आमिर खान आणि त्याचं कामावर असलेलं प्रेम सर्वांना माहीतच आहे. यासाठीच त्याला बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट असं म्हटलं जातं. काही दिवसांपूर्वीच आमिर खान कोरोना संक्रमित झाला होता. मात्र कोरोनातून पूर्ण बरा होत त्याने पुन्हा कामाला सुरूवात केली आहे. सध्या आमिर खान त्याच्या आगामी चित्रपट लाल सिंह चड्ढाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लाल सिंह चड्ढाच्या शेवटच्या वॉर सीन्सचं शूटिंग लडाखमध्ये सुरु असून त्याचे काही फोटो आणि व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लाल सिंह चड्ढाची टीम लडाखला रवाना
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा बॉलीवूडवर संकट आलं आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्यामुळे सध्या अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांच्या शूटिंगवर बंदी आहे. त्यामुळे आमिर खानने त्याच्या लाल सिंह चड्ढाचे शेवटचे काही भाग लडाखमध्ये शूट करण्याचं ठरवलं आहे. आमिर खान सध्या सोशल मीडियापासून दूर आहे. कारण त्याने काही दिवसांपासून मोबाईल वापरणंही बंद केलं आहे. मात्र त्याच्या ऑफिशिअर इंस्टाग्रामवर त्याच्या टीमने या शूटचे काही फोटो शेअर केले आहेत. सध्या सुरु असलेलं शूटिंग या चित्रपटातील वॉर सीन्सचे आहे. जवळजवळ ४५ दिवस या ठिकाणी शूटिंग केलं जाणार आहे. या शेड्यूलमध्ये कारगीलमध्येही काही सीन्स शूट केले जाणार आहेत. या फोटोज आणि व्हिडिओजमध्ये आमिर खान कारगीलमधील सैन्यातील काही जवानांसोबत दिसत आहे. फोटोत सर्वांनी मास्क घातलेला असल्यामुळे शूटिंग दरम्यान कडक सुरक्षा पाळत असल्याचे दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा वॉर सीन पुर्वी परदेशात शूट केला जाणार होता. मात्र सध्या सुरू झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आणि अनेक ठिकाणी झालेल्या लॉकडाऊनमुळे हा सीन लडाखमध्ये शूट करण्याचा निर्णय आमिरने घेतला असावा.
कसा शूट केला जाणार लाल सिंह चड्ढाचा वॉर सीन
लाल सिंह चड्ढा हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचा रिमेक असणार आहे. फॉरेस्ट गंप हा ऑस्कर विजेता असून या चित्रपटात लोकप्रिय अभिनेता टॉम हॅक्सने मुख्य भूमिका साकारली होती. लाल सिंह चड्ढामध्ये मुख्य भूमिका आमिर खान साकारत आहे. या चित्रपटात आमिर सोबत करिना कपूरदेखील मुख्य भूमिकेत आहे. मात्र करिनासोबत असलेले सर्व सीन्स तिच्या डिलिव्हरीच्या आधीच शूट करण्यात आले होतं. खरंतर हा चित्रपट मागच्या वर्षी ख्रिसमला प्रदर्शित केला जाणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचे शूटिंग चांगलंच रखडलं आहे. मात्र या वर्षी तरी ख्रिसमसपर्यंत हा चित्रपट पूर्ण करण्याची आमिरची इच्छा आहे. आमिरचा हा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट असून लाल सिंह चड्ढाची कहाणी अतुल कुलकर्णीने लिहीली असून अद्वैत चंदन याचं दिग्दर्शन करत आहे. कथेनुसार या चित्रपटात कारगील युद्धातील काही सीन्स आहेत. एका सीक्वेन्समध्ये आमिरसोबत साऊथ अभिनेता नाग चैतन्य असण्याची शक्यता आहे. ही भूमिका पहिले विजय सेतुपती साकारणार होता. मात्र आता त्याला नाग चैतन्यने रिप्लेस केलं आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
मराठमोळा राहुल वैद्य ‘खतरों के खिलाडी’ होणार, 11 व्या हंगामासाठी होकार
तेजस्विनीनंतर आस्ताद काळेने सरकारवर ओढले ताशेरे, पोस्ट व्हायरल
या अभिनेत्री केवळ सौंदर्याची खाण नाहीत, तर हातात आहे कला