फास्टर फेणे म्हणजेच मराठीतला हरहुन्नरी अभिनेता अमेय वाघ नवीन वर्षात बरेच आश्चर्याचे धक्के देणार आहे. नुकतंच अमेयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवीन वर्षात अनेक प्रोजेक्टस घेऊन येत असल्याचं सागितलं.
नवीन वर्षात अभिनयाची नवीन छटा
भूमिकांच्या बाबतीत चोखंदळ असणारा अमेय आता अभिनयाच्या नव्या छटांमध्ये दिसणार आहे. या पोस्टमध्ये म्हंटल्याप्रमाणे अमेय लवकरच एका चित्रपटात नकारात्मक भूमिकेत ही दिसणार असल्याचं त्याने सांगितलं.
अमेय आणि ‘असुरा’
वेब हे माध्यम अमेयसाठी नवीन नाही. अमेय आणि निपुण ही जोडी ‘भाडिपा’मुळे आधीच वेब फॅन्समध्ये लोकप्रिय आहे. तर आता अमेय एका हिंग्लीश वेबसिरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका करत आहे.
या वेबसिरीजचं नाव ‘असुरा’ असून ती एक थ्रिलर सीरीज असणार आहे. अमेय पहिल्यांदाच थ्रिलर वेबसिरीजमध्ये काम करतआहे. ही वेबसिरीज डिंग इंटरटेंटमेंटची असून ती व्हूट अॅपवर दिसणार आहे तर दिग्दर्शन अनिरूद्ध सेन करत आहे.
हिंदीमधील अनेक नावाजलेल्या कलाकारांचा या वेबसिरीजमध्ये समावेश आहे. तसंच बॉलिवूडचा मुन्नाभाई अभिनेता अर्शद वारसीची ही यामध्ये प्रमुख भूमिका आहे. ‘असुरा’ च्या निमित्ताने अर्शदसोबत काम करण्याची संधी अमेयला मिळणार असून तो खूप उत्सुक आहे.
आता नवीन वर्षात अमेय त्याच्या चाहत्यांना काय काय सरप्राईज देतो, हे नक्कीच पाहण्यासारखं आहे.