जिओ स्टुडिओज आणि प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक आदित्य सरपोतदार ह्यांचा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘उनाड’ (Unaad) हा चेक रिपब्लिक (Czech Republic) येथे होणाऱ्या प्रतिष्ठित अशा झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ( Zlin International Film Festival), युवा विभागात फिचर फिल्म्सच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला गेला आहे. जिओ स्टुडिओज, अर्थ क्रिएशन्स, अरोरा प्रॉडक्शन्स आणि नम्रता आर्टस् निर्मित महोत्सवातील फिचर फिल्मच्या युवा विभागात ‘उनाड’ची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली असून
26 मे ते 1 जून 2022 दरम्यान चेक रिपब्लिकमध्ये होणार महोत्सव. या चित्रपटात ज्योती देशपांडे, अजित अरोरा, चंद्रेश भानुशाली आणि प्रितेश ठक्कर निर्मित या चित्रपटात आशुतोष गायकवाड, हेमल इंगळे, अभिषेक भरते, चिन्मय जाधव, देविका दफ्तरदार आणि संदेश जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत.
आदित्य सरपोतदार यांनी केला आनंद व्यक्त
चित्रपटाच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणतात, “महत्त्वाच्या आणि संबंधित युवा वर्गात ‘उनाड’ ची निवड होणे ही चित्रपटासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आम्ही कोळी समाजातील सध्याच्या तरुणांचा वास्तववादी विचार करण्याचा प्रयत्न केला असून या चित्रपटात तीन तरुणांचा प्रवास आणि त्यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. या महोत्सवात ‘उनाड’ची निवड होणे ही आमच्या टीमच्या प्रवासाची पावती आहे. आम्ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट पाहात आहोत विशेषतः या महोत्सवाकडून येणाऱ्या प्रतिक्रियांची.”
‘उनाड’ ही महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील मासेमारी करणाऱ्या हर्णे येथील तीन तरुण मुलांची कथा आहे. शुभ्या, बंड्या आणि जमील हे तीन मित्र आहेत जे आपला वेळ गावात हुंदडण्यात घालवतात. त्यांच्या जीवनात कोणतेही ध्येय नाही. स्थानिक त्यांना गावातील उनाड मुले समजत असल्याने, तिन्ही मुले अडचणीत येतात. त्यांच्या आयुष्यातील त्या टप्प्याची ही कहाणी आहे, जी त्यांना कायमची बदलते. झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगभरातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा महोत्सव आहे. हा एक अत्यंत प्रतिष्ठित कार्यक्रम आहे, जो मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी चित्रपट निर्मितीच्या नवीन संधींची ओळख करून देतो. मागील महोत्सवात सुमारे एक्याऐंशी हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अकरा हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. या महोत्सवाला जगातील 52 देशांतील 310 चित्रपटांचा समावेश होता.
आदित्यचे चित्रपट आहेत हिट
आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) हे नाव मराठी इंडस्ट्रीला नक्कीच नवे नाही. लय भारी, झोंबिवली असे वेगवेगळ्या विषयावरचे हिट चित्रपट मराठी इंडस्ट्रीला आदित्यने दिले आहेत. त्याशिवाय आदित्यने आतापर्यंत एका रियालिटी शो मध्येदेखील परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. आदित्यचे दिग्दर्शन क्षेत्रात फारच कमी वेळात मोठे नाव झाले आहे. त्यामुळे आदित्यकडे पुढच्या पिढीचा अप्रतिम दिग्दर्शक म्हणून पाहिले जाते. उनाड चित्रपटातून एक वेगळी कथा मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे. नॉर्मल आयुष्यात प्रत्येकाशी अशी जोडली जाणारी ही कथा वाटत आहे. त्यामुळेच या मोठ्या महोत्सवात या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. तर आता प्रेक्षकांनाही या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक