नातलगांना भेटवस्तू दिल्या जातात. भारतात सण म्हटल्यावर नवीन खरेदीही आलीच. एवढंच नाहीतर सणावाराल नवीन खरेदी करणं हे आपल्याकडे शुभ मानलं जातं. काही जण वर्षभर या सणाची वाट पाहतात आणि या सणाच्या वेळीच खरेदी करतात. त्यामुळे दिवाळीच्या काळात अनेक सेल आणि खरेदीवर जबरदस्त सूटही दुकानदार आणि ऑनलाईन शॉपिंगवर असते. जे पाहून आपल्याकडून नकळत का होईना अति खर्च होतो. आपण विचार करतो की, जाऊदे सणवार आहे तर कुठे काटकसर करा आणि सुरू होतो नाहक खर्च. पण अशावेळी समजूतदारपणे खरेदी करणं आवश्यक आहे. कारण उगाच सणाच्या नादात आपल्या बजेटवर ताण नको पडायला. त्यासाठीच वाचा या सोप्या आणि स्मार्ट टिप्स ज्याने तुमची दिवाळी होईल आनंदी आणि मिळतील खऱ्या अर्थाने दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

सर्वात आधी बजेट बनवा

सणवार आहे म्हणून कसाही खर्च झाला, हे काही योग्य नाही. त्यामुळे सर्वात आधी बजेट बनवून घ्या. कोणाकोणाला काय गिफ्ट द्यायचं आहे त्याची लिस्ट बनवून घ्या. तुम्ही सण आहे म्हणून किती जास्तीचा खर्च करू शकता याचा अंदाज घ्या. तज्ज्ञांनुसार बजेट बनवल्याने तुम्हाला तुमच्या खर्चाची सीमा कळते आणि किती खर्च करू शकता हेही कळते. बजेट बनवल्यावर आपसूकच पैशांवर आणि खर्चांवर नियंत्रण येते. त्यामुळे या दिवाळीसाठी सर्वात आधी बजेट बनवून घ्या. ज्यामुळे अधिकचा खर्च होणं टाळता येईल. ज्यामुळे लक्ष्मी देवीकडून आशिर्वाद स्वरूपात खऱ्या अर्थाने लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा मिळतील.

आपल्या खर्चांचा हिशोब ठेवा

तुम्ही जो खर्च कराल त्याचा रेकॉर्ड नक्की ठेवा. सणावारांच्या गडबडीत आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा हा दुसरा सोपा उपाय आहे. जर तुम्ही तुमच्या खर्चाचा हिशोब ठेवला नाहीतर बजेट बनवायचा काहीच अर्थ नाही. हवंतर एक वेगळा फेस्टिव्हल फंड बनवायचा प्रयत्न करा. यामुळे सणांदरम्यान होणारा खर्च आणि रोजचा खर्च यातील फरक कळणं शक्य होईल.

आपल्या आवडत्या ब्रँड्सकडे ठेवा लक्ष

हो…आपल्या खर्चांना बजेटमध्ये ठेवण्याची ही चांगली आयडिया आहे. जास्तकरून ब्रँड्स हे सणावाराच्या वेळी भरघोस सूट देतात. त्यामुळे तुम्हाला या काळात कमी किमतीत चांगल्या वस्तू घेता येतात. तर अनेक ब्रँड्स हे सणवार सोडून इतरवेळी सूट देतात. त्यामुळे तसं बघून तुम्ही शॉपिंग करू शकता. यामुळे तुमचे बरेच पैसे वाचतील. पण अशा काळातही तुमच्या बजेटवर नियंत्रण असू द्या. अनेकवेळा स्वस्तच्या नादात जास्तीची खरेदी होऊन बसते. त्यामुळे या जाळ्यात फसणं टाळा.

क्रेडिट कार्डचा वापर करणं टाळा

क्रेडिट कार्ड हे आर्थिक संकटाच्या स्थितीत लोकांसाठी वरदानाप्रमाणे असतं. पण क्रेडिट कार्डच्या सीमेपेक्षा जास्त खर्च करणं योग्य नाही. जेव्हा तुमच्याकडे पैसे कमी असतात तेव्ह क्रेडिट कार्डचा विकल्प हा पहिला असतो. पण ही गोष्ट टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डा वापर करता तेव्हा तुम्ही फायद्याचा विचार करता. पण भविष्याचा विचार करत नाही. त्यामुळे तुम्हाला वाटतं की, तुम्ही पुढच्या महिन्यात खर्च मॅनेज कराल. पण तुम्ही जर विचार न करता खर्च केला तर पुढचा महिना कधीच चांगला जाणार नाही. यामुळे तुमच्या पुढच्या महिन्याचा बजेटवरही परिणाम होईल.

जास्त खर्च झाल्यास वाईट वाटून घेऊ नका

आपण भावनांच्या भरात जास्त खर्च करतो आणि मग त्याबद्दल विचार करून वाईट वाटून घेतो. सणावाराला खर्च हा होतोच, त्यामुळे वाईट वाटून घेण्याची काहीच गरज नाही. पण विचार केल्याशिवाय बेहिशेबी खर्च करणे टाळा. ज्यामुळे तुम्हाला आपसूकच पुढे जाऊन खर्च झाल्याबद्दल वाईट वाटणार नाही.  या समस्येवरील सोपा उपाय म्हणजे दिवाळी येण्याआधी जास्तीचे पैसे बाजूला काढून ठेवा. जे तुम्हाला दिवाळीदरम्यान खर्च करता येतील आणि तुमचं बजेटही जैसे थे राहील.

फेस्टिव्ह सेलच्या आकर्षणाला बळी पडू नका

दिवाळी जवळ आल्यावर अनेक वेबसाईट्सवर आकर्षक ऑफर दिल्या जातात. या ऑफर्सचा फायदा नक्की घ्या. पण फक्त ऑफर सुरू आहे म्हणून भारंभार खरेदी करू नका. जर तुम्हाला खरंच गरज असेल तरच खरेदी करा. 

तर आम्हाला आशा आहे की, तुम्हाला वरील टिप्स नक्कीच आवडल्या असतील. मग या दिवाळीला योग्य तेवढा आणि नियंत्रणात राहूनच खर्च करा. मग होईल तुमची दिवाळी खऱ्या अर्थाने हॅपी दिवाळी.

Read More From लाईफस्टाईल