लाईफस्टाईल

मार्गशीर्ष श्री महालक्ष्मी व्रताला आरंभ

Aaditi Datar  |  Dec 12, 2018
मार्गशीर्ष श्री महालक्ष्मी व्रताला आरंभ

आजपासून मार्गशीर्षातील श्री महालक्ष्मी व्रताला सुरूवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हे व्रत मोठ्या प्रमाणावर केले जाते. 

मार्गशीर्षातील दर गुरूवारी पूजा

हे व्रत मार्गशीर्षातील चार गुरूवारी केले जाते. या दिवशी महिला भक्तीभावाने देवीची स्थापना करून तिची पूजा करतात. उपवास करतात.

महालक्ष्मी व्रत (Mahalaxmi Vrat) पूजेची मांडणी

– ज्या जागी पूजा करायची आहे, ती जागा स्वच्छ करून घ्यावी.

– पूजा करण्याच्या जागेवर पाट किंवा चौरंग मांडावा.

– त्यानंतर नवीन कोरे कापड अंथरून त्यावर गहू किंवा तांदूळाची रास घालावी. 

-एक तांब्या घेऊन त्यामध्ये पाणी भरावे. त्यात दूर्वा, सुपारी आणि पैसा घालावा.

– विड्याच्या पानांनी किंवा आंब्याची डहाळी कलशावर ठेऊन त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे ठेवावा.

– या नारळाला हळद आणि कुंकवाची बोटं सर्व बाजूंनी लावावी.

– चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. काही ठिकाणी मूर्तीऐवजी नारळालाच वेणी वाहून आणि वस्त्र, दागिने घालून देवीची स्थापना केली जाते.

– मूर्तीपूढे विडा, खोबरं, खारीक, पाच फळ आणि गूळ ठेवावा.

– सूपारी मांडून गणपतीची स्थापना करावी. सर्व मांडणी झाल्यावर यथासांग पूजा करावी. 

पूजा झाल्यावर आरती करावाी. देवीला प्रसाद दाखवावा. नंतर सर्वांना द्यावा. अशाप्रकारे ही पूजा करावी. पूजेनंतर कथा वाचावी. श्री महालक्ष्मी माहात्म्य वाचावे. संध्याकाळी पुन्हा श्री महालक्ष्मीची पूजा करावी. गोडधोडाचा नैवेद्य दाखवावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी जेवण करावे. शक्य असल्यास एका पानावर गोग्रास काढून तो घास गायीला द्यावा.अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरूवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी. शेवटच्या गुरूवारी या व्रताचे उद्यापन करावे.

पुराणातील उल्लेख

श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितलेले आहे की, जो माझे व्रत नित्य-नेमाने करील, तो सदैव सुखी समाधानी राहील. हे व्रत केल्याने देवी महालक्ष्मी प्रसन्न होते. दुःख दारिद्रय दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने सुख, संपत्ती आणि ऐश्वर्य प्राप्त होते. तसेच मनातील इच्छा पूर्ण होते, अशी आख्यायिका आहे.

Read More From लाईफस्टाईल