कोरोना व्हायरसचा परिणाम तुमच्या शरीरावरच नाही तर मनावरही होतो. ज्यामुळे शारीरिक आरोग्य तर बिघडतेच पण मानसिक आरोग्यावरही याचे वाईट परिणाम जाणवतात. ज्यामुळे जे लोक सध्या कोरोनातून बरे होत आहेत त्यांना झोप न लागण्याची समस्या आढळून येत आहे. या समस्येलाच कोविड सोमनिया असं म्हणतात. कोरोनामुळे या रुग्णांच्या झोपेचं चक्र बिघडतं आणि त्यांना रात्रभर थोडीदेखील झोप येत नाही. अनिद्रा आणि कोविड या दोन्ही त्रासांमुळे सध्या काही रुग्ण खूपच चिंतीत झालेले दिसून येत आहेत. यासाठीच सर्वांना कोविड सोमनिया, याची लक्षणं आणि त्यावरील उपचार माहीत असायला हवे.
कोविड सोमनियाचे कारण काय
कोविड सोमनिया होण्याचे मुख्य कारण रुग्णाला कोविड संक्रमणातून बाहेर पडण्यात वाटत असलेली असुरक्षितता आणि भीती आहे. कारण एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला तर त्याला स्वतःला कुटुंबापासून दूर ठेवणं, कुटुंबाच्या सुरक्षेची भीती वाटणं, कोरोनातून कधी बरं होणार याविषयी चिंता असणं यातून त्याच्या मनावर ताण निर्माण होतो. कुटुंबापासून दूर राहणं, आयसोलेशनमध्ये वाटणारे एकटेपण या सर्वांचा या ताणावर अधिक परिणाम होतो. ज्यामुळे आयसोलेशन आणि त्यानंतर रिकव्हर होण्याच्या काळात रुग्णाला कोविड सोमनिया झाल्याचे जाणवते. या काळात रुग्णाला थोडीदेखील झोप येत नाही. ज्यामुळे त्याची मानसिक स्थिती अधिकच खराब होते.
कोविड सोमनियापासून कसा बचाव करावा –
कोविड सोमनियापासून वाचण्यासाठी कोरोना झालेल्या लोकांनी या गोष्टी आवर्जून करणं गरजेचं आहे.
- डेलि रूटिनमध्ये बदल करा. याशिवाय कोरोनाच्या काळात दिवसा झोपणे टाळा ज्यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोप येईल
- कोरोनातून बरं होताना लॉकडाऊनमुळे तुमच्या व्यायाम आणि शारीरिक हालचालीवर निर्बंध येत असले तरी घरातल्या घरात वॉक, योगासने आणि मेडिटेशनचा सराव करा
- जर तुम्ही या काळात वर्क फ्रॉम होम करत असाल तर ठराविक वेळेनंतर एक ब्रेक घ्या. कारण खूप वेळ स्क्रिन पाहिल्यामुळे तुमच्या डोळ्यांवर ताण येतो ज्यामुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागत नाही
- जर तुम्हाला ताप असेल अथवा तोंडाला चव नसेल तर यामुळेही तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. यासाठीच तुम्हाला आवडतील, तोंडाला चव आणतील असे पोषक पदार्थ खा
- तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार दिवसभर काही तरी शारीरिक व्यायाम करणाऱ्या गोष्टी करा. अंगात ताकद नसेल तर फार कष्टाची कामे करू नका मात्र थोडीफार हालचाल करायलाच हवी
- आहाराकडे नीट लक्ष द्या. आहारात जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या आणि फायबरयुक्त पदार्थ असतील तर तुम्हाला एकाच ठिकाणी बसल्यामुळे अपचनाच्या समस्या होणार नाहीत
- टिव्हीवरील बातम्या, सोशल मीडिया यांच्यापासून काही दिवस लांब राहा
- झोपताना एक तास आधी तुमचा मोबाईल, टिव्ही अथवा लॅपटॉप बंद करा
- झोपण्याआधी एखादं सकारात्मत विचारांचं पुस्तक वाचा, लाईट म्युजिक ऐका अथवा तुम्हाला बरं वाटेल असा कोणताही छंद जोपासा
- झोपण्यापूर्वी अर्धा तास खोलीतील वातावरण झोपेला पूरक आणि पोषक बनवा, दिवे बंद करा, प्रार्थना करा अथवा मेडिटेशन करा
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
कोरोनाच्या काळात दररोज सकाळी का करायला हवं मेडिटेशन
कोविडमधून बरे झाल्यावर का लागू शकते फिजिओथेरपीची गरज