बॉलीवूड

रॉकेट्री द नंबी इफेक्ट मधील नवे श्री व्यंकटेश सुप्रभातम ऐकले का?

Vaidehi Raje  |  Jun 24, 2022
rocketry the nambi effect

“कौसल्या सुप्रजा राम पूर्वासंध्या प्रवर्तते ।

उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमाह्निकम् ॥ 

उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज ।

उत्तिष्ठ कमलाकांत त्रैलोक्यं मंगलं कुरु॥” 

आपण सर्वांनीच लहानपणापासून हे श्री व्यंकटेश सुप्रभातम स्तोत्र ऐकले आहे.  प्रसिद्ध शास्त्रीय गायिका एम एस सुब्बुलक्ष्मी यांच्या खणखणीत आवाजात, स्पष्ट उच्चारांत म्हटलेले हे स्तोत्र आपल्या सर्वांच्याच ओळखीचे आहे. हेच स्तोत्र आता एका नव्या स्वरूपात आले आहे. आर माधवनच्या आगामी रॉकेट्री द नंबी इफेक्ट या चित्रपटात हे स्तोत्र एका नव्या स्वरूपात आपल्याला ऐकायला मिळेल. अभिनेता आर. सध्या माधवन त्याच्या आगामी ‘रॉकेट्री द नंबी इफेक्ट’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाची रिलीज डेट आता जवळ आली आहे, त्यामुळे चित्रपटाची टीम त्याचे जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. नुकताच या चित्रपटासाठी बनवलेल्या ‘श्री वेंकटेश्वरा सुप्रभातम’ या भक्तिगीताचा टीझर प्रदर्शित झाला आहे. आर. माधवनने हे गीत सोशल मीडियावर शेअरही केले आहे. यासोबतच त्यांनी ते पुन्हा का तयार केले याबद्दलही माधवनने माहिती दिली आहे. 

रिकंपोज केले श्री व्यंकटेश्वरा सुप्रभातम 

आर. माधवनने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ‘श्री वेंकटेश्वर सुप्रभातम’ च्या टीझरची लिंक शेअर करत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो  “ही ‘सुप्रभातम’ची तीन मिनिटांची आवृत्ती आहे, जी आमच्या ‘रॉकेट्री’ चित्रपटासाठी खास तयार करण्यात आली आहे”, असे म्हणताना दिसतो आहे. तो पुढे म्हणतो की, “मला या स्तोत्राचे स्लो व्हर्जन नेहमीच आवडते. मला माहित नाही की असे का होते? पण, लोकांनी ते एका विशिष्ट लयीत गायले आहे, हे मला पुन्हा जाणवले. मग जेव्हा मी ते पुन्हा संगीतबद्ध करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा माझे संगीतकार दिवाकर यांनी ते खरोखर करून दाखवले.”

सुप्रभातमचा टीझर तीन मिनिटांचा आहे

या व्हिडिओसोबत माधवनने कॅप्शन शेअर केले आहे. त्यात लिहिले आहे की  ‘सुप्रभातमची आवृत्ती अधिक मधुर आणि ऐकायला गोड असावी असं मला नेहमीच वाटत आलं आहे. त्याच धर्तीवर आम्ही रॉकेट्रीचे श्री वेंकटेश्वर सुप्रभातम् तयार केले आहे. सुप्रभातमचा टीझर खूपच गोड आहे. हे ऐकून तुम्हीही भक्तीने भारावले जाल.”

सुप्रभातम म्हणजे काय?

सुप्रभातम् हे शुभ आणि प्रभात या शब्दांपासून बनलेले आहे. ही सुप्रभातकाव्य शैलीची एक संस्कृत कविता आहे. हा श्लोकांचा संग्रह आहे, ज्याचे पठण हिंदू धर्मात पहाटे देवतांना जागृत करण्यासाठी केले जाते. ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटात ‘श्री वेंकटेश्वर सुप्रभातम’ हे दिवाकर सुब्रमण्यम यांनी पुन्हा संगीतबद्ध केले आहे. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, ते तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये देखील रिलीज होईल. माधवनने या चित्रपटात अभिनयासोबतच लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली आहे. दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. पण, या चित्रपटानंतर तो दिग्दर्शक म्हणून त्याची इनिंग इथेच थांबवू इच्छितो. निदान माधवनच्या बोलण्यातून तरी असेच दिसते. अलीकडेच माधवनने सांगितले की, त्याने दिग्दर्शनापेक्षा आता आता अभिनयावर लक्ष केंद्रित करावे अशी त्याची पत्नी सरिताची देखील इच्छा आहे.

नुकतेच, माध्यमांशी संवाद साधताना जेव्हा माधवनला विचारण्यात आले की, त्याचा पुन्हा चित्रपट दिग्दर्शित करण्याचा काही विचार आहे का? यावर तो म्हणाला, “मी पुन्हा चित्रपट दिग्दर्शित करेन असे वाटत नाही. ही खूप किचकट व कठीण प्रक्रिया आहे. ‘मूळतः रॉकेट्रीशी  संबंधित असलेल्या दिग्दर्शकाला त्याच्या आधीच्या प्रोजेक्ट्समुळे या प्रोजेक्टमधून बाहेर पडावे लागले. त्यामुळे मी ही जबाबदारी घेतली. माझ्याकडे इतर कोणाशीही बोलायला वेळ नव्हता. श्री नंबी यांनीही माझ्यावर विश्वास ठेवला. आणि मी दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली.” 

हा चित्रपट येत्या 01 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड