एखादा अभिनेता सुपरस्टार या पदावर पोहोचल्यानंतर फॅन्सकडून अपेक्षा वाढत राहतात. तो काय करतो? कोणते चित्रपट निवडतो यावर सगळ्यांचे बारकाईने लक्ष असते. अशा सुपरस्टारचा चित्रपट आला तर त्याला हिट करण्याचे कामही चाहतेच करत असतात. खिलाडी अक्षय कुमारलाही अनेक जण आदर्श म्हणून पाहतात. देशाच्या विधायक कामांसाठी कायम पुढे असलेल्या अक्षयने एक चुकीचा निर्णय घेऊन जाहिरात केली आणि त्याला ती महागात पडली. पान मसाल्याच्या जाहिरातीत अक्षय कुमार दिसल्यामुळे अनेकांनी त्याला ट्रोल केले होते. पण आता आपली चूक लक्षात आल्यानंतर अक्षय कुमारने माफी मागितली आहे.
अक्षयने मागितली माफी
पान मसाल्याची जाहिरात जशी प्रदर्शित झाली तशी ही जाहिरात ट्रोल होऊ लागली. या जाहिरातीमध्ये अक्षय कुमार हातात पान मसाला घेऊन एक डायलॉग बोलत आहे. त्याला पाहिल्यानंतर अनेकांनी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अशा कमेंट लोकांनी केल्या होत्या. तो बराच ट्रोल झाल्यानंतर त्याने आता त्याच्या सोशल मीडियावर माफी मागितली आहे. त्याने या पुढे तंबाखूजन्य असलेल्या कोणत्याही पदार्थाची जाहिरात करणार नाही असे सांगितले आहे. शिवाय ती जाहिरात काढून टाकण्यासाठी अक्षय कुमार प्रयत्न करत आहे असे देखील त्याने यात लिहिले आहे. त्याची ही माफी पाहत अनेकांनी त्याची स्तुती केली आहे.
अक्षयने केली होती चूक
अक्षय कुमारने काही वर्षांपूर्वी जेव्हा तंबाखूची जाहिरात करणार नाही असे सांगितले होते. त्यावेळी लोकांनी त्याला उचलून धरले होते आणि त्याने ही जाहिरात केल्यानंतर लोकांनी त्याला त्याचाच व्हिडिओ पोस्ट करुन त्याला टॅग केले. त्यामुळे अक्षयची चूक सगळ्यांच्याच लक्षात आली. एका रात्रीत एखाद्याचे स्टारडम डळमळू शकते. हे अक्षय चांगलेच जाणतो. त्यामुळेच चूक लक्षात आल्यानंतर अक्षयने त्या गोष्टीसाठी माफी मागितली आहे. पण आता तरी सगळ्या प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही जाहिरात टीव्हीवर प्रसारीत होत राहणार आहे. ज्यामुळे काही अंशी त्याच्या चाहत्यांचा रोष त्याच्यावर राहणार आहे यात काही शंका नाही.
अल्लूने घेतला उत्तम निर्णय
बॉलिवूडमधील कलाकार अजय आणि अक्षयने जाहिरात करताना विचार केला नसला तरी देखील साऊथ स्टार अल्लू अर्जुनने ही जाहिरात नाकारुन लोकांची मने जिंकली आहेत. त्याला एका मोठ्या ब्रँडची तंबाखूची जाहिरात मिळाली होती.मानधनही मोठे होते. पण तरीही त्याच्या या जाहिरातीमुळे लोकांनी तंबाखू हा चांगला असतो असे समजून त्याचे सेवन करु नये. यासाठी त्याने मोठे मानधन आणि जाहिरात दोन्हीही नाकारले. त्यामुळे त्याचे कौतुक देखील झाले.
बच्चन पांडे प्रदर्शित
प्रोजेक्ट बाबतीत सांगायचे झाले तर सध्या अक्षय कुमारचा बच्चन पांडे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. एका गुंडाच्या जीवनावर आधारीत असा हा चित्रपट असून यात त्याच्यासोबत क्रिती सनॉन पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी बराच कालावधी लागला.
अक्षयने माफी मागणे तुम्हाला कितपत पटले? याचा त्याच्या करिअरवर परिणाम होईल असे तुम्हाला वाटते का? आम्हाला नक्की कळवा.