कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सरकारने 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वांना घरातच राहणं बंधनकारक आहे. लॉकडाऊनचा परिणाम चित्रपट आणि मालिकांवर मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. कारण सध्या यामुळे मालिकांचं चित्रीकरण बंद आहे. ज्यामुळे या मालिकांमध्ये काम करणारे सर्व कलाकार देखील घरीच राहून आपला वेळ घालवत आहेत. अर्थात या लॉकडाऊनचा एक चांगला परिणाम झाला आहे की या कलाकारांना त्यांची आवड-निवड जपण्यासाठी मोकळा वेळ मिळाला आहे. कारण शूटिंगच्या बिझी शेड्यूलमुळे त्यांना त्यांच्या स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागतात. अग्गबाई सासूबाई मालिकेतील आसावरी म्हणजेच निवेदिता जोशी सराफ यांनीदेखील त्यांची एक आवड या काळात मनापासून जपली आहे.
आसावरी आणि निवेदिता याबाबतीत आहेत सारख्या
‘अग्गबाई सासूबाई’ मालिका ही अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. या मालिकेच्या वाढलेल्या क्रेझमुळे घरातील मध्यम आणि वयस्कर वयातील लोकांना ही मालिका नित्यनेमाने पाहण्याची जणू सवयच जडली होती. मात्र अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे या नित्यनेमात आता खंड पडत आहे. आता सर्वजण यामुळे अग्गबाई सासूबाई मालिकेला आणि त्यातील कलाकारांना फारच मिस करत आहेत. मात्र जर तुम्हीदेखील आसावरीला खूप मिस करत असाल तर तुम्हाला या माध्यमातून आसावरीच्या सतत संपर्कात राहता येईल. कारण तुमची आवडती आसावरी सध्या सोशल मीडियावर तिच्या हातच्या खाद्यपदार्थांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
निवेदिता जोशी सराफ आहेत उत्तम कूक
अग्गबाई सासूबाई या मालिकेतील आसावरीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. या मालिकेतील आसावरीला स्वयंपाकाची प्रचंड आवड असल्याचं दाखवण्यात आलं आहे. आसावरी एक उत्तम सुगरण असल्याने ती या मालिकेत नेहमी नवनवीन खाद्यपदार्थ करताना दिसत असते. मात्र एवढंच नाही तर आसावरीची भूमिका साकारणाऱ्या निवेदिता जोशी सराफ यांनाही तिच्याप्रमाणेच स्वयंपाकाची खूप आवड आहे. निवेदिता सराफ यांनी शेअर केलं आहे की, ‘मला इतरांना जेवण करून खायला घालायला खूप आवडतं, खूप लोक माझ्या घरी माझ्या हातचं जेवून जातात त्यामुळे मी केलेला स्वयंपाक चांगला होत असावा असं मला वाटतं’. आसावरीप्रमाणेच खऱ्याखुऱ्या जीवनातही निवेदिता जोशी सराफदेखील सुगरणच आहेत. आता लॉकडाऊनमुळे मिळालेल्या रिकाम्या वेळेत निवेदिता त्यांच्या घरी रोज वेगवेगळे पदार्थ बनवतात. निवेदिता या रेसिपीज त्यांच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअरदेखील करतात. निवेदिता सराफ रेसिपीज नावाचं त्यांचं स्वत:चं युट्यूब चॅनेल असून त्यावर त्यांचे स्वयंपाक करतानाचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. निवेदिता यांनी नुकतंच ‘व्हेजिटेबल स्टू’ या पदार्थाची रेसिपी चाहत्यांसोबत शेअर केली होती. चाहत्यांना देखील ही रेसिपी आवडली असून यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
दिया मिर्झाने शेअर केला गंगा नदीचा व्हिडिओ, दाखवला लॉकडाऊन इफेक्ट
भूमी पेडणेकर लॉकडाऊनमध्ये करत आहे शेती, घरातच पिकवल्या भाज्या आणि फळं
अंकिताशी लग्न करण्याआधी मिलिंद सोमणच्या आयुष्यात होत्या या हॉट अभिनेत्री