नकारात्मक भूमिका आणि सुरभी भावे (Surabhi Bhave) हे जणू काही मालिकांमध्ये समीकरणच झालंय. सुरभी गेल्या 8 ते 9 वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये काम करते आहे. सुरभीने आतापर्यंत असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, तुला पाहते रे, सख्या रे, गोठ, स्वामिनी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अस्मिता, माझे पती सौभाग्यवती, चित्रगथी, क्राईम डायरी, चंद्र आहे साक्षीला या मालिकेतून भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तर खऱ्या आयुष्यात सुरभी आई म्हणूनही भूमिका साकारत आहे. सुरभीला नुकतेच अभिनयासाठी दादासाहेब फाळके मेमोरियल ट्रस्टचे अप्रिसिएशन सर्टिफिकेट (Dadasaheb Phalke Memorial Trust Appreciation Certificate) मिळाले आहे आणि त्यासाठी ‘POPxo मराठी’ने तिला अभिनंदन करायला आणि तिचे अनुभव जाणून घ्यायला संपर्क साधला.
पॅशन हेच करिअर
मुलीला नोव्हेंबरमध्ये जन्म दिल्यानंतर सुरभीने लगेचच तीन महिन्यात काम सुरू केले. ‘भाग्यस दिले तू मला’ मालिकेतून सध्या सुरभी भावे पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. सुरूवातीला आपल्या मुलीला घरात ठेऊन जाताना नक्कीच मनात धाकधूक होती, मात्र मी मुलीला समजून घेण्याऐवजी आपली लहानशी मुलगीच आपल्याला जास्त समजून घेत असल्याचे सुरभीने अगदी मनमोकळेपणाने सांगितले. आपल्या लहान मुलीला सोडून जाताना नक्कीच पहिल्यांदा त्रास झाला. पण अभिनय हे आपले पॅशन आहे आणि पॅशन हेच करिअर बनले, त्यामुळे दोन्ही व्यवस्थित सांभाळता येत असल्याचेही सुरभीने यावेळी आवर्जून सांगितले. बाळाला वाढविण्यासाठी कामही तितकंच महत्त्वाचं आहे हे सत्य अगदी सहजपणाने सुरभीने बोलून दाखविले.
नकारात्मक भूमिकेने दिली ओळख
सुरभी भावेचे बोलके आणि घारे डोळे आणि तिचा बोलका चेहरा यामुळे ती पटकन प्रेक्षकांच्या लक्षात राहाते हे नक्की. आतापर्यंत अनेक मालिकांमधून सुरभीने नकारात्मक भूमिकाच केल्या आहेत. पण खरं तर याच भूमिकांमुळे सुरभीला ओळख मिळत गेली. बऱ्याचदा बाहेर गेल्यानंतर मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तिला काम करण्यास अधिक प्रोत्साहित करतात असं अगदी मनापासून सुरभीने यावेळी सांगितले. तर अगदी भाजी आणायला गेल्यानंतर एका बाईने एका हातात कोबी आणि फ्लॉवरची निवड करत असतानाही थांबवून ‘स्वामिनी’ मालिकेतील ‘बाई बाई बाई’ हा संवाद वदवून घेतल्याशिवाय आपल्याला सोडले नसल्याचा मजेशीर प्रसंगही तिने शेअर केला.
त्रिभंगाच्या सेटवर रेणुका शहाणेने मारलेली मिठी म्हणजे मोठं बक्षीस
त्रिभंगामध्ये अगदी लहानशी भूमिका असूनही प्रेक्षकांच्या सुरभी तिच्या अभिनयामुळे लक्षात राहिली आहे. तर यावेळचा आपला अनुभव सांगताना सुरभी म्हणाली, ‘मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणं म्हणजे फरक असतो. त्रिभंगाच्या सेटवर सुरूवातीला दडपण होतं. पण रेणुका शहाणेने हे दडपण कमी केलं. तर काम केल्यानंतर आपला शॉट उत्तम झाल्यावर अगदी सेटवर स्पॉटदादापासून मिळणारी दाद आणि रेणुका शहाणेने मारलेली मिठी म्हणजे मनावरचं दडपण एकदम कमी करणारे होते. आपलं कामच बोलतं हेच यातून सिद्ध झालं’ त्रिभंगासाठी आपलं ऑडिशन झालं नव्हतं तर डायरेक्ट प्रॉडक्शन हाऊसमधून फोन आल्याचंही तिने अगदी मनमोकळेपणाने व्यक्त केलं.
पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारणारी सुरभी खऱ्या आयुष्यात मात्र सकारात्मकतेचा खळखळता झरा आहे. चित्रपट, मालिका, नाटक, वेबसिरीज या सगळ्या प्लॅटफॉर्मवर सुरभी काम करत आहे आणि त्याशिवाय आपल्या खऱ्या आयुष्यातील आईची भूमिकाही अगदी चोख बजावत आहे. सुरभीने कामाच्या बाबतीत सध्या हेच म्हणणं योग्य ठरेल की, ‘भाग्य दिले तू मला’ कारण, लवकरच सुरभी नव्या प्रोजेक्टमधूनदेखील तिच्या चाहत्यांसमोर येणार आहे. POPxo मराठीकडून भरभरून शुभेच्छा!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक