अनन्या या नाटकाच्या यशानंतर आता अनन्या चित्रपट रुपाने आपल्या सगळ्यांच्या भेटीला लवकरच येणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते आणि आता फायनली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आधी या चित्रपटाचा टीझर आला होता. आता येत्या 22 जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोणतीही शारिरीक कमतरता तुम्हाला तुमच्या लक्ष्यापासून दूर ठेवू शकत नाही. फक्त तुमच्यात सकारात्मकता असायला हवी. हेच दाखवणारा हा चित्रपट आहे. प्रताप फड दिग्दर्शित या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या पोस्टरला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.
पोस्टरलाही मिळाला प्रतिसाद
प्रताप फड हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी या पोस्टर संदर्भात सांगितले की,”या चित्रपटाच्या सकारात्मक पोस्टरलाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आता टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘अनन्या’ म्हणजे इतरांपेक्षा वेगळी. अशीच एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्वाची ‘अनन्या’ लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. आयुष्य किती सुंदर आहे, याची अनुभूती देणारा हा चित्रपट आहे. चित्रपटगृहातून बाहेर जाताना प्रेक्षकांना आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल
ऋता दिसणार मुख्य भूमिकेत
नाटकात अनन्याची भूमिका ऋतुजा बागवे हिने साकारली होती. पण आता या चित्रपटात ऋता दुर्गुळे ही अनन्याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे शूटींग कधीच पूर्ण झाले असून आता या चित्रपटाच्या रिलीजची अनेकांना प्रतिक्षा आहे. ऋताने तिच्या रोलसंदर्भात आधीच चाहत्यांना माहिती दिली होती. ऋता सध्या मन उडू उडू झालं या मालिकेत काम करत आहे. तसेच तिचे नुकतेच लग्न झाले असून ती तिच्या सुट्ट्यांवर आहे. तिच्या चाहत्यांना ती पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत पाहता येणार आहे.
अनन्या असाधारण मुलीची कहाणी
सगळ्यांचे आयुष्य परफेक्ट नसते. प्रत्येकाकडे कशाची तरी कमी असतेच. पण आपल्यात काय कमी आहे यात गुरफटून न राहता जर आहे त्यातच काही तरी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही नवी शिखर गाठू शकता. उंच भरारी घेऊ शकता यात काहीही शंका नाही. हेच दाखवणार आहे अनन्या. त्यासाठी तुम्ही हा चित्रपट पाहणे गरजेचे आहे. आता