मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हीने ख्रिसमसच्या निमित्ताने सांताची आगळवेगळी भूमिका पार पाडली.
बच्चेकंपनीची आवडती अम्मूदीदी
अमृताच्या चाहत्यावर्गामध्ये बच्चेकंपनीचाही समावेश आहे. अमृताही तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून लहान मुलांमध्ये वावरताना दिसते. सोनी मराठीच्या ‘सुपर डान्सर महाराष्ट्राचा’ या रिएलिटी शॉमुळे तर ती बच्चेकंपनीची लाडकी ‘अम्मू दीदी’ झाली आहे.
अमृताचं ख्रिसमस सेलिब्रेशन
बच्चेकंपनीच्या लाडक्या अम्मू दीदीने यंदा ख्रिसमस विशेष मुलांसोबत साजरा केला, ठाण्यातील जागृती पालक संस्थेच्या विशेष मुलांसोबत तिने नाताळ साजरा केला आणि अमृताने त्यांच्यासाठी खास भेटवस्तूही आणल्या होत्या.
तिने या बच्चेकंपनीबरोबर भरपूर मज्जा मस्ती केली आणि खेळदेखील खेळले. मुलांनीही या तिच्याबरोबर ख्रिसमस पार्टीचा मनमुराद आनंद लुटला.
बच्चेकंपनीने केलं अमृताचं खास स्वागत
एरवी आपल्या नृत्याने इतरांना भुरळ पाडणाऱ्या अमृताच्या स्वागतासाठी जागृती पालक संस्थेतील विशेष मुलांनी खास नृत्य सादर केली. या मुलांकडून मिळालेल्या अमाप प्रेमामुळे अमृता इमोशनल झाली. ‘मी दरवर्षी वेगवेगळ्या एनजीओमधील लहान मुलांना जाऊन भेटते. त्यांचा सहवास मला आवडतो. मात्र, इथे येऊन मी खरंच भरून पावले आहे. ही मुलं निरागस आणि भोळीभाबडी आहेत, त्यामुळे यांना इतरांहून वेगळे असे म्हणताच येणार नाही. या मुलांकडून मला जे काही प्रेम मिळालं आहे, ते न विसरण्याजोगं आहे.’ अशा भावना तिने यावेळी व्यक्त केल्या.