मनोरंजन

‘तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे.’, असं म्हणतेय हृता दुर्गुळे

Dipali Naphade  |  Jul 15, 2022
hruta-durgule-share-great-experience-of-shooting-ananya-marathi-movie-in-marathi

प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ ((Ananya) येत्या 22 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच ‘अनन्या’च्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. लवकरच हा प्रवास आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी हृता दुर्गुळेचा (Hruta Durgule) ‘अनन्या’पर्यंत पोहोचण्याचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Social Media Viral Video) झळकला असून यात हृता ते ‘अनन्या’ हा प्रवास दाखवण्यात आला आहे. या प्रवासात हृताने ‘अनन्या’ला कसे आपलेसे केले आहे, हे शेअर केले आहे. हृताने घेतलेली प्रचंड मेहनत यात दिसत आहे. 

वजन कमी करण्याचे आव्हान – हृताचा अनुभव 

या मेहनतीबाबत हृता दुर्गुळे म्हणते, ‘’ या चित्रपटासाठी मला शारीरिक मेहनत घ्यायची आहे, हे सुरुवातीपासूनच मला ठाऊक होते आणि त्यासाठी मला मानसिकदृष्ट्या खंबीर राहाणे आवश्यक होते. सर्वात आधी माझ्यासमोर वजन कमी करण्याचे आव्हान होते. या दरम्यानच माझे योगा आणि व्यायामाचे प्रशिक्षण सुरू होते. या काळात मी प्रचंड आव्हानात्मक गोष्टी केल्या. अक्षरशः मी रडायचे, कळवळायचे. एका अशा वळणावर मी आले होते की, असे वाटत होते सोडून द्यावे. परंतु मग चित्रपटाच्या टॅगलाईननेच मला स्फूर्ती दिली ‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे.’ हेच डोक्यात ठेवून मग मी हे आव्हान स्वीकारायचे ठरवले. मला दोन्ही हात नाहीत, हेच मी डोक्यात ठेवून पुढे वावरायला लागले आणि तेव्हाच मला ‘अनन्या’ सापडली. मी ‘अनन्या’शी एवढी एकरूप झाले होते की, पडद्यामागेही अनेक गोष्टी करताना माझ्यात ‘अनन्या’च असायची. ही आयुष्याची एक सकारात्मक लढाई आहे, जी ध्येयाकडे नेणारी आहे. ‘अनन्या’ साकारताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, आपल्याकडे जे आहे, त्यात आनंद मानावा.” एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे  ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया या चित्रपटाचे निर्माता आहेत.

हृताची ‘मन उडू उडू झालं’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप 

हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत अभिनय करत असणारी ‘मन उडू उडू झालं’ मालिका ही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दिपू आणि इंद्राचं एकमेकांवरील प्रेम आणि इंद्राचा चांगुलपणा या सगळ्यामुळे ही मालिका खूपच गाजली. एकपेक्षाही जास्त वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. तर आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याशिवाय हृताचा लवकरच ‘टाइमपास 3’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सध्या हृता खूपच व्यग्र असल्याचे दिसून येत आहे. लागोपाठ येणारे चित्रपट आणि त्याचे प्रमोशन यामध्येच सध्या हृता सतत व्यस्त असल्याचे सध्या सगळ्यांना दिसून येत आहे. तर अनन्या या चित्रपटासाठी घेतलेली मेहनतही कळून येत आहे. या चित्रपटाचे ट्रेलर अनेकांना आवडले असून हृताने नक्कीच या चित्रपटात अगदी चांगले काम केले असणार असा अंदाज सध्या सोशल मीडियावरही लावण्यात येत आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन