फिल्ममेकर संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटाचं फस्ट लूक पोस्टर नुकतंच सोशल मीडीयावर रिलीज करण्यात आलं. संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ या चित्रपटात अभिनेत्री दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत.
‘लकी’चं धम्माल पोस्टर
या पोस्टरमध्ये सिनेमातला मुख्य अभिनेता अभय महाजन क्लोथलेस धावत असून त्याने कमरेला फक्त ट्यूब टायर लावलंय. त्याच अवस्थेत तो रस्त्यावरून धावताना दिसतोय. मराठी सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच हिरोचा असा फोटो पोस्टरवर दिसत आहे.
क्लोथलेस हिरो अभय महाजन
या पोस्टरबाबत बोलताना अभय महाजन म्हणाला की, “लकी या तरूणाची ही मजेशीर कथा आहे. आणि ह्या सिनेमात मी अशा अनेक अनकन्वेशनल गोष्टी पहिल्यांदाच केल्या आहेत. दादां (संजय जाधव)च्या सिनेमाचा हिरो असणं ही खूप भारी गोष्ट आहे. आणि त्याहून भारी गोष्ट असते, ती म्हणजे त्या हिरोची ‘लक्षवेधी’ एन्ट्री.“ अभिनेता अभय महाजनला याने याआधी ‘गच्ची’ हा चित्रपट केला होता.
तसंच त्याने पीचर्स, व्हॉट्स युअर स्टेटस यांसारख्या वेबसीरिजमध्येही काम केलं आहे.
लकीमध्ये मिळणार बरीच सरप्राईजेस
आपल्या धम्माल चित्रपटाबद्दल फिल्ममेकर संजय जाधव यांनी दिलेली प्रतिक्रिया, “लकी ही आजच्या तरूणाईची कथा आहे. आजचे तरूण बिनधास्त आणि स्वच्छंद आहेत. त्यांची एकमेकांशी बोलण्याची भाषा खूप मोकळी-ढाकळी आहे. ते परंपरांगत काहीच करत नाहीत. त्यामूळे लकीमध्येही तुम्हाला अशी बरीच सरप्राइजेस मिळतील.”
मराठी सिनेमा टाकतोय कात
एमएसधोनी आणि फ्लाइंग जाटसारख्या सिनेमांचे निर्माते सुरज सिंग यांचा ‘लकी’ हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टी आणि ‘लकी’ बद्दल त्यांनी POPxoमराठीला प्रतिक्रिया दिली की,“मराठी तरूण आणि मराठी सिनेमा कात टाकतोय. आजच्या तरूणाईचा हा सिनेमा असल्याने तुम्हांला असे अनेक सुखद आश्चर्याचे धक्के मिळणार आहेत. संजयदादा (संजय जाधव)निखळ मनोरंजनासाठी लोकप्रिय आहेत, त्यामुळे त्यांच्या धाटणीची मनोरंजक फिल्म आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय.”
पोस्टरवरून एक गोष्ट मात्र नक्की हा सिनेमा धम्माल विनोदी असणार आहे. आता क्लोथलेस हीरोची कहाणी तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी मात्र 7 फेब्रुवारी 2019 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.