मनोरंजन

जागतिक पुस्‍तक दिनानिमित्त मालिकांमधील कलाकारांनी व्यक्त केले वाचनप्रेम

Trupti Paradkar  |  Apr 22, 2021
जागतिक पुस्‍तक दिनानिमित्त मालिकांमधील कलाकारांनी व्यक्त केले वाचनप्रेम

२३ एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरात पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक पुस्तक दिन का साजरा केला जातो यामागे खूप मोठा इतिहास आणि महत्त्व आहे. आज जगभरातील जवळजवळ १०० हून अधिक देशांमध्ये २३ एप्रिलला पुस्तक दिन साजरा केला जातो. प्रत्येक देशातील लोकांची जागतिक पुस्तक दिन साजरा करण्याची पद्धत निरनिराळी आहे. कुणी या दिवशी विनामुल्य पुस्तके वाटतं तर कुणी वाचनसभा अथव मॅरॉथॉन आयोजित करतं. पद्धत कोणतीही असली तरी यामागचा उद्देश सर्वांचा एकच आहे. तो म्हणजे सर्वांना वाचनाची गोडी लागावी. मागच्या वर्षीप्रमाणेच यंदादेखील कोरोनामुळे मात्र हा उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा करता येणार नाही. म्हणूनच यंदाची जागतिक पुस्तक दिनाची थीम आहे ‘Share a Story’ शेअर अ स्टोरी. या थीममागचा उद्देश आहे आपल्याजवळील कथा, किस्से इतरांसोबत शेअर करत त्यांना प्रोत्साहन देणे. पुस्तके जीवनामध्ये नेहमीच दिशादर्शकाचे काम करतात. यासाठीच मालिकांमधील काही कलाकारांनीदेखील जागतिक पुस्तक दिनानिमित्त खास संदेश आणि त्यांची आवडती पुस्तके चाहत्यांसोबत शेअर केली आहेत. 

पुस्तकांविषयी काय म्हणाले मालिकांमधील हे कलाकार

घरातील ड्रॉइंग-रूमचा एक आवश्‍यक भाग असण्‍यासोबतच नेहमीच्या प्रवासातील सर्वोत्तम सोबती असण्‍यापर्यंत पुस्‍तक तुम्हाला साथ देतात. खरीखुरी प्रत असो किंवा ई-व्‍हर्जन असो पुस्‍तक वाचण्‍याच्‍या आनंदाला कोणतीच सीमा नाही. पुस्‍तक वाचण्‍याच्‍या महत्त्वाबाबत सांगताना ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील कटोरी अम्‍मा म्हणजेच (हिमानी शिवपुरी) आणि  ‘भाबीजी घर पर है’या मालिकेमधील मनमोहन तिवारी (रोहिताश्‍व गौड) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्‍यांच्‍या मते, पुस्‍तके त्‍यांच्‍या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग असून त्यामध्ये ते वास्‍तविकता निर्माण करण्याची जादू आहे.

यासोबत वाचा पु.ल. देशपांडे यांची पुस्तके, मराठी ऐतिहासिक कादंबरी, बेस्ट रोमॅंटिक कादंबरी आणि बरंच काही…

हिमानी शिवपुरी

हिमानी शिवपुरी यांनी शेअर केलं की, ”पुस्‍तक हा माझ्या जीवनाचा अविभाज्‍य भाग आहे. मी अगदी लहान वयातच वाचनाला सुरूवात केली आणि त्‍यानंतर मी माझे आवडते लेखक व शैलींची लहान लायब्ररीच घरात बनवली आहे. पुस्‍तक वाचनाची आवड ही अशी एक आवड आहे जी कोणीही सहज अंगिकारू शकतो. माझ्या बालपणापासूनच मी किताबी किडा होते. मी माझ्या आवडत्‍या लेखकांची पुस्‍तके वाचण्‍यामध्‍ये इतकी गुंतून जायची की माझ्या अभ्‍यासाच्‍या पुस्‍तकांकडे मी लक्षच द्यायची नाही. अर्थातच, यामुळे मला परीक्षेच्‍या वेळी खूपच मेहनत घ्‍यावी लागायची, पण मला तर वाचनाची आवडच जडली होती. ‘मला सर्वाधिक आवडलेली पुस्‍तके म्‍हणजे ‘गॅब्रियल गार्सिया मार्कीझ यांचे वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड’, ‘पोलो कोएल्‍हो यांचे दि आल्‍केमिस्‍ट’, ‘ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी’, ‘खालीद हुसैनी यांचे दि काइट रनर’, ‘अमिष यांचे दि शिवा ट्रायलॉजी’ आणि झुम्‍पा लहिरी व अरूंधती रॉय यांची अनेक पुस्‍तके. यंदाच्‍या जागतिक पुस्‍तक दिनानिमित्त मी आवाहन करते की, तुम्‍ही तुमच्‍या जीवनशैलीमध्‍ये वाचनाचा समावेश करा. वाचनामुळे संवाद कौशल्‍यामध्‍ये सुधारणा होते, तसेच पुस्‍तके जीवनाकडे नवीन दृष्टिकोनातून पाहण्यास शिकवतात.

वाचा मराठीतील प्रसिद्ध आत्मचरित्रपर कादंबरी, छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तके

रोहिताश्‍व गौड

रोहिताश्‍व गौड म्‍हणाले की, ”एकांतामध्‍ये पुस्‍तक माझे सोबती असतात. जेव्हा मला खचून गेल्‍यासारखे वाटते, तेव्‍हा कोणाचा आधार घ्‍यावा हे मला माहीत आहे. यासाठी मी माझ्या घरामध्‍ये माझ्यासाठी एक आनंदी कोपरा बनवला आहे, जेथे मी पुस्‍तके वाचत वेळ घालवतो  आणि एका नवीन विश्‍वात रममाण होतो. हातामध्‍ये एक कप चहा व सोबत पुस्‍तक असलं की माझा सर्व कंटाळा निघून जातो. मला माझ्या आवडीनुसार पुस्‍तकांचा क्रम लावायला देखील आवडतं. कारण यातून मला एक आत्मिक समाधान मिळते. पण माझ्या आवडत्‍या पुस्‍तकांमधून काहींची निवड करण्‍यास मला कोणी विचारले की मात्र ते माझ्यासाठी ते खूपच अवघड ठरतं. मला नाटकांची पुस्‍तके आणि व्‍यंग वाचायला खूप आवडतं. मला शरद जोशी, प्रेमचंद, हरिचंद्र, विजय तेंडुलकर, मोहन राकेश यांची पुस्‍तके व नाटके वाचायला आवडतात. मी त्‍यांची पुस्‍तके हजारो वेळा वारंवार वाचू शकतो. जागतिक पुस्‍तक दिनानिमित्त मी सर्व वयोगटातील लोकांना किमान १५ मिनिटे एखादे पुस्‍तक वाचण्‍यास सुरूवात करण्‍याचे आणि हळूहळू वाचनाची गती व आवड वाढवत पुस्‍तकांची संख्‍या वाढवण्‍याचे आवाहन करतो. पुस्‍तके वाचणे हा छंद असण्‍यासोबत उत्तम जीवनाचा मार्ग ठरू शकतो.”

 

 

Read More From मनोरंजन