आरोग्य

पावसाच्या दिवसात शुष्क आहार आरोग्यासाठी उत्तम, जाणून घ्या

Leenal Gawade  |  Sep 8, 2021
शुष्क पदार्थ

सप्टेंबर उजाडला तरी अद्यापही पाऊस सुरुच आहे.  वातावरण बदलले की खाण्यापिण्याच्या सवयी या बदलतात. सध्या श्रावणाचे दिवस सुरु आहेत. या दिवसातही आपल्या पचनशक्तीमध्ये आणि आवडीनिवडीमध्ये बराच फरक पडतो. पण या दिवसात नेमके काय खाणे योग्य हे तुम्ही कधी जाणून घेतले आहे का? आयुर्वेदाचार्य डॉ. अश्विन सावंत यांनी या संदर्भात एक महत्वपूर्ण अशी माहिती आपल्याला आज दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाळ्यात शुष्क आहार करणे फारच फायद्याचे मानले जाते. आता शुष्क आहार म्हणजे काय? तो कसा करावा जाणून घेऊया या विषयी माहिती

तुमचीही मुलं अंथरुणात लघवी करतात का, जाणून घ्या उपाय

 शुष्क आहार म्हणजे काय?

शुष्क आहार याचा अर्थ शब्दश: घेताना कोरडा आहार असा होतो. पण आयुर्वेदात या बद्दल एक वेगळीच व्याख्या आहे. शास्त्राने शुष्क याचा अर्थ कुल्माष सांगितला आहे. (भोजनं….संशुष्कं׀ अष्टाङ्गहृदय१.३.४६,४७ – आयुर्वेद रसायन व्याख्या -संशुष्कं कुल्माषादी׀) कुल्माष याचा अर्थ तांदूळ,जव वगैरे धान्य अर्धवट शिजवून तयार केलेली कांजी, जी  जुन्या काळात खाल्ली जात असावी. आजच्या २१व्या शतकात पावसाळ्यामध्ये  जे शुष्क खाद्यपदार्थ खाणे अपेक्षित आहे त्याचा अर्थ नैसर्गिक प्रक्रिया करुन सुकवलेले असा घ्यावा लागतो. कारण शुष्क याचा अर्थ होतो सुकलेले,वाळलेले, ओले नसलेले.  पावसाळ्याआधीच्या उन्हाळ्यामध्ये  वेगवेगळी वाळवणं केली जातात.वाळवणं म्हणजे असे पदार्थ जे बनवताना किंवा तयार केल्यावर उन्हामध्ये वाळवायचे असतात.जसे पापड,कुरडया, वगैरे. घरासमोरच्या अंगणामध्ये किंवा घरांच्या-इमारतींच्या  गच्चीवर विविध पदार्थ वाळत घालणे हा उन्हाळ्यात मोठाच उद्योग असतो.आजकालच्या वेगवान जीवनामध्ये सगळ्यांनाच हे शक्य होत नसल्याने बाजारात तयार मिळणारे  सुकवलेले पदार्थ वापरले जातात.हे सगळे पदार्थ उन्हामध्ये सुकवले जातात आणि ग्रीष्मातल्या तीव्र उन्हामुळे त्यांमधील पाण्याचा अंश जवळजवळ सुकून जातो.असे शुष्क पदार्थ शरीरामध्ये पचनासाठी ओलाव्याची मागणी करतात,शरीरातला ओलावा शोषून घेतात.

का करावा पावसात शुष्क आहार

पावसाळ्यामध्ये पचनक्रिया ही मंदावलेली असते. काहीही खाल्ले तरी ते पटकन पचत नाही. शरीरातही ओलावा वाढलेला असतो.शरीरामध्ये वाढलेला अतिरिक्त ओलावा हेच पावसाळ्यातल्या अनारोग्याचे एक महत्त्वाचे कारण असल्याने शुष्क खाद्यपदार्थ  पावसाळ्यात का खावेत हे आपल्या लक्षात येते. याचे आणखी एक कारण म्हणजे पावसाळ्यात भाज्या किंवा काही गोष्टी जास्त प्रमाणात मिळत नाही. ज्या गोष्टी सुकवून वगैरे बनवलेल्या असतात त्या गोष्टींमध्ये खरेच शुष्कपणा असतो असे सांगत येत नाही.  कारण अशा स्वरुपाच्या पदार्थांमध्ये नाही म्हटले तरी थोडासा तरी ओलावा असतो. भाज्यांमध्ये सुद्धा अशाप्रकारे ओलावा असतो.  तुम्ही कोणतीही भाजी किंवा पदार्थ कोरडा केला असेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे सुकलेले पदार्थ अर्थात आंबोशी, वाळवणीचे पदार्थ, थालिपीठ असे पदार्थ आवर्जून खावे. त्यामुळे नक्कीच  फायदा होईल. 

आता पावसाच्या दिवसात शुष्क आहार हा नक्की घ्या आणि निरोगी आरोग्य मिळवा.

Read More From आरोग्य