Fitness

कसे करावे मयूरासन जाणून घ्या माहिती (Mayurasana Information In Marathi)

Trupti Paradkar  |  Jan 5, 2021
mayurasana information in marathi

मयूरासन हे योगासनातील असे एक आसन आहे ज्याचे आरोग्यावर अनेक फायदे होतात. मयूर म्हणजेच मोर ज्या आसनामध्ये शरीराची स्थिती मोरासारखी दिसते त्या आसनाला मयूरासन असं म्हणतात. प्राचीन योगविद्या आणि पुराणात मोराला प्रेम आणि समृद्धीचं प्रतिक समजले जाते. मानसिक शांतता आणि शारीरिक आरोग्यासाठी हे आसन करण्याचा सराव करणं फायद्याचं ठरू शकतं. या आसनामध्ये आदर्श स्थिती प्राप्त करण्यासाठी त्यातील कौशल्य आणि बारकावे हस्तगत करावे लागतात. मयूरासन हे एक अडवान्स आसन आहे. त्यामुळे हे आसन येण्यासाठी आधी योगासनातील बेसिक आसने येणं आवश्यक आहे. असं असलं तरी मयूरासनाचे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत. यासाठी  जाणून घ्या मयूरासन माहिती आणि त्याचे शरीरावर काय फायदे  होतात.

मयूरासन कसे करावे (How To Do Mayurasana Step-by-Step)

मयूरासन हे हातावर शरीराचा तोल सांभाळत करावे लागणारे अॅडवान्स योगासनाचा प्रकार आहे. हा हट योगाचा एक प्रकार असल्यामुळे तो करण्याआधी काही बेसिक योगासनांचा सराव करणे आणि त्यात पारंगत होणं गरजेचं आहे. त्यानंतरच या स्टेप बाय स्टेप पद्धतीने मयूरासनाचा सराव करावा. 

स्टेप 1 – स्वच्छ आणि हवेशीर ठिकाणी चटई अथवा तुमचे आसन ठेवा

स्टेप 2 – आसनाला सुरूवात करण्यासाठी दोन्ही पायांवर सरळ उभे राहा. या स्थितीत तुमचे दोन्ही हात गुडघ्याला समांतर असावेत

स्टेप 3 – आसनाला सुरूवात करत पोटाकडे झुकत हात जमिनीवर ठेवावे

स्टेप 4 – दोन्ही हात पोटाकडे येतील अशा स्थितीत कोपऱ्यात हात दुमडत पाय एक एक करत वरच्या दिशेने उचलावे

स्टेप 5 – हाताच्या दोन्ही तळव्यांवर संपूर्ण शरीराचा भार सांभाळात शरीर जमिनीला समांतर ठेवावे

स्टेप 6 – पूर्वस्थितीत येण्यासाठी आधी पाय हळूवारपणे जमिनीवर ठेकवावे आणि हाताला आधार देत वज्रासनात बसावे

Instagram

मयूरासन करण्याचे फायदे (Mayurasana Benefits In Marathi)

मयूरासन करण्याचे शरीर आणि मनावर अनेक चांगले फायदे होतात. दररोज सकाळी अथवा संध्याकाळी रिकाम्या पोटी हे आसन करण्याचा नियमित सरावा करावा. ज्यामुळे काहीच दिवसांमध्ये तुम्हाला अफलातून बदल शरीरात जाणवू लागतील.

हाताचे स्नायू मजबूत होतात

मयूरासन करण्याचे तुमच्या हात आणि खांद्यावर अनेक चांगले फायदे दिसून येतात. कारण या आसनामध्ये तुमच्या हात आणि खांद्यावर तुम्हाला तुमच्या संपूर्ण शरीराचा तोल सांभाळावा लागतो. या आसनामुळे हात आणि खांद्यांच्या स्नायूंवर चांगला ताण येतो. ज्याचा परिणाम असा होतो की मयूरासन नियमित केल्यामुळे तुमचे हात आणि खांद्याचे स्नायू मजबूत होतात. योगतज्ञ आदर्श स्थिती प्राप्त केल्यावर चांगल्या परिणामांसाठी हे आसन कमीत कमी चार ते पाच मिनिट करण्याचा सल्ला देतात.

पचनसंस्था सुरळीत होते

या आसनामध्ये शरीराचा तोल सांभळत असलेल्या आदर्श स्थितीत पोटावर योग्य तो परिणाम होतो. हे आसन करण्याच्या प्रक्रियेमध्ये पोटातील अवयव जसे की, मोठे आतडे, छोटे आतडे, यकृत, स्वादुपिंड यांच्यावर चांगला परिणाम होतो. ज्यामुळे हळूहळू तुमची पचनशक्ती सुधारू लागते. ज्या लोकांना सतत अपचनाच्या समस्या होतात त्यांनी मयूरासन केल्यास त्यांना नक्कीच चांगला परिणाम जाणवू शकतो.

