पूर्वी लग्न किंवा एखादा कार्यक्रम म्हटला की, मस्त पनीरची भाजी किंवा काहीतरी चमचमीत खायला मिळणार. त्यामुळे लग्नात खास जेवायला जाण्याची सगळ्यांची घाई असायची. पण आता लग्नाचे जेवण हे काही विशेष राहिलेले नाही. कारण आता लग्नासारखे जेवण सहज उपलब्ध झालेले आहे. सध्या लग्नाचा सीझन सुरु झाला आहे. अनेकांची लग्नाची आमंत्रण तुम्हालाही आली असतील. लग्नाच्या जेवणानंतर अनेकांच्या पोटाचे आरोग्य बिघडते. तुमच्याही पोटाचे आरोग्य खराब होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करायला हव्यात.
आधी मेनू पाहा
लग्नात आल्यानंतर लग्नाचा मेनू आधी पाहा. मेनूमध्ये असलेल्या भाज्या, सलाद, डाळ- राईस, चायनीज, इटालियन असे अनेक प्रकार असतात. लोकांच्या चवीनुसार वेगवेगळे पदार्थ यात सगळेच ठेवतात. अनेकदा आपण सगळे काही टेस्ट करुन बघू असे म्हणत म्हणत संपूर्ण ताट भरतो. वेगवेगळे पदार्थ खाता खाता अनेकदा नको असलेल्या गोष्टी देखील आपल्या ताटात घेतल्या जातात. असे काही करण्यापेक्षा तुम्ही सगळ्यात आधी लग्नातला मेनू पाहून घ्या. कारण आपल्याला तेवढा वेळ नक्कीच असतो.
काय खाल? काय टाळाल?
आता मेनू पाहिल्यानंतर त्यातील कोणत्या गोष्टी तुम्ही आहारात घ्यायला हव्यात आणि कोणत्या नको याचा विचार करायला हवा. लग्नाचे जेवण खास असले तरी देखील तुमच्या पोटासाठी योग्य असतील अशाच गोष्टी तुम्ही निवडायल्या हव्यात. उदा. काही जणांना मैदा अजिबात चालत नाही. अशावेळी मैद्यापासून बनवलेल्या रोटी खाणे टाळा. या रोटी खूप चिवट असतात. त्या खाल्ल्याही जात नाही. खूप जणांना मसालावाले जेवणही चालत नाही. अशावेळी जर तुम्हाला भाज्यांमधील मसाला सहन होत नसेल तर तुम्ही मसालेदार पदार्थ घेणे टाळा. त्या ऐवजी पोटाला थंडावा देणारे पदार्थ तुमच्या ताटात असू द्या. जास्तीत जास्त सलादवर भर द्या. इतरवेळी आपण जसे जेवण करतो. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही डाळ- भात, भाजी-पोळी घ्या. म्हणजे तुम्हाला पोट खूप भरल्यासारखे वाटणार नाही.
यामुळे बिघडू शकते पोटाचे आरोग्य
पोटाचे आरोग्य बिघडणे म्हणजे खूप जणांना असे जेवण जेवल्यानंतर पोटात कळ येते. शौचाला पातळ होते. याचे कारण हे वेगवेगळ्या पद्धतीचे जेवण जेवणे. चायनीज, इटालियन अशा पद्धतीचे जेवण असेल तर त्याची सवय आपल्याला फारशी नसते. हे जेवण सपक असले तरीदेखील ते पचण्यास फारच जड असतात. त्यामुळे पोटाचे आरोग्य बिघडू शकते. जेवणात असलेले असे पदार्थ तुम्ही टाळलेले बरे.
जेवणात ठेवा अंतर
लग्नाचे जेवण जेवल्यानंतर काही काळ काहीही खाण्याची इच्छा होत नाही. काही वेळ तरी पोट फुगल्यासारखे वाटते. अशावेळी तुम्ही थोडे जेवणाचे लंघन केले तरीदेखील चालू शकते. लंघन करणे शक्य नसेल तर असे जेवण जेवल्यानंतर तुम्ही हमखास खिचडी, सूप, तूप असे काही पदार्थ खाल्ले की, पोट थंड राहण्यास मदत मिळते.
आता लग्नात जेवणासाठी गेल्यावर तुम्ही या काही टिप्स नक्की फॉलो करायला हव्यात.