पालकत्व

लहान मुले होत आहेत मोबाईल ऍडिक्ट , कसे कमी करावे हे व्यसन 

Vaidehi Raje  |  Jun 6, 2022
mobile phone addiction in kids

आज बहुतेक पालकांना काळजी वाटते की त्यांची मुले दिवसभर मोबाईलला चिकटलेली असतात. ज्याचा मुलांवर केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही घातक परिणाम होत आहे. अनेक मुले सकाळी उठल्यावर फोन हातात घेतात आणि रात्रीपर्यंत त्यातच हरवलेली असतात. म्हणजेच 2 मिनिटांसाठीही त्यांच्याकडून फोन मागितला तर ते रडायला लागतात. हातात मोबाईल दिल्यावरच पोटभर जेवण जाते असे अनेक मुलांबाबत घडताना आपल्याला आजूबाजूला दिसून येते. म्हणजेच, जर मुलाच्या पोटात चार घास जायला हवे असतील तर त्यांना फोन दाखवावाच  लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मुलांच्या नाजूक डोळ्यांवर तर परिणाम होतो आहेच, पण त्यांच्या मेंदूवर आणि मानसिक आरोग्यावर देखील प्रचंड परिणाम होतोय. मुलांना इतक्या लहान वयापासून मोबाईल फोनचे व्यसन लागले आहे.मुलांच्या या मोबाईलच्या व्यसनाला जबाबदार कोण, पालक? की कोरोना ? कारण या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात मोठ्यांबरोबरच लहान मुलांना देखील स्क्रीनचे व्यसन लागले आहे. 

मुलांच्या या वाईट सवयीला शेवटी जबाबदार कोण

लहान मुलांमध्ये खूप एनर्जी असते. ती त्यांना कुठे घालवावी हे कळत नाही. खास करून लॉकडाऊनमध्ये जेव्हा बाहेर खेळणं बंद,शाळा ऑनलाईन, मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना भेटणं पूर्णपणे बंद झाल्याने मुलांना दिवसभर आपली एनर्जी कुठे घालवावी कळत नव्हते. पालकांनाही मुलांना दिवसभर कसे एंगेज ठेवावे हे कळेना! दिवसभर करायचे तरी काय? या वाईट परिस्थितीमुळे अनेक मुलांना मोबाईलचे व्यसन लागले. अनेक घरांत अशी परिस्थिती दिसते की पालकच आपापल्या फोनमध्ये गुंतलेले दिसतात आणि त्यामुळे मुलांचाही असाच समज होतो की वेळ घालवायला मोबाईल बघणे हा एक सोपा मार्ग आहे. त्यामुळे ते स्वतःही पालकांचे अनुकरण करतात. आता प्रश्न असा पडतो की मुलांना लागलेले हे मोबाईलचे व्यसन कसे सोडवायचे? 

Mobile Phone Addiction In Kids

मुलांचे मोबाईल फोनचे व्यसन कसे सोडवावे

तुमच्या मुलाने सतत मोबाईल बघण्याची किंवा जेवताना मोबाईल बघण्याची सवय सोडावी असे तुम्हाला वाटत असेल तर त्यात घाई करू नका. म्हणजेच ‘उद्यापासून मोबाईल बंद म्हणजे बंद’ असे करून चालणार नाही. मोठ्यांनाही सगळं कळून सवरून देखील आपल्या सवयी बदलायला वेळ लागतो. मग ही तर अजाण निरागस लहान मुले आहेत. त्यांना एखादी गोष्ट करायची नाही असे सांगितल्यावर तीच गोष्ट करणे हा लहान मुलांचा स्थायी स्वभाव असतो. त्यामुळे त्यांच्या कलाकलाने घेऊन हळू हळू मोबाईल बघण्याची सवय हळू हळू कमी करण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल.  म्हणजेच तुम्हाला मुलांकडून मोबाईल पूर्णपणे काढून घ्यायचा नाही, तर त्यांच्यासाठी काही नियम-कायदे ठरवावे लागतील जेणेकरून त्यांची सवय हळूहळू स्वतःहून निघून जाईल. 

Mobile Phone Addiction In Kids

याची सुरुवात कशी करायची 

मुले घरातील मोठ्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे सर्वप्रथम पालकांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणले पाहिजेत. म्हणजेच सकाळची सुरुवात मोबाईलने करू नका आणि जेव्हा मुले त्यांचे आवडते शो पाहण्यासाठी मोबाईल मागतात तेव्हा तुम्ही त्यांचे शो टीव्हीवर लावून देऊ शकता. असे केल्याने त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवले जाईल. आणि टीव्हीटाईम सुद्धा मर्यादित असेल याची काळजी घ्या. दिवसातून किती वेळ टीव्ही बघायचा हा निर्णय तुम्ही घेत असलात तरी तो केव्हा बघायचा हे त्यांना ठरवू द्या. म्हणजे त्यांना शिक्षा केल्यासारखे वाटणार नाही. पालकांनीही जेवताना मोबाईल वापरणे टाळावे.  तुम्हीही मोबाईलपासून काही अंतर ठेवलं तर मुलंही हट्ट करणार नाहीत. मुलांना इतर खेळांकडे आकर्षित करण्यासाठी त्यांच्याशी इनडोअर गेम्स खेळा.आणि जेव्हा जेव्हा मूल फोनसाठी हट्ट करेल तेव्हा त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करा. मुलाचे रडणे शांत करण्यासाठी कधीही मोबाईल वापरू नका. 

अशा प्रकारे तुम्ही लहान मुलांचे मोबाईलचे व्यसन कमी करू शकता. 

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From पालकत्व