रक्तप्रवाह सुधारतो

आजकाल जगभरात अनेकांना शरीरातील रक्तप्रवाह बिघडल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणांना सामोरं जावं लागतं. मात्र मयूरासन केल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. रक्तप्रवाह सुधारल्यामुळे शरीराला पुरेशा ऑक्सिजनचा पूरवठा होतो. ज्यामुळे रक्ताची निर्मिती, रक्तवाहिन्या, ह्रदयाचे कार्य सुरळीत होते. दिवसभर फ्रेश राहण्यासाठी आणि आजारपणांपासून दूर राहण्यासाठी या गोष्टींची शरीराला खूप गरज असते.

Instagram

मधूमेहींसाठी उत्तम

मयूरासनाचा नियमित सराव केल्यास मधूमेहींना चांगला फायदा होऊ शकतो. याचं कारण असं की मयूरासनामुळे मधूमेहींच्या शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय या आसनासाठी मोठ्या प्रमाणावर शारीरिक हालचालीची गरज असल्याने हे आसन नियमित केल्यास शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. ज्यामुळे शरीरात रक्ताची पातळी नियंत्रणात राहते. यासाठी तज्ञ मधूमेहींना नियमित मयूरासन करण्याचा सल्ला देतात.

एकाग्रता वाढते

आजकाल कामाची दगदग  आणि ताणतणाव यामुळे अनेकांना विसरण्याची सवय लागते. ज्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. ज्याचा परिणाम भविष्यात गंभीर आजारपणात होऊ शकतो. मात्र स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी मयूरासन हे एक उत्तम योगासन आहे. कारण या आसनामध्ये तुम्हाला तुमच्या शरीराच्या पोश्चरवर लक्ष केंद्रित करावे लागते. लक्षपूर्वक आणि सरावानेच तुम्हाला मयूरासनातील आदर्श स्थान प्राप्त करता येते. सहाजिकच हे आसन करता करता तुमची स्मरणशक्ती तल्लख होते आणि एकाग्रता वाढू लागते. यासाठीच ज्यांना विसरण्याची सवय आहे त्यांनी या आसनाचा सराव जाणिवपूर्वक करावा. 

आत्मविश्वास वाढण्यास मदत होते

आजकाल वाढत असलेल्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला व्यक्तिमत्व विकास आणि आत्मविश्वासाची गरज असते. जिंकणे अथवा हरणे हा जीवनाचा एक भाग आहे. मात्र आहे त्या परिस्थितीत खंबीरपणे पाय रोवून उभे राहणे ही जीवन जगण्याची एक कला आहे. मयूरासाचा मानसिक आणि अध्यात्मिक फायदा हा की या आसनामुळे तुमचे  मन मजबूत होत, आत्मविश्वास वाढू लागतो. जीवन जगताना येणाऱ्या अडथळ्यांना दूर करून यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हे कौशल्य आत्मसात करणे आज गरजेचं झालं आहे. यासाठीच मानसिक शांतता आणि शारीरिक आरोग्यासाठीसाठी मयूरासनाचा सराव करणे फायद्याचे आहे. 

मनगट लवचिकता होतात

मयूरासनाचे खरंतर अनेक शारीरिक फायदे आहेत. ज्यातील प्रमूख फायदा हा की यामुळे तुमच्या हाताच्या मनगट आणि एल्बोजवळील स्नायू बळकट होतात. याच कारणासाठी बऱ्याचदा खेळाडू जसे की क्रिकेटर्स, बॅडमिंटन ब्लेअर्स यांना हे आसन करण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्याच्या खेळासाठी मनगट आणि संपूर्ण हाताचे स्नायू मजबूत आणि लवचिक असणं गरजेचं असतं. ज्यांना हाताची दुखणी त्रास देत असतात त्यांनाही या आसनाचा सराव केल्यामुळे आराम मिळू शकतो. 

वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते

मयूरासन हे एक उत्तम अॅंटि टॉक्सिन योगासन आहे. याचाच अर्थ या आसनाच्या सरावामुळे तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. मयूरासन नियमित केल्यास तुमचे वजन झपाट्याने कमी होते. त्यासोबतच तुमच्या पोटाचे स्नायू,हाताचे आणि खाद्यांचे स्नायू, पाठीचे स्नायू बळकट होतात. खरंतर आजकाल वजन अनियंत्रित होण्याची जी कारणं आहेत. त्यातील प्रमूख कारण चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव ही आहेत. म्हणूनच ज्यांचे वजन खूप वाढत आहे त्यांनी मयूरासन करण्याची  सवय स्वतःला लावावी. ज्यामुळे तुमच्या शरीराचा बांधा सुडौल आणि शरीर सुदृढ होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे पोट आणि मांडीवरील चरबी कमी करण्यासाठी ही योगासने जरूर करा

मयूरासन करताना केल्या जाणाऱ्या काही चुका (Common Mistakes In Mayurasana)

मयूरासन हे कितीही आदर्श योगासन असलं तरी जर हे आसन करताना योग्य पद्धतीने केलं गेलं नाही तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. यासाठीच हे आसन करताना काही चुका जाणिवपूर्वक करणं टाळा.

