‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) ही मराठी मालिका खूपच प्रसिद्ध झाली. कथा आणि कलाकारांमुळे फारच कमी वेळात ही मालिक घरातघरामध्ये पोहचली. पण सर्वात जास्त ही मालिका गाजली ती अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांना मालिकेतून तडकाफडकी काढून टाकल्यानंतर. अचानक काहीही न सांगता मालिकेतून काढून टाकण्याचा आरोप किरण माने यांनी केला होता. तर काही कलाकार किरण मानेच्या बाजूने उभे ठाकले तर काही कलाकार त्याच्या विरोधात. अखेर ही मालिका आता बंद होणार आहे अर्थातच प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. किरण माने गेल्यानंतर या मालिकेच्या टीआरपीमध्ये खूपच घसरण झाली आणि याचे कारण म्हणजे किरण माने आणि निर्मात्यांमधील वाद असे आता म्हटले जात आहे. पण ही मालिका बंद होणार म्हटल्यानंतर आता किरण माने यांनी आपली प्रतिक्रिया देत पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट आणि किरण माने पुन्हा चर्चेत आले आहेत.
किरण मानेंची पोस्ट तुफान चर्चेत
‘मुलगी झाली हो’ या मालिकेमध्ये विलास पाटील हे प्रमुख पात्र किरण माने यांनी रंगवले. मात्र एका रात्रीत कोणतीही पूर्वसूचना न देता आपल्याला काढून टाकल्याचा आरोप सोशल मीडियावरच त्यांनी केला आणि त्यानंतर याची खूपच चर्चा झाली होती. राजकीय भूमिका घेतल्यामुळे आपल्यावर ही वेळ आली असल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले होते. पण त्यानंतर आता 3-4 महिन्यातच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे हे समजताच किरण माने यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. पुन्हा एकदा या प्रतिक्रियेमुळे किरण माने चर्चेत आले आहेत. किरण मानेने व्यक्त केल्या भावना –
प्रेक्षक लै लै लै नादखुळा असत्यात भावांनो… मला काल वाढदिवसाची सगळ्यात मोठी गिफ्ट कुनी दिली आसंल, तर ती प्रेक्षकांनी ! जी गोष्ट भलेभले करू शकले न्हाईत, ती त्यांनी एका रट्ट्यात केली !! एका माजोरड्या प्राॅडक्शन हाऊसचा नक्षाच उतरवला. कटकारस्थान रचून मला बाजूला केल्यानंतर त्या सिरीयलचा टीआरपी असा काय घसरला की चॅनलनं ती अख्खी सिरीयलच ‘प्राईम टाईम’मधून लाथ घालून हाकलली !!!
जी सिरीयल शहरी आणि ग्रामीण विभागात मिळून सलग दीड वर्ष बहुतांश एक नंबरवर आनि बर्याचदा पहिल्या तीन नंबरमध्ये असायची. ती तीन म्हैन्यात रसातळाला गेली. आता मे महिन्यापासून ती सिरीयल, अतिशय महत्त्वाच्या समजल्या जानार्या ‘स्पेशल प्राईम टाईम’ला दिसनार नाय. फक्त तीन म्हैन्यात हे घडलं. ह्याला म्हन्त्यात ‘पोएटिक जस्टिस’.
ही गोष्ट साधी नाय भावांनो. सर्वसामान्य जन्तेनं मनावर घेतलं तर काय होऊ शकतं याचं लै लै लै खतरनाक उदाहरन हाय. ‘खरा न्याय’ सर्वसामान्य जन्तेच्या दरबारात असतो. लोकप्रतिनिधी निवडतानाबी जन्तेनं अशीच ताकद दाखवली तर भल्याभल्यांना धोबीपछाड बसू शकते, हे इतिहासानं दाखवून दिलंय. “ये पब्लीक है ये सब जानती है” असं त्यो राजेश खन्ना डोळं मिचकावत म्हनत नाचायचा, ते काय खोटं न्हाय.
…कुनाला वाटत आसंल आता किरन माने नाचत आसंल, खुश झाला आसंल. नाय भावांनो. लढाई संपलेली नाय. मी कायदेशीर मार्गानं लढून तो न्यायबी मिळवनारच हाय. सुट्टी देनार नाय या भंगारांना. पन काही ‘बिकाऊ’ कलाकारांनी माझ्यावर जे आरोप केले, त्या सगळ्यांना प्रेक्षकांनीच सनसनीत, कचकटून थोबाडीत देऊन उत्तर दिलं याचं समाधान मात्र नक्की हाय.
कुनीतरी सांगीतलं की ती सिरीयल आता दुपारी दाखवनारेत. हे तर लै बेक्कार भावांनो. एखाद्या यशस्वी पोलीस इन्स्पेक्टरचं अचानक एक दिवस डिमोशन करून त्याला ट्रॅफिक हवालदारची ड्यूटी द्यावी तसं हाय हे ! यातही समाधान हे की जे बिचारे हातावर पोट असनारे असत्यात ते स्पाॅटबाॅय पासून मेकअपमन हेअरड्रेसर पर्यन्त त्यांचं पोट सुरू र्हानार. बाकी माजोरडे कलाकार कर्मानं मरनार. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी गत हुनार. जिथं फुलं वेचली तिथं गवर्या वेचायची वेळ येनार. असो. माझ्यावर कटकारस्थान रचून फायदा कुनाचा झाला आनि नुकसान कुनाचं झालं यावर एक चिंतन शिबीर घ्यावं त्यांनी.
बाकी वाढदिवस लैच भारी गेला. तुमच्या शुभेच्छांच्या वर्षावानं भारावून गेलो. या वर्षीचा वाढदिवस ‘स्पेशल’ बनवला तुमी. एकेक पोस्ट वाचताना आनंदाश्रू येत होते. लब्यू लब्यू लब्यू लैच मित्रमैतरनींनो ! तुमाला अभिमान वाटंल आसंच काम माझ्या हातनं होत र्हाईल याची खात्री देतो. मनापास्नं आभार.
– किरण माने
किरण माने यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या भूमिकेसाठी इतर कोणाचाही विचार होऊ शकत नाही अशा आशयाच्या कमेंट्स अनेकांनी केल्या असून ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक