सध्या मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिका कलाकारांना वेध लागले आहेत ते वेबसीरिजच. याच यादीत आता अजून एक नाव सामील होतंय ते नाव म्हणजे अभिनेत्री पल्लवी पाटील. ‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे’ अशा सिनेमांतून दिसलेली ग्लॅमरस अभिनेत्री पल्लवी पाटील आता वेबसीरिजच्या दूनियेत पदार्पण करतेय. पल्लवी लवकरच येत्या 15 ऑगस्टला सुरू होणा-या ‘गोंद्या आला रे’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.
ब्रिटीश काळ पुन्हा पडद्यावर
ब्रिटीश काळ आणि स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी असलेली ही वेबसीरिज आहे. जुल्मी डब्ल्यू. सी. रॅण्ड हा अधिकारी आणि चापेकर बंधूंनी केलेली हत्त्या या घटनेवर ‘गोंद्या आला रे’ ही वेबसीरीज आधारलेली आहे. पल्लवी पाटील या मालिकेत दामोदर चापेकरांची पत्नी ‘दुर्गाबाई चापेकर’ या धडाडी महिलेची भूमिका साकारत आहे.
डीग्लॅमरस लुक आणि भूमिकेचा अभ्यास
पल्लवी पाटील पहिल्यांदाच अशा धडाडी महिलेच्या आणि डीग्लॅमरस रोलमध्ये दिसणार आहे. या भूमिकेच्या माध्यमातून तिला आपल्या अभिनयाचं नाणं किती खणखणीत आहे हे लोकांना दाखवून देता येईल. अभिनेत्री पल्लवी पाटील आपल्या या डिजीटल डेब्यूविषयी म्हणाली की, “सिनेजगतात काम केल्यानंतर वेबसीरिजच्या दुनियेतही काम करायची इच्छा होतीच आणि त्यातच मला अंकुर काकतकरने ही दुर्गाबाईंची भूमिका ऑफर केली. या भूमिकेचा अभ्यास करताना त्यांच्या सशक्त व्यक्तिमत्वाची जाणीव होत गेली. मला आनंद वाटतोय की, एका सशक्त भूमिकेने माझा वेबसीरिजच्या जगामध्ये डेब्यू होणार आहे.”
पल्लवीची वेगळी बाजू
नुकताच पल्लवीने विधवा झाल्यावर केशवपन करून लाल साडीचा पदर डोक्यावर घेतलेला दुर्गाबाईंचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आणि स्वत:चा तशाच लुकमधला फोटो शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी पल्लवीने आपला अंधारात उभा असलेला नऊवारी साडीतला लुक सोशल मीडियावर शेअर केला होता. पल्लवी याविषयी म्हणाली की, “दुर्गाबाईंची दोन रूपं या वेबमालिकेतून दिसतील. पती दामोदर चापेकर असताना त्यांना स्वातंत्र्यलढ्यात मुकपणे पाठींबा देणं आणि दूसरं त्यांच्या निधनानंतर परिस्थितीनुरूप निर्णय घेतानाचं रूप आपल्याला या वेबसीरिजमध्ये दिसून येईल.”
पल्लवी आणि भूषणची जोडी
याच वेबसीरिजमध्ये अभिनेता भूषण प्रधानही दिसणार आहे. या वेबमालिकेत तो क्रांतीकारी दामोदर चापेकर यांची भूमिका करत आहे. भूषणने या मालिकेतील भूमिकेसाठी चक्क टक्कलही केलं होतं. नेहमी चॉकलेट बॉयच्या भूमिकेत दिसणारा भूषणही या मालिकेत गंभीर भूमिका करत आहे. ही वेबसीरिज मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
मुख्य म्हणजे ‘गोंद्या आला रे’ मधून पल्लवी पाटील पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना या वेबमालिकेविषयी नक्कीच उत्सुकता आहे.
हेही वाचा
मराठी अभिनेत्री पल्लवी पाटीलचं ‘स्पेशल’ फोटोशूट
अर्थच्या रिमेकमध्ये स्मिता पाटील यांची भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री
शिवगामी दिसणार ‘अॅडल्ट’ चित्रपटात, पाहा चित्रपटाचा ट्रेलर