“पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यांवरती…” किंवा “इन आखों की मस्ती के…” अशी सदाबहार गाणी आपण नक्कीच ऐकली असतील. डोळ्यांच्या दिलखेचक अदांवर आतापर्यंत अनेकांनी कितीतरी चारोळ्या आणि कविता लिहील्या असतील. कितीतरी शायरी आणि गझलांमधून प्रेयसीच्या डोळ्यांचे सौदर्य अनेकांनी जगासमोर आणले असेल. थोडक्यात स्त्रीयांच्या सौंदर्यात डोळ्यांना फारच महत्त्व आहे.
0घनदाट पापण्या तुमच्या सुरेख डोळ्यांच्या सौंदर्यांमध्ये अधिकच भर घालतात. आजकाल पापण्या अधिक आकर्षक करण्यासाठी आर्टिफिशिअल आयलॅशेस, मस्काराचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र तुम्ही काही घरगुती उपाय करूनही तुमच्या पापण्या घनदाट करू शकता. यासाठी पापण्यांची काळजी कशी घ्यावी हे अवश्य वाचा.
डोळ्यांच्या पापण्यांची नियमित काळजी घेतल्यास तुमच्या डोळ्यांचे सौदर्य अधिक वाढू शकते. कारण असं केल्यामुळे तुम्हाला विनाकारण आर्टिफिशियल आयलॅशेस आणि मस्कारा वापरण्याची गरज नाही.
त्वचेच्या काळजीसाठी आपण अनेक सौदर्य उपचार करतो मात्र पापण्यांची काळजी घेण्यासाठी मात्र फारच कंटाळा करतो. पापण्या हा फारच नाजूक अवयव आहे. त्यामुळे पापण्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. म्हणूनच जर तुम्हाला वारंवार डोळ्यांना हात लावण्याची अथवा डोळे चोळण्याची सवय असेल तर ती ताबडतोब बंद करा. तसंच कधीच घाईघाईत डोळ्यांचा मेकअप काढताना तो रगडून काढू नका. कारण असं केल्यामुळे तुमच्या पापण्यांना तर त्रास होतोच शिवाय डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स आणि सुरकुत्याही येऊ शकतात. सतत डोळ्यांना हात लावल्यामुळे तुमच्या पापण्यांचे केस गळून विरळ होत जातात.
डोक्यावरील केसांप्रमाणे पापण्यांच्या केसांनांही दररोज ब्रश करणं गरजेचं असतं. ज्यामुळे पापण्यांवरील मेकअप आणि धुळ – प्रदूषण साफ होतं. नियमित स्वच्छता राखल्यामुळे पापण्यांना आक्सिजनचा मुबलक पूरवठा होतो आणि त्यांची वाढ चांगली होते. पापण्यांची स्वच्छता राखण्यासाठी एक छोटा आयलॅशेस ब्रश खरेदी करा. नेहमी मस्कारा काढून टाकल्यावरही पापण्यांवर हळूवार हा ब्रश फिरवा.
Also Read Vaseline Beauty Hacks & Daily Use Hacks In Marathi
व्हिटॅमिन आणि प्रोटीनयुक्त आहारामुळे तुमच्या पापण्यांचे केस घनदाट होतात. शिवाय पोषक आहार घेतल्याने तुम्ही फ्रेशदेखील दिसता. यासाठी आहारामध्ये फळे, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करा. पौष्टिक आहारामुळे तुमच्या पापण्यांचे पोषण होते आणि त्यांची योग्य वाढदेखील होते.
आजकाल सुंदर दिसण्यासाठी मेकअपमध्ये विविध आर्टिफिशिअल उत्पादनांचा वापर केला जातो. डोळ्यांच्या मेकअपसाठी आर्टिफिशियल आयलॅशेस वापरणेही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र वारंवार खोट्या पापण्यांचा वापर केल्यास तुमच्या नैसर्गिक पापण्यांचे नुकसान होऊ शकते. कारण आर्टिफिशियल आयलॅशेस लावण्यासाठी जो गोंद वापरण्यात येतो त्यामुळे तुमच्या डोळ्यांना खाज येऊ शकते. शिवाय ते लावताना तुमच्या नैसर्गिक पापण्यांचे केस ताणले जावून तुटण्याची शक्यता असते. पण जर तुम्हाला आर्टिफिशियल आयलॅशेस लावण्याची गरज असेल तर अगदी कधीतरी तुम्ही त्याचा वापर नक्कीच करू शकता मात्र वारंवार त्याचा वापर करणे टाळा.
कदाचित हे ऐकल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे की वॉटरप्रूफ मस्कारामुळे तुमच्या पापण्यांचे नुकसान होऊ शकते. कारण वॉटरप्रूफ मस्कारा तुमच्या पापण्यांवर जास्त काळ टिकतो ज्यामुळे तो तुमच्या पापण्यांवर दुष्परिणाम करू शकतो. सतत वॉटरप्रुफ मस्कारा वापरल्यामुळे तुमच्या पापण्यांचे केस गळू लागतात. शिवाय वॉटरप्रूफ मस्कारा काढून टाकणंही जरा कठीणच असतं. हा मस्कारा काढण्यासाठी डोळ्यांना चोळावं लागतं. पापण्यांचे केस नाजूक असल्याने ते असे करताना तुटण्याची शक्यता असते.
