सिद्धार्थ जाधव आणि सौरभ गोखले या दोघांचाही महत्त्वाची भूमिका असलेला रणवीर सिंगबरोबरचा ‘सिम्बा’ नुकताच प्रदर्शित झाला असून लवकरच हे दोघे ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करायला परत येत आहेत. अमोल उतेकर प्रस्तुत, स्टेलारीया स्टुडीयो निर्मित आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘समीर’…एकुलता एक मुलगा, तो ही मनाने आणि राहणीमानाने एकदम साधा पण त्याचं लव्ह मॅरेज होणार असे गडबडे बाबांनी केलेले भाकीत. एक से बढकर एक, नटखट, प्रेमळ, ग्लॅमरस तरुणी आणि जिगरी दोस्त ‘बाब्या’चे लव्ह टीप्स. या सर्व गोष्टींमुळे एंटरटेनमेंट पॅकेज असलेल्या ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपटात खूप मनोरंजक किस्से आणि धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शिवाय या चित्रपटामध्ये महेश मांजरेकरदेखील बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी दिसणार आहे.
धमाल ट्रेलर
ट्रेलरमधून प्रेक्षकांना याचा अंदाज आलाच असेल की मैत्री, फ्लर्टिंग, प्रेम, लग्न हे जर आयुष्यात असेल तर आयुष्य एक रोलर कोस्टर राईड होऊन जाते. या चित्रपटात सिध्दार्थ जाधवने बाब्याची आणि सौरभ गोखलेने समीरची भूमिका साकारली आहे. आणि समीरच्या आयुष्यात येणा-या मुलींची भूमिका संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी आणि राणी अग्रवाल या अभिनेत्रींनी साकारली आहे. ट्रेलर तर अफलातून आणि मनोरंजक तर आहेच पण गडबडे बाबा या व्यक्तीने धमाल डायलॉगबाजी करुन प्रेक्षकांची चित्रपटाप्रती उत्सुकता नक्कीच वाढवली असणार. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गडबडे बाबा ही भूमिका साकारली आहे, महेश मांजरेकरने. बऱ्याच कालावधीनंतर महेश मांजरेकरला पुन्हा एकदा चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. महेश मांजरेकरचं कॉमेडी टायमिंगचे बरेच प्रेक्षक चाहते आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही पर्वणीच असणार आहे. शिवाय सिद्धार्थ, सौरभ आणि महेश मांजरेकरांची केमिस्ट्री कशी आहे याचीदेखील प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. तसेच कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे या कलाकारांनी देखील ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ची रंगत वाढवली आहे. आयुष्यात प्रेम नाही ना केलं तर ते आयुष्य व्यर्थ आहे असं सांगणारा ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपट १ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
सध्या सिद्धार्थ आणि सौरभ प्रमोशनमध्ये ‘व्यस्त’
‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या सिद्धार्थ आणि सौरभ दोघेही व्यस्त आहेत. चित्रपटाचं प्रदर्शन काही दिवसांवर येऊन ठेपलं असल्यामुळे सध्या दोघेही विविध ठिकाणी जाऊन प्रमोशन करत आहेत. नुकतेच ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा पर्व २’ मध्येही येऊन सिद्धार्थ आणि सौरभने धमाल उडवून दिली. शिवाय सध्या अनेक मराठी वाहिनीवरदेखील या चित्रपटाचं प्रमोशन चालू आहे. बऱ्याच दिवसांनी मराठीमध्ये अशा तऱ्हेचा कॉमेडी शैलीचा चित्रपट येत असल्यामुळे प्रेक्षकांच्यादेखील या चित्रपटाकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेवर उतरतो का हे पाहणं खरं तर उत्सुकतेचं ठरणार आहे.
वाचा – महाराष्ट्राच्या हास्य जत्रा पर्व २ मध्ये सिद्धार्थ आणि सौरभची हजेरी