सुरूवातीलाच हे आसन करण्याची घाई करू नका

मयूरासन हे योगासनातील अॅडवान्स आसन आहे. म्हणून योगासनांना सुरूवात केल्यावर अथवा योगासन शिकण्यास सुरूवात केल्यावल लगेचच हे आसन करण्याचा प्रयत्न करू नका. त्याआधी योगासनांमधील काही बेसिक आसने  आणि वार्म अप वर्कआऊटचा सराव करा. ज्यामुळे तुमचे शरीर या आसनासाठी तयार होईल. असं न केल्यास तुमच्या मनगटांवर ताण येऊन तुम्हाला गंभीर दुखापतीला सामोरं  जावं लागेल. यासाठीच योगासनांचा सराव सुरू करताना उपयुक्त ठरतील या टिप्स

हातावर शरीराचा तोल सांभाळताना सावध राहा

मयूरासनाच्या आदर्शस्थितीत तुम्हाला तुमच्या दोन्ही हाताच्या तळव्यांवर संपूर्ण शरीराचा तोल सांभाळायचा असतो. जर तुम्ही हा तोल नीट सांभाळू शकला नाहीत तर तुमच्या शरीराची स्थिती एखाद्या सी-सॉप्रमाणे होऊ शकते. यासाठीच हे आसन स्टेप बाय स्टेप करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमचे हात मजबूत होतील आणि संपूर्ण शरीराचा तोल सांभाळू शकतील. साठी गरज आहे ती फक्त या आसनाचा नियमित सराव करण्याची हे लक्षात ठेवा.

Instagram

आसन करताना फार पुढे झुकू नका

मयूरासन हे तोल सांभाळण्यास शिकवणारे उत्तम आसन आहे. या स्थितीत तुमच्या हातावर शरीराचा ताण आल्यामुळे तुमचे शरीर पुढच्या दिशेन झुकू शकते. मात्र याच वेळी तुम्हाला संतुलित राहण्याची जास्त गरज आहे. कारण अशा स्थितीत जर तुम्ही पुढे जास्त झुकला तर तुमचा तोल जाऊन तुमच्या डोक्याला दुखापत होऊ शकते. यासाठीच पुढे अथवा मागे न धुकता बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करा. 

पाय उगाचच झटकन उचलू नका

हातावर तोल सांभाळत आदर्श स्थिती लवकरात लवकर गाठण्यासाठी तुम्ही काही  चुका नकळत करू शकता. जसं की पाय झटकन वर उचलणे. मात्र असं केल्यामुळे तुमचा तोल जाऊन तुम्ही कोलमडू शकता अथवा यामुळे हात, मनगटाला गंभीर दुखापत होऊ शकते. यासाठीच पाय वर घेताना एक एक पाय वर घ्या. पाय वर घेताना तो संथपणे वर घ्या पाय वर घेण्याची घाई करू नका. ज्यामुळे तुम्हाला हे आसन व्यवस्थित करता येईल. 

आसनामधून बाहेर पडण्याची घाई करू नका

मयूरासन करताना बऱ्याचदा आदर्श स्थिती प्राप्त केल्यावर अथवा तोल उत्तम रित्या सांभाळल्यावर आसनामधून बाहेर पडताना घाई केली जाते. ज्यामुळे तुमचा तोल जाऊन तुम्ही खाली पडू शकता. यासाठीच आसनामधून बाहेर पडताना हळू हळू पूर्वस्थितीत या ज्यामुळे तुमच्या शरीराला कोणतीही दुखापत होणार नाही. याचसोबत प्रतिकारशक्ती वाढवणारी योगासने करा आणि निरोगी राहा

Instagram

मयूरासनाबाबत मनात असलेले निवडक प्रश्न – FAQs

1. पहिल्यांदा मयूरासन करताना काय काळजी घ्यावी ?

जर तुम्ही पहिल्यांदाच मयुरासन करणार असाल तर ते तुम्ही तज्ञ्जांच्या देखरेखी खाली आणि मार्गदर्शनाखाली करावे. मयूरासन करताना त्याआधी बेसिक योगासनांबद्दल माहिती आणि त्यांचा सराव करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कोणतेही आसन करताना दोन ते तीन तास उपाशी असणं गरजेचं आहे.

2. मयूरासन करणं खूप कठीण आहे का ?

अर्थातच नाही, कारण योगासने ही कठीण असली तरी सरावाने त्यात पारंगत होता येतं. जर तुम्हाला योगासनांची माहिती असेल आणि तुम्ही नियमित काही बेसिक योगासनांचा सराव करत असाल तर तुम्हाला मयुरासनांची आदर्श स्थिती नक्कीच मिळवता येईल.

3. मयूरासन करण्यात पारंगत कसे व्हावे ?

योगासनाचा कोणताही प्रकार करण्यासाठी त्याचा नियमित सराव करणे गरजेचं आहे. मयूरासन हे योगासनातील अॅडवान्स आसन असल्यामुळे त्याआधी काही बेसिक आसनांचा सराव करणे क्रमप्राप्त आहे.हळू हळू सराव केल्यामुळे मयूरासन करण्यात तुम्ही तरबेज होऊ शकता.

Read More From Fitness