काहीजणींना रात्री मेकअप न काढताच झोपण्याची सवय असते. असं केल्यामुळे तुमचा बेड तर खराब होतोच शिवाय तुमच्या त्वचा आणि डोळ्यांवरही त्याचा दुषपरिणाम दिसू लागतो. इनफेक्शन टाळण्यासाठी नेहमी तुमचा मेकअप काढून मगच झोपी जा. मेकअप काढून टाकण्यासाठी चांगल्या क्लिनझरचा वापर करा. नारळाच्या तेलानेही तुम्ही मेकअप काढू शकता. जीवनशैलीमध्ये चांगले बदल केल्याने तुमच्या आरोग्य आणि सौदर्यावर याचा चांगला परिणाम दिसून येईल. तुमच्या पापण्यांचे केस यामुळे नक्कीच चांगले दिसू लागतील.
मेकअप करताना नेहमी आर्टिफिशिअल लॅशेस लावून डोळे आकर्षक करण्यापेक्षा काही घरगुती उपाययोजनांनी देखील तुम्ही पापण्यांचे केस घनदाट करू शकता. घरातील काही नैसर्गिक पदार्थांमुळेही तुमच्या पापण्यांचे केसांची वाढ होऊ शकते.
नारळाचे तेल आणि दूध अनेक समस्यांवर गुणकारी औषध आहे. केसांचे सौदर्य वाढवायचे असो किंवा मग चेहऱ्याची त्वचा चमकदार करायची असो तुम्ही कशासाठीही नारळाचे तेल, क्रीम अथवा दूध वापरू शकता. पापण्यांच्या केसांची वाढ करण्यासाठीही नारळाचे दूध उपयोगी ठरू शकते. यासाठी एका भाड्यांमध्ये नारळाचे दूध घ्या त्यामध्ये कॉटन पॅड बुडवून ठेवा नंतर ते कॉटन पॅड तुमच्या डोळ्यांवर ठेवा. दहा ते पंधरा मिनीटे ते तुमच्या डोळ्यांवर ठेवून झोपून रहा. थोड्यावेळाने चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. महिन्यातून दोनदा हा प्रयोग केल्यास तुमच्या पापण्यांच्या केसांमध्ये अवश्य वाढ दिसून येईल.
लिंबाच्या सालींमध्ये व्हिटॅमिन सी, बी, फॉलिक अॅसिड आणि इतर पोषक तत्वांचा समावेश असतो. पापण्यांच्या केसांना घनदाट करण्यासाठी लिंबाच्या सालींचा तुम्हाला चांगला फायदा होईल. यासाठी एका वाटीमध्ये मुठभर लिंबाच्या साली घ्या. त्या वाटीमध्ये एक मोठा चमचा ऑलिव्ह ऑईल टाका आणि आठवडाभर त्या साली त्या तेलामध्ये भिजत ठेवा. एका आठवड्यानंतर आय लॅशेस ब्रशच्या मदतीने ते तेल तुमच्या पापण्यांना लावा. थोड्यावेळाने पापण्या आणि डोळे कोमट पाण्याने धुवून टाका. चार-पाच महिने असे केल्यास तुम्हाला पापण्यांवर चांगला परिणाम दिसू शकेल.
पापण्या सुंदर करण्यासाठी एरंडेल तेल फारच उपयुक्त ठरू शकते. कारण यामुळे तुमच्या पापण्यांचे केस घनदाट,मोठे आणि मजबूत होतात. एरंडेल तेल एक उत्तम मॉश्चराईझर असल्यामुळे पापण्यांंच्या केसांचे त्यामुळे चांगले पोषण होते. यासाठी तुमचा आय लॅश ब्रश एरंडेल तेलात बुडवा आणि हळूहळू हे तेल तुमच्या पापण्यांवर लावा. रात्रभर हे तेल तुमच्या पापण्यांवर असू द्या सकाळी कोमट पाण्याने पापण्या स्वच्छ करा. महिन्यातून तीनदा असे केल्यावर तुमच्या पापण्यांच्या केसांमध्ये चांगला बदल दिसू लागेल.
पेट्रोलियम जेली म्हणजेच व्हॅसलिन देखील पापण्यांचे केस वाढविण्यासाठी चांगले उपयुक्त ठरू शकते. नैसर्गिक तेलांप्रमाणेच पेट्रोलियम जेली तुमच्या त्वचेवर गुणकारी ठरते. यासाठी रात्री झोपताना आय लॅश ब्रशच्या मदतीने पेट्रोलियम जेली तुमच्या पापण्यांवर लावा आणि सकाळी कोमट पाण्याने डोळे स्वच्छ करा. तुम्ही फक्त पंधरा मिनीटेदेखील पेट्रोलियम जेली पापण्यांवर लावू शकता. आठवड्यातून तीन वेळा हा प्रयोग केल्यास तुम्हाला चांगला परिणाम मिळू शकतो.
