प्रत्येकाला आपल्या गावाबद्दल एक अनामिक ओढ असते. कधीकधी मुंबईत वास्तव्य आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना गावची नाळ मात्र हळूहळू तुटू लागते. गावाकडची संस्कृती, परंपरा जपणारा आणि पुढच्या पिढीला आपल्या गावची ओळख करुन देणारा माणदेशी महोत्सव सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. साताऱ्यातील ‘माण’ या दुर्गम विभागाच्या महिलाच्या सक्षमीकरणासाठी गेली तीन वर्षे सतत मुंबईत माणदेशी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा रविद्र नाट्यगृहाच्या प्रागंणात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. तीन जानेवारी ते सहा जानेवारी दरम्यान हा महोत्सव असेल. संपूर्ण माणदेश संस्कृतीचं दर्शन या महोत्सवातून मुंबईकरांना घडत आहे.
यंदाचं आकर्षण माणदेशी संस्कृतीचे ‘सेल्फी पॉईंट’
माणदेशी महोत्सवामध्ये यंदा आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहेत ते म्हणजे गावाकडची संस्कृती दर्शवणारे ‘सेल्फी पॉईंट’. या महोत्सवाच्या प्रवेशद्वाराजवळच गावाकडची घरं, पडवी, ओटा, बैलगाडी, गावकऱ्यांचे स्कल्पर्चस असा गावरान देखावा तुमचं लक्ष वेधून घेतो. महोत्सवात मुंबईकर या खास सेल्फी पॉईंटचा आनंद लुटताना दिसत आहेत. या गावरान देखाव्यामुळे तुम्ही गावाकडच्या आठवणींना पुन्हा उजाळा देऊ शकता. शिवाय लहान मुलांना गावच्या संस्कृतीची ओळख पटवण्यासाठी तुम्ही मुलांसह अवश्य या महोत्सवाला देऊ शकता.
माणदेशी संस्कृतीची ओळख जपणारे ‘आकर्षक स्टॉल्स’
माणदेशी खासियत असलेल्या घोंगड्या ,दळण दळण्यासाठी जाती आणि खलबत्ते, केरसुण्या, दुरड्या, सुपल्या अशा अनेक आकर्षक वस्तू या महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या सर्व वस्तू मुंबईकरांना सोयीच्या व्हाव्यात म्हणून अगदी लहान आणि कमी वजनाच्या बनविण्यात आल्या आहेत. घरगुती खास सातारी ‘ठसका’ असलेल्या विविध चटण्या, लोणचं, पापड, कुरडया, खरडा, ठेचा बघता क्षणीच खवैयाचं लक्ष वेधून घेतात. गावची ताजी फळं, भाज्या, गुळ, काकवी, लाकडी घाण्यावरचं तेल अशी सेंद्रिय उत्पादनेदेखील महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सातारचा फेटा कसा बांधावा हेदेखील या महोत्सवातून तुम्हाला शिकता येईल. मातीची मडकी, पोलपाट-लाटणं कशी बनवली जातात याचं प्रात्यक्षिक यंदा महोत्सवात पाहायला मिळत आहे. थोडक्यात ग्रामसंस्कृतीचा कणा जपणारे बारा बलुतेदार तुम्हाला प्रत्यक्षात या महोत्सवातून पाहता येणार आहेत. या महोत्सवात महिला वर्गाला भुरळ घालत आहेत आकर्षक रंगाच्या, तलम पोताच्या हातमागावर विणलेल्या ईरकली साड्या, मऊसूत खण आणि बारीक कलाकुसर केलेल्या शाली. या साड्या पाहून तुम्हाला आजीच्या साडीची नक्कीच आठवण येईल आणि मन पुन्हा गावाकडच्या आठवणीत रमून जाईल. मुंबईकरांच्या खान-पानाचीदेखील या महोत्सवात उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबईकरांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन
माणदेशी महोत्सवात मनोरंजनासाठी अनेक लोकनृत्य, लोकसंगीत, सामाजिक संदेश देणारी पथनाट्य, सुफी संगीत मैफील अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महिलांच्या कुस्तीचंदेखील आयोजन करण्यात या महोत्सवात करण्यात आलं आहे त्यामुळे या महोत्सवाला अधिकच रंगत आली आहे.
माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी या फाऊंडेशनच्या माध्यमातून 3,00,000 महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांचे व्यवसाय यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे.
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade