मनोरंजन

गठबंधनमध्ये अभिनेत्री सोनाली पंडीत नाईक साकारणार ‘डॉन’ची भूमिका

Trupti Paradkar  |  Jan 10, 2019
गठबंधनमध्ये अभिनेत्री सोनाली पंडीत नाईक साकारणार ‘डॉन’ची भूमिका

मराठी अभिनेत्री ‘सोनाली पंडीत नाईक’ एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. ‘गठबंधन’ या हिंदी मालिकेत ती ही हटके भूमिका साकारत आहे. सोनाली मालिकेत ती  ‘सावित्रीबाई’च्या भूमिकेतून दिसणार आहे. सावित्रीबाई या नावावरुन जरी ही भूमिका सोज्वळ वाटत असली तरी प्रत्यक्षात मात्र तसं मुळीच नाही. कारण सावित्रीबाई नावाच्या डोंबिवलीत राहणाऱ्या एका ‘डॉन’ची ही भूमिका आहे. कलर्स वाहिनी मनोरंजनात्मक मालिकांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर आधारित गठबंधन ही मालिका विषयानूसार थरकाप उडवणारी नक्कीच नाही. 15 जानेवारीपासून गठबंधन मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत सोनाली नाईक हिरोच्या आईची भूमिका साकारणार असून तिचं नाव सावित्रीबाई असं आहे. सावित्रीबाई एक सावकारी आणि खंडणी व्यवसाय करणारी महिला आहे. तिचा मुलगा रघु याने भविष्यात कुख्यात गुंड व्हावं असं तिचं स्वप्न आहे. नुकताच या मालिकेचा ट्रेलर शेअर करण्यात आला. या ट्रेलरमधील सोनालीचे डायलॉग खूपच मजेशीर आहेत. ती मालिकेत अगदी मराठमोळी नऊवारी साडी, नथ, मोठी टिकली अशा पेहरावामध्ये दिसणार आहे. शिवाय या ट्रेलरमधील तिची दमदार एन्ट्री देखील सर्वांना आश्चर्यचकीत करणारी आहे.

गठबंधन एक प्रेम कथा

गुंडगिरी करणारा सावित्रीबाईचा मुलगा ‘रघु’ आणि आयपीएस अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या महत्वकांक्षी ‘धनक’ची यांची ही प्रेमकथा आहे. या दोन्ही भूमिका एकमेकांपेक्षा अगदी विरुद्ध आहेत. रघु हा दहावी शिकलेला,मराठी कुंटूबातला,गुंडगिरी करणारा आहे तर धनक त्यापेक्षा अगदी विरुद्ध सुशिक्षित, महत्वकांक्षी आणि गुजराती मुलगी आहे.गुजरात मध्ये राहणारी धनक आयपीएस होण्यासाठी मुंबईमध्ये येते आणि गुंडगिरी करणाऱ्या रघूच्या प्रेमात पडते असं या मालिकेचं कथानक आहे. थोडक्यात एक गुंड आणि आयपीएस अधिकारी यांच्यामधील प्रेमकथा या मालिकेमधून पाहता येणार आहे. या मालिकेचा ट्रेलर सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री श्रुती शर्मा धनक ही भूमिका साकारत आहे तर अभिनेता अबरार काझी रघूच्या भूमिकेतून दिसणार आहे.  प्रत्यक्षात ही मालिका प्रेक्षकांचं मन किती जिंकते हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. जय प्रॉडक्शन ही कॉमेडी मालिका लवकरच प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

सोनाली पंडीत बऱ्याच वर्षांनी छोट्या पडद्यावर

सोनाली पंडीत बऱ्याच महिन्यांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येत आहे. सोनालीने याआधी बऱ्याच मराठी मालिकांमधून काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वीच संपलेल्या ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ मालिकेमध्येही सोनालीने काम केलं होतं. तसंच तिने अनेक मराठी नाटकांमधूनही काम केलं आहे. आता हिंदी मालिकेमध्ये सोनाली आपल्या अभिनयाची कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. शिवाय सोनालीने आतापर्यंत कधीही डॉनची भूमिका केली नाही. त्यामळे या मालिकेत ती डॉन असली तरीही काय वेगळेपणा असणार हे पाहण्याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From मनोरंजन