कोरफड एक औषधी वनस्पती आहे हे आपण जाणतोच पण कोरफडीचा तुम्ही तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी देखील चांगला वापर करता येतो हे तुम्हाला माहित आहे का? यासाठी एक चमचा कोरफडाचं जेल घ्या त्यात जोजोबा ऑईल मिसळा. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून मस्कारा लावल्याप्रमाणे तुमच्या पापण्यांवर लावा. पंधरा मिनीटे ठेऊन नंतर डोळे आणि पापण्या कोमट पाण्याने धुवून टाका.
अंड्यांतील पौष्टिक गुणधर्मांचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम तर होतोच शिवाय ते तुमच्या सौदर्यांमध्येही अधिक भर घालू शकते. यासाठी एक अंडे फोडून त्यामध्ये एक चमचा ग्लिसरीन मिसळा. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करा आणि कापसाच्या मदतीने पापण्यांवर लावा. पंधरा मिनीटांनी डोळे थंड पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून तीन वेळा असं केल्यामुळे तुमच्या पापण्यांचे केस चांगल्या पद्धतीने वाढू शकतात.
ग्रीन टीचा पिण्यासोबत तुम्ही तुमच्या पापण्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापर करू शकता. कारण ग्रीन टी मधील पोषक घटकांमुळे तुमच्या पापण्या घनदाट होऊ शकतात. यासाठी ग्रीन टी मध्ये कॉटन पॅड बुडवून ते डोळ्यांवर ठेवा. ग्रीन टीमुळे तुमच्या पापण्या स्वच्छ तर होतीलच शिवाय घनदाटही होतील.
शीया बटरचा वापर मॉश्चराईर म्हणून केला जातो. यासाठी रात्री झोपताना शीया बटर तुमच्या पापण्यांवर लावा. शीया बटरमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई चे पोषकतत्व असतात. ज्यामुळे तुमच्या पापण्यांची चांगली वाढ होते. तुम्ही दररोज रात्री झोपताना पापण्यांना शीया बटर लावू शकता.
Read More: Uses Of Petroleum Jelly In Marathi
एखाद्या खास पार्टीसाठी तयार होताना डोळ्यांच्या मेकअप वर अधिक भर दिला जातो. काजळ, लायनरप्रमाणे मस्कारा लावल्याशिवाय तुमचा मेकअप पूर्णच होऊ शकत नाही. डोळ्यांच्या पापण्या घनदाट दिसाव्या यासाठी पापण्यांवर मस्कारा लावला जातो. मात्र हा मस्कारा योग्य पद्धतीने लावणं गरजेचं आहे. यासाठी मस्कारा लावण्याच्या या खास ट्रिक्स जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
1. मस्कारा लावण्याआधी पापण्या कर्ल करा आणि मगच मस्कारा लावा. ज्यामुळे तुमच्या पापण्या अधिक आकर्षक दिसतील. जर तुम्हाला आर्टिफिशियल आयलॅशेस लावायचे असतील तर ते लावल्यावर तुमच्या पापण्या आणि आर्टिफिशियल आयलॅशेस दोन्ही कर्ल करा आणि मग त्यावर मस्कारा लावा.
2. मस्कारा लावताना तो पापण्यांच्या मुळापासून टोकांपर्यंत लावा. ज्यामुळे पापण्या जास्त लांब दिसतील. वरच्या पापण्यांसाठी अपवर्ड स्ट्रोक आणि खालील पापण्यांसाठी डाऊनवर्ड स्ट्रोक्स लावा.
3. आय लॅश ब्रशवर थोडा थोडा मस्कारा घ्या. जास्त मस्कारा ब्रशवर लागला असेल टिश्यू पेपरने तो काढून टाका. तसेच जर पापण्यांवर जास्त मस्कारा लागला तर तो आय लॅश ब्रशच्या मदतीने साफ करा.
4. जर मस्कारा लावताना तो डोळ्यांच्या आजूबाजूला पसरला तर तो सुकल्यावर स्वच्छ करा. तुम्ही हा मस्कारा काढून टाकण्याकरता टिश्यू पेपर अथवा कापसावर पेट्रोलियम जेलीचा वापर करू शकता. जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेंसेस वापरत असाल तर डोळयांचा मेकअप करण्याआधी त्या लावा.
5. जर तुम्हाला मस्काराचे दोन कोट लावायचे असतील तर एक कोट सुकल्यावरच दुसरा कोट पापण्यांवर लावा.
‘या’ लाईफ चेजिंग मेकअप टीप्स तुम्हाला माहित असायलाच हव्या
फोटोसौजन्य – Shutter Stock