उन्हाळा कोणासाठीही सोपा नसतो. सध्याच्या वाढत्या तापमानामुळे मोठ्यांनाही त्रास होतो तर नवजात बाळांना या तीव्र हवामानाचा त्रास होणे साहजिकच आहे. ऋतू बदल होतांना लहान मुलांना त्रास होतोच. त्यात नवजात बाळ असेल तर त्यांना याचा विशेष त्रास होऊ शकतो आणि त्यांच्या नाजूक तब्येतीची सर्वच पालकांना काळजी असते. उन्हाळा आला की बहुतेक पालकांना प्रश्न पडतात की उन्हाळ्यात बाळांचा आहार कसा असायला हवा किंवा त्यांना किती वेळा आंघोळ घालायला हवी किंवा बाळांच्या नाजूक त्वचेवर उष्णतेमुळे पुरळ उठल्यास काय करावे! घरातील ज्येष्ठ स्त्रिया जसे की आज्यापणज्यांकडे यावर भरपूर घरगुती उपाय असतात. बाळाच्या पालकांना नवजात बाळाची काळजी कशी घ्यायची याबद्दल विविध लोकांकडून भरपूर सल्ले मिळतात. पण जर तुम्हाला अनाहूत सल्ले न मिळण्याइतपत तुम्ही लकी असाल तर हा लेख वाचा आणि तुमच्या छोट्याश्या पिल्लाची उन्हाळ्यात अशी काळजी घ्या.
उन्हाळ्यात बाळाला आंघोळ घालताना
उन्हाळ्यात बाळाला किती वेळा आंघोळ घालावी हे पूर्णपणे तुमच्या बाळावर आणि त्याच्या आवडीवर अवलंबून आहे. फक्त बाळाला आंघोळ घालताना ते पाणी थंड नसावे याची काळजी घ्या. पाणी फार गरमही असू नये. तुमच्या नाजूक बाळाला सहन होईल असे उबदार कोमट पाणी बाळाच्या आंघोळीसाठी वापरा. दिवसातून दोनदा बाळाला आंघोळ घातल्यास त्याला उन्हाळ्याचा त्रास होणार नाही. तसेच आंघोळीच्या आधी बाळाला मालिश करण्याची पद्धत आहे. उन्हाळ्यातही मसाज बाळासाठी अत्यावश्यक आहे आणि मसाजमुळे उन्हाळ्यात बाळांची त्वचा हायड्रेटेड आणि थंड राहते. फक्त मसाजनंतर बाळाला छान स्वच्छ आंघोळ घाला.
उन्हाळ्यात बाळाच्या आहाराची विशेष काळजी घ्या
जर तुमचे बाळ अजूनही स्तनपान करत असेल, तर त्यांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी त्यांना वारंवार स्तनपान द्या. उन्हाळ्यात एक वर्षाच्या बाळासाठी अन्नाचा प्रश्न येतो तेव्हा त्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या आहारात फळांचा समावेश करा. त्यात जर बाळाला दात येतात तेव्हा त्याला त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी त्यांच्या आहाराची नक्कीच काळजी घ्यायला हवी.
बाळाला फक्त स्वच्छ पाणी द्या
खरं तर पहिले सहा महिने जर बाळ फक्त स्तनपान करत असेल तर बाळाला वरून पाणी द्यायचा सल्ला डॉक्टर सहसा देत नाहीत. पण जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला बाळाला पाणी द्यायला सांगितले असेल तर बाळाला केवळ उकळून गार केलेले पाणी द्या. कारण बाळांची प्रतिकारशक्ती कमी असते आणि आपल्याला त्यांचे आजारांपासून संरक्षण करायचे आहे. कोणतेही रोग टाळण्यासाठी बाळाला देण्यात येणारे पाणी उकळलेले आणि पूर्णपणे स्वच्छ असले पाहिजे.
उष्णतेमुळे पुरळ येऊ नये म्हणून काय करावे
उन्हाळ्यात बाळांच्या त्वचेवर उष्णतेमुळे पुरळ उठणे सामान्य आहे. पण हे होऊ नये म्हणून बाळांच्या आंघोळीच्या पाण्यात दोन चमचे चंदन पावडर तुम्ही टाकू शकता. तसेच आंघोळ झाल्यावर बाळाच्या त्वचेला त्रास होणार नाही अशी सौम्य टाल्कम पावडर लावू शकता. फक्त पावडर लावताना ती थेट बाळाच्या त्वचेवर टाकू नका कारण ती श्वासाद्वारे बाळाच्या फुफ्फुसांमध्ये जाऊ शकते. तसेच बाळाला फार घट्ट कपडे घालू नका. उन्हाळ्यात बाळांना कॉटनचे सैलसर कपडे घाला व शक्यतोवर घरात असताना डायपर घालू नका. बाळांना सुती पॅन्ट किंवा लंगोट घाला.
बाळाला डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्या
उन्हाळ्यात डिहायड्रेशन होण्याची दाट शक्यता असते.तुमच्या बाळाच्या लघवीचे निरीक्षण करा आणि ताप, उलट्या, जुलाब, पाणी पिण्यास असमर्थता, सहा तासांपेक्षा जास्त काळ बाळाने लघवी न करणे, ओठ आणि तोंड कोरडे पडणे, रडताना अश्रू न येणे, चक्कर येणे या डिहायड्रेशनच्या लक्षणांकडे लक्ष ठेवा.
बाळांची काळजी घेणे ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि बाळाला त्रास होत असल्यास पालकांना लगेच लक्षात येते. त्यामुळे काळजी करू नका, वर दिलेल्या गोष्टीं लक्षात ठेवल्यास तुम्हाला उन्हाळ्यात तुमच्या नवजात बाळाची काळजी घेणे सोपे जाईल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक