बॉलीवूड

लवकरच येतेय शेफ तरला दलाल यांची बायोपिक, हुमा कुरेशी साकारणार मुख्य भूमिका

Trupti Paradkar  |  Apr 20, 2022
लवकरच येतेय शेफ तरला दलाल यांची बायोपिक, हुमा कुरेशी साकारणार मुख्य भूमिका

भारतातील लोकप्रिय शेफ तरला दलाल यांचं आयुष्य लवकरच मोठ्या पडद्यावर साकारलं जाणार आहे. ज्यामुळे बॉलीवूडमध्ये पहिल्यांदाच बायोपिकच्या माध्यमातून एका शेफचं आयुष्य प्रेक्षकांसमोर येणार आहे. याआधी शेफच्या जीवनावर कोणतीच बायोपिक अजून तयार झालेली नाही. दिवंगत तरला दलाल यांची भूमिका अभिनेत्री हुमा कुरेशी साकारणार आहे. हा चित्रपट म्हणजे केवळ एका शेफच्या खाजगी आयुष्याची कहाणी नसून युवा वर्गासाठी प्रेरणादायी ठरेल असा एक प्रवास आहे. कारण एकेकाळी तरला दलाल यांनी घर आणि काम सांभाळत भारतीय स्वयंपाकाचा चेहरा मोहरा बदलून टाकला होता.

हुमा कुरेशीला या चित्रपटात ओळखणं कठीण

बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने तिच्या या आगामी बायोपिकचा फर्स्ट लुक इन्स्टावर शेअर केला आहे. ज्यामध्ये हुमाला ओळखणंही प्रक्षकांना कठीण झालं आहे. जर हुमाने ही पोस्ट शेअर केली नसती तर प्रेक्षकांना तरला दलाल साकारणारी व्यक्ती कोण आहे हे समजलंदेखील नसतं. तरला दलाल एक शेफ, फूड रायटर आणि कुकिंग बुकच्या लेखिकासुद्धा होत्या. त्यांनी अनेक कुकिंग शोज एकेकाळी गाजवले होते. तरला दलाल यांची खासियत होती भारतीय त्यातही खास गुजराती डिश बनवणं. हुमाने या पोस्टसोबत शेअर केलं आहे की, “तरला चा तडका पाहून मनात येतो एकच प्रश्न, कधी मिळणार आम्हाला या अनुभवाचा स्वाद चाखण्याची संधी…यासाठीच भेटा तरला दलाल यांना आणि जाणून घ्या त्यांची मसालेदार कहाणी”

तरला दलाल एक लोकप्रिय शेफ

ऐंशी नव्वदच्या काळ असा होता जेव्हा शेफच्या करिअरला ग्लॅमर प्राप्त झालेलं नव्हतं. पण टीव्हीवर कुकरी शोज सुरू झाले आणि तरला दलाल सेलिब्रेटी शेफ बनल्या. आजही घरोघरी तरला दलाल यांच्या रेसिपी प्रसिद्ध आहेत. टीव्हीच्या माध्यमातून तरला दलाल घरोघरी प्रसिद्ध झाल्या होत्या. नव्वदच्या काळात कुकिंग म्हणजे तरला दलाल असं समीकरण झालं होतं. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण त्यांना ओळखत होते. पियुष गुप्ता यांच्या दिग्दर्शनाखाली आता या सेलिब्रेटी शेफचा जीवनप्रवास पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहे.  या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला, अश्विनी अय्यर आणि नितेश तिवारी करत आहेत.या चित्रपटात पडद्यामागची तरला दलाल दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तरला दलाल यांनी स्वयंपाकावर आधारित शंभरहून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. या पुस्तकांच्या दहा कोटीहून अधिक प्रती विकण्यात आल्या होत्या. भारतीय खाद्यसंस्कृतील या अतुलनिय कार्याबद्दल त्यांना 2007 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एका शेफचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर येत आहे. एके काळी या शेफने भारतात शाकाहारी पदार्थांच्या माध्यमातून क्रांती केली होती.

Read More From बॉलीवूड