‘फॅन्ड्री,आणि ‘सैराट’ फेम नागराज मंजुळेनं मराठी चित्रपट सृष्टीत एक अढळ स्थान निर्माण केलंय.आता मात्र तो हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नशिब आजमावू पाहत आहे. नुकतच नागराजच्या आगामी झुंड या हिंदी चित्रपटाचं शूटिंग नागपूरात सुरू झालंय. या सिनेमामध्ये हिंदीतील महानायक ‘अमिताभ बच्चन’ एका प्रमुख भुमिकेत असणार आहे. प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक ‘विजय बारसे’ यांची प्रमुख भुमिका अभिताभ बच्चन या सिनेमामध्ये साकारणार आहेत.
झुंडसाठी महानायक नागपूरला रवाना झालेत
नुकतच या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालंय.या सिनेमाचं शूटिंग नागपूरात सुरू झालं असल्याचं खूद्द बिग-बी नेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलंय. “झुंडच्या शूटिंगसाठी नागपूरात आहे.मराठी ब्लॉक बस्टर सैराट फेम नागराजचा पहिला हिंदी सिनेमा..आकर्षणाचा केंद्रबिंदू…भौगोलिकदृष्टा नागपूर भारताचा केंद्रबिंदू…दोन केंद्राचे मिलन.” असं म्हणत बिग बी ने नागराजसोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये बिग बी स्पोर्ट्स लुकमध्ये दिसत आहे.महानायकाच्या आगमनामुळे या अख्खं नागपूर ‘सैराट’मय झालंय.
विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे झुंड सिनेमा
हा सिनेमा प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक ‘विजय बारसे’ यांच्या जीवनावर आधारित आहे. झोपडपट्टीत राहण्या-या गरीब मुलांनी खेळातून करियर घडावं यासाठी विजय बारसे यांनी प्रयत्न केले.समाजाकडून वाईट वागणूक मिळाल्याने वाममार्गाला गेलेल्या काही मुलांना विजय बारसे यांनी फुटबॉलपटू बनवलं.त्यातील काही मुलांनी परदेशातील होमलेस फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये देखील चमकदार कामगिरी केली.झोपडपट्टीत फुटबॉल खेळ रुजवण्याचा बारसे यांचा संघर्ष या सिनेमामधून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
फोटोसौजन्य: इन्स्टाग्राम