काही जणांना गोड खायला इतके आवडते की, त्यांना काहीही झाले दिवसातून एकदा तरी गोड खाल्ल्याशिवाय काही झोप लागत नाही. गोड आवडणे हे काही वाईट नाही. पण गोडाचा अतिरेक हा आरोग्यासाठी त्रासदायक असतो. खूप गोड खाल्ल्यामुळे वजन वाढणे, मधुमेह असा त्रास वाढू शकतो. वजन नियंत्रणात ठेवायचे असेल किंवा गोडावर नियंत्रण ठेवायचे असेल तर तुम्हाला गोड संपूर्ण सोडून देण्याची काहीही गरज नाही. गोडाला पर्याय अनेक गोष्टी सध्या मिळतात.ज्यामुळे तुमच्या गोडाची आवडही पूर्ण होते आणि तुमचे वजनही वाढत नाही. चला जाणून घेऊया असे पदार्थ जे तुमच्या गोडाची आवड करतील पूर्ण
चिआ सीड्स पुडिंग
सध्या सुपरफूडची चांगलीच क्रेझ आहे. त्यापैकीच एक आहे ते म्हणजे चिआ सीड्स. सब्जाप्रमाणे दिसणारा हा पदार्थ चांगल्या आरोग्यासाठी खूपच जास्त महत्वाचा आहे. चिआ सीड्सला आपली अशी चव नसते. पण त्याचा उपयोग करुन तुम्हाला छान पुडिंग बनवता येतात. हे पुडिंग हेल्दी असते. त्यामुळे तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही अगदी हमखास ही रेसिपी बनवा. थंडगार केल्यानंतर याची चव इतकी जास्त वाढते की, तुम्हाला इतर कोणताही गोड पदार्थ खाण्याची अजिबात इच्छा होणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला जेवणानंतर रोज गोड लागत असेल तर तुम्ही अगदी हमखास हा पदार्थ करुन खा. तुम्हाला नक्कीच इतर काहीही खायची इच्छा होणार नाही.
खजूर
खूप जणांना डाएटमध्ये खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. खजूर गोडाची क्रेव्हिंग कमी करते. शिवाय तुम्हाला हवे असलेले आवश्यक घटकही देते. बाजारात अनेक प्रकारचे खजूर मिळतात. त्यापैकी काळा खजूर हा आरोग्यासाठी खूपच चांगला असतो. त्यामुळे तुम्ही किमान दोन ते तीन खजूर जेवणानंतर खा. तुम्हाला नक्कीच त्यामुळे इतर काहीही गोड खाण्याची इच्छा होणार नाही. खजूराचे फायदे अनेक आहेत ते देखील तुम्हाला माहीत झाले तर तुम्ही इतर कोणताही गोड पदार्थ अजिबात खाण्याची इच्छा होणार नाही.
गूळ
गूळ हा देखील आरोग्यासाठी खूपच चांगला आहे. गुळाचे सेवन केले तर तुम्हाला इतर काहीही गोड खाण्याची अजिबात इच्छा होणार नाही. गूळाचा एक लहानसा खडा जरी तुम्ही चघळला तरी देखील तुम्हाला त्यामुळे बरे वाटते. पण गुळ जितके आरोग्यासाठी चांगले आहे. तितके त्याचे अति सेवन हे देखील चांगले नाही. तुम्ही जर जास्त प्रमाणात गुळ खाल्ला तर त्याचा परिणाम म्हणजे तुमचे वजन वाढू शकते. त्यामुळे तुम्ही गूळाचे सेवन करताना बेताने आणि जरा जपूनच केलेले बरे.
आंबापोळी किंवा फणसपोळी
खूप जणांच्या घरी आंबापोळी आणि फणसपोळी असतात. ज्या गोड असतात. त्यात साखर असते. आता तुम्ही म्हणाल साखर असलेला हा पदार्थ चांगला कसा? तर यामध्ये तुम्हाला फळांचा अर्क मिळतो. ज्यामुळे त्याचे फायदे तुम्हाला मिळतात. तुम्हाला खूप काहीतरी गोड खायची इच्छा असेल अशावेळी तुम्ही साधारण एक मध्यम आकाराचा तुकडा आंबापोळी किंवा फणसपोळी घेऊन त्याचे सेवन करा. नक्कीच तुम्हाला त्यामुळे फायदा होईल.
डार्क चॉकलेट
खूप जणांना चॉकलेटचे क्रेव्हिंग सतत होते. म्हणजे चॉकलेट केक, कॅडबरी असे खावेसे वाटते. तुम्हालाही असे खावेसे वाटत असेल तर तुम्ही डार्क चॉकलेट खा. कारण असे चॉकलेट खाल्ल्यामुळे तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होणार नाही. डार्क चॉकलेटचे अन्यही फायदे आहेत. जे तुम्हाला मिळतील.