मनोरंजन

टीआरपीच्या स्पर्धेत नागिन 6 ने अखेर मारली बाजी, 4 थ्या स्थानावर झेप

Dipali Naphade  |  May 1, 2022
tejasswi-prakash-simba-nagpal-s-naagin-6-enters-the-trp-chart-in-marathi

मालिका म्हणजे प्रेक्षकांचा रोजचा मनोरंजनाचा एक अविभाज्य भाग. काही मालिका खूप आवडीने पाहिल्या जातात तर काही मालिकांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात. हाच खेळ रंगतो तो टीआरपीचा. टीआरपीच्या स्पर्धेत दर आठवड्याला मालिकांचा हा चढउताराचा खेळ चालू असतो. विशेषतः हिंदी मालिकांच्या बाबतीत हा खेळ खूपच रंगतो. आपल्याकडे कपोलकल्पित अशा मालिका जास्त पाहिल्या जातात हेच या टीआरपीच्या खेळावरून दिसून येतं. एडिटिंग, विषय अथवा मालिकेतील काम करणारे कलाकार कसा अभिनय करत आहेत, हे कधी कधी काही मालिकांच्या बाबतीत फारच दुय्यम ठरतं आणि मग अशा मालिकाही टीआरपीमध्ये वर दिसून येतात. अशीच एक मालिका म्हणजे नागिन 6. टीआरपीच्या  खेळात (TRP Race) ही मालिका चौथ्या क्रमांकावर आली असून प्रेक्षकांनी या आठवड्यात या मालिकेला उचलून धरले आहे आणि त्याचं कारण म्हणजे महाअसुराची मालिकेतील एंट्री आणि मालिकेतील मुख्य पात्र असणारी तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) अर्थात प्रथा आणि सिम्बा नागपाल (Simba Nagpal) अर्थात रिषभ यांच्या प्रेमाची केमिस्ट्री. 

महाअसुर आणि प्रेमाच्या केमिस्ट्रीमुळे घेतली झेप

एकता कपूरच्या (Ekta Kapoor) नागिन सिरीजमधील हा सहावा भाग सुरू आहे. सुरूवातीपासूनच या मालिकेला चांगला टीआरपी मिळत होता. मात्र टीआरपीच्या स्पर्धेत ही मालिका वर येत नव्हती. या आठवड्यात मुख्य कलाकारांच्या प्रेमाची केमिस्ट्री आणि महाअसुर अर्थात सुधा चंद्रन (Sudha Chandra) च्या ट्विस्टमुळे या मालिकेने अचानक चौथ्या स्थानावर झेप घेत प्रेक्षकांमध्ये पुन्हा एकदा भाव खाल्ला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ही मालिका कपोलकल्पित आहे हे सर्वांनाच माहीत आहे आणि तरीही ही मालिका अगदी आवडीने सध्या पाहिली जात आहे, त्याचे कारण म्हणजे या मालिकेतील कलाकार आणि क्षणोक्षणी कथेमध्ये येणारे ट्विस्ट. दर शनिवारी आणि रविवारी केवळ दोनच दिवस ही मालिका दाखविण्यात येते आणि तरीही प्रत्येक भागात काहीतरी नवीन आणि कल्पनेपलीकडचे घडत असल्यामुळे ही मालिका अगदी आवडीने प्रेक्षकवर्गही पाहतो. या आठवड्यात या मालिकेने अनेक मालिकांना मागे सोडत चौथे स्थान मिळविले आहे. 

मनाला न पटणारे तरीही हवेहवेसे

नागिन मालिकेतील पात्र अथवा काही ठिकाणी घडणाऱ्या घटना या तुटक आहेत, मनाला न पटणाऱ्या आहेत, काही भूमिका साकारणारे कलाकार खूपच लाऊड आहेत. या गोष्टी काही वेळा हास्यास्पद आणि मनाला न पटणाऱ्याही वाटतात. पण तरीही या मालिकेतील सतत घडणारे ट्विस्ट आणि टर्न (Twist and Turn) हे मात्र एकदा मालिका पाहायला लागल्यानंतर सतत पाहावी असेच आहेत. प्रेक्षकांचे मन जाणून आणि मानसिकता जाणून ही मालिका बनविण्यात आली आहे हे सहजपणाने कळून येते. अशा बऱ्याच घटना आहेत ज्या मालिकेत घडत असतात आणि त्या मनाला पटणाऱ्या नाहीत आणि तरीही प्रेक्षक खिळून राहतो हेच या मालिकेचे सध्याचे यश आहे असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. आता ही मालिका मनोरंजक वळणावर आली असून प्रथा अर्थात शेषनागिन पुढे काय करणार, आपलं प्रेम महत्त्वाचं की देश महत्त्वाचा असे अनेक प्रश्न प्रेक्षकांनाही सतावत आहेत आणि त्यासाठी ही मालिका बघणं हा एकच पर्याय आहे. कितीही हसू आलं अथवा मेंदूला पटलं नाही तरीही अनेक प्रेक्षक आहेत, ज्यांनी या मालिकेला उचलून धरलं आहे आणि म्हणूनच टीआरपीच्या स्पर्धेत या मालिकेने स्थान मिळवलं आहे हे विसरून चालणार नाही! 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन