आरोग्य

क्षयरोगाचा गर्भधारणेवरही होतो परिणाम – डॉक्टरांचा इशारा

Dipali Naphade  |  May 22, 2022
tuberculosis-also-affects-pregnancy-doctor-s-warning-in-marathi

क्षयरोग (टीबी) (Tuberculosis) फुफ्फुसावर गंभीर परिणाम करतोच, परंतु गर्भाशयात आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये देखील क्षयरोग पसरू शकतो. ज्यामुळे गर्भधारणा गुंतागुंत किंवा वंध्यत्वाचा सामना करावा लागू शकतो. गर्भधारणेदरम्यान होणारे क्षयरोगाचे निदान गर्भवती महिलांसाठी आणि बाळासाठीही धोकादायक असू शकते, जर योग्य वेळी उपचार केले नाहीत तर धोका निर्माण होऊ शकतो. टीबीमुळे होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

क्षयरोग (टीबी) हा एक जीवघेणा संसर्गजन्य रोग

क्षयरोग (टीबी) हा एक जीवघेणा संसर्गजन्य रोग आहे जो फुफ्फुसावर परिणाम करतो. हे मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होते. क्षयरोगाला आमंत्रण देणारे जिवाणू खोकताना आणि शिंकताना हवेमार्गे एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे पसरतात. खोकला, छातीत दुखणे, वजन कमी होणे, भूक न लागणे, थकवा, ताप, रात्री घाम येणे आणि थंडी वाजून येणे ही टीबीची लक्षणे आहेत. टीबीचे प्रकारातील ऍक्टीव्ह टीबी हा एक आजार आहे ज्यामध्ये टीबीचे जीवाणू झपाट्याने वाढतात आणि शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर आक्रमण करतात. मिलिटरी क्षयरोग हा संपूर्ण फुफ्फुसाच्या ऊतींना प्रभावित करतो आणि गंभीर समस्या निर्माण करू शकतो आणि गर्भवती महिलांना टीबीचा त्रास होऊ शकतो. क्षयरोगाच्या गुंतागुंतीमध्ये गर्भपात, मुदतपूर्व प्रसूती, कमी वजनाचे बाळ आणि नवजात बालकांमधील मृत्यूदर यांचा समावेश होतो. गरोदरपणात सक्रिय टीबीचा संसर्ग झाल्यास आई आणि बाळाला धोका होऊ शकतो. परंतु उपचाराने सर्व गुंतागुंत टाळता येतात. क्षयरोग केवळ फुफ्फुसांवरच नाही तर इतर अनेक अवयवांना देखील प्रभावित करू शकतो जसे की हाडांची त्वचा, आतडे, गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब्स इत्यादी अवयवयांवर तसेच जननेंद्रीयावर दुष्परिणाम करु शकतो असे  डॉ. पद्मा श्रीवास्तव, सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, लुल्लानगर, पुणे यांनी स्पष्ट केले.

क्षयरोग हा छातीशी संबंधित पण इतर अवयवांवरही परिणाम 

डॉ. भारती ढोरेपाटील, सल्लागार वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, नोव्हा फर्टिलिटी, पुणे सांगतात की, बहुतेकदा लोक असे मानतात की क्षयरोग हा छातीशी संबंधित आहे परंतु हा  इतर अवयवांवर देखील परिणाम करतो. मेंदू, यकृत, हाडे आणि इतर अवयवांवर, सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुनरुत्पादक आरोग्यावर दुष्परिणाम करू शकतो. पुनरुत्पादक आरोग्याच्या बाबतीत, क्षयरोगाचे जीवाणू (टीबी बॅसिलस) फॅलोपियन ट्यूबला संक्रमित करतात आणि यामुळे फॅलोपियन ट्यूबमध्ये अडथळा येऊ शकतो. दुसरे म्हणजे, ते गर्भाशयाच्या अस्तरावर परिणाम करते ज्यामुळे एंडोमेट्रियमचे अस्तर पातळ होते आणि मासिक पाळी कमी होते. फॅलोपियन ट्यूब्सचा अडथळा आणि एंडोमेट्रियमचे अस्तर पातळ झाल्यामुळे प्रजनन समस्या उद्भवतात.

गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या महिलांसाठी जननेंद्रियाचा क्षयरोग हा चिंतेचा विषय आहे कारण त्यांना प्रजननासंबंधी समस्या येऊ शकतात. जरी त्याचा त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नसला तरीही, त्यांच्या मासिक पाळीत समस्या येण्याची दाट शक्यता असते. क्षयरोगाचा परिणाम फॅलोपियन ट्यूबवर होत असल्याने, फलित अंडी नलिकेत प्रवेश करू शकत नाही आणि गर्भाशयात पोहोचू शकत नाही. जर एंडोमेट्रियमच्या अस्तरावर परिणाम झाला असेल, तर गर्भाशयात फलित भ्रूण रोपण होत नाही. अंड्यांची गुणवत्ता राखीव अंडयांची क्षमता कमी होते.

डॉ भारती पुढे सांगतात, जननेंद्रियाचा क्षयरोग हा एक सायलेंट किलर आहे, ज्यामध्ये वंध्यत्वाशिवाय कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मासिक पाळी वेळेवर न येणे, ओटीपोटात दुखणे आणि योनीतून असामान्य स्त्राव असलेले रुग्ण केवळ काही टक्के आहेत. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या किंवा कर्करोग, मधुमेह आणि एचआयव्ही सारख्या रोगांचे निदान झालेल्या लोकांना जननेंद्रियाच्या क्षयरोगाचा धोका जास्त असतो. जननेंद्रियाच्या टीबीमुळे गर्भपात आणि एक्टोपिक गर्भधारणा होऊ शकते. एंडोमेट्रियल बायोप्सी, मासिक पाळीच्या रक्ताची चाचणी जननेंद्रियाच्या टीबीचे निदान करण्यात मदत करू शकते. लेप्रोस्कोपी जननेंद्रियाच्या अवयवांना झालेले नुकसान समजण्यास मदत करू शकते. जननेंद्रियाच्या क्षयरोगाचा शोध लागताच त्याचा सामना करणे आवश्यक आहे. जननेंद्रियाचा क्षयरोग असलेल्यांवर एटीटी (अँटी-ट्यूबरक्युलर उपचार) उपचार केले जातात. त्याचे वेळीच निदान झाल्यास गर्भधारणेत अडचणी असल्यास दूर करता येतात. जननेंद्रियाच्या टीबी असलेल्या महिला आयव्हीएफ सारख्या सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञानाच्या (एआरटी) मदतीने गर्भधारणा करू शकतात. त्यांच्यावर फक्त आयव्हीएफ (टेस्ट ट्यूब बेबी) IVF Test Tube Baby उपचार केले जाऊ शकतात.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य