दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाश आणि ऐश्वर्याचा सण… लक्ष्मी मातेची कृपा व्हावी यासाठी दिवाळी आधी घर स्वच्छ करून घराची सजावट केली जाते. कारण असं म्हणतात ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मी मातेला राहायला आवडतं. आपल्या घरावर लक्ष्मीमातेची कृपा व्हावी यासाठी दिवाळीआधी प्रत्येकजण घराची स्वच्छता करतो. जर यंदा घर स्वच्छ करताना तुम्हाला काही गोष्टी सापडल्या तर ते तुमच्यासाठी शुभसंकेत असू शकतात. कारण साफसफाई करताना या गोष्टी सापडणे म्हणजे लवकरच तुमच्यावर लक्ष्मीमातेचा वरदहस्त असणार याचं लक्षण मानलं जातं. तसंच तुमच्याप्रमाणेच लक्ष्मीमातेचे कृपाछत्र कायम सर्वांवर राहण्यासाठी प्रियजनांना द्या दिवाळी शुभेच्छा संदेश, धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा, लक्ष्मीपूजा शुभेच्छा मराठी
दिवाळीच्या साफसफाईमध्ये या गोष्टी सापडणं आहेत शुभसंकेत
दिवाळीला काही दिवस असतानाच घरात स्वच्छता मोहीम सुरू होते. अडगळीच्या जागा, माळे, बाल्कनी, किचन अशा गोष्टी नीट स्वच्छ केल्या जातात. बाल्कनी अथवा अंगण स्वच्छ करून तिथे रांगोळी काढली जाते. घराची साफसफाई करताना जर तुम्हाला या गोष्टी सापडल्या तर लवकरच तुमच्या जीवनात भाग्योदय होणार हे ओळखा.
जुन्या पाकीटात पैसे सापडणे
बऱ्याचदा कपाट साफ करताना तुम्हाला जुनी पाकीटे, पर्स, बटवे मिळू शकतात. वापरात नसलेल्या या पर्समध्ये जर तुम्हाला पैसे सापडले तर ही गोष्ट एक शुभसंकेत असू शकतो. तुम्ही पाकीटात ठेवलेले पैसे तुम्ही विसरला असाल आणि अचानक तुम्हाला साफसफाई करताना ते मिळाले तर लवकरच तुम्हाला धनलाभ होणार हे ओळखा. याचा अर्थ लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न असून तुमच्या जीवनात सुख, समृद्धीची बरसात होणार आहे.
देव्हाऱ्यात मोराचे पंख सापडणे
दिवाळीच्या साफसफाईमध्ये देवघर अथवा देवपूजेचे साहित्य स्वच्छ करणेही असते. अशा गोष्टी स्वच्छ करताना जर तुम्हाला मोराचे पंख मिळाले तर हा एक चांगला संकेत आहे. बऱ्याचदा श्रीकृष्णाची पूजा करण्यासाठी घरात मोराचे पंख ठेवले जातात. काही लोकांचे मोर हे दैवत असल्यामुळे त्यांच्या घरी त्याचे प्रतिक म्हणून मोराचे गळलेले पंख पूजेसाठी ठेवण्यात येतात. दिवाळीच्या साफसफाईत असे मोराचे पंख सापडणे हा एक चांगला संकेत असून याचा अर्थ लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न आहे. कारण लक्ष्मी माता ही श्री विष्णूची पत्नी असून श्रीविष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाला मोरपंख प्रिय असतात.
स्वयंपाकघरात तांदूळ सापडणे
बऱ्याचदा घरात खूप धान्य भरून ठेवले जाते. किचन मोठं असेल तर काही सामान ठेवल्यानंतर त्याचा तुम्हाला विसर पडतो. मात्र साफसफाई करताना त्या गोष्टी तुम्हाला नकळत सापडतात. असंच जर तुमच्यासमोर तांदूळ आले जे तुम्ही डब्यात ठेवून विसरला होतात तर हा एक सुंदर योगायोग आहे. कारण याचा अर्थ तुमच्या घरात सुखसमृद्धी आणि भरभराट होणार आहे. कारण तांदूळ हे माता लक्ष्मी आणि शुक्र ग्रहाला प्रिय आहे. मात्र लक्षात ठेवा सापडलेले तांदूळ भात शिजवण्यासाठी न वापरता पूजापाठ करण्यासाठी अथवा दानधर्म करण्यासाठी वापरा.
लाल रंगाचे कापड सापडणे
दिवाळीच्या साफसफाईमध्ये तुम्हाला तुमच्या घरात कुठेतरी ठेवलेले लाल रंगाचे कापड सापडले तर हादेखील एक छान योगायोग आहे. लाल रंग लक्ष्मीमातेला खूप प्रिय आहे. त्यामुळे लाल रंगाचे कोरे कापड सापडणे हे तुमच्यासाठी सौभाग्याचे लक्षण असू शकते. याचा अर्थ तुमचे भविष्य अतिशय उज्जल असून लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर कायम राहणार.
शंख अथवा कवडी सापडणे
घरात पूजेच्या साहित्यामध्ये शंख अथवा कवड्या ठेवलेल्या असतात. शंख आणि कवडी हे लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे. त्यामुळे देवघर स्वच्छ करताना तुमच्यासमोर शंख आणि कवड्या आल्या तर लवकरच तुमच्यावर लक्ष्मीमातेची कृपा होणार आहे. अशा वेळी शंख आणि कवड्या स्वच्छ धुवा आणि कोरड्या कापडाने स्वच्छ करून त्या कपाटात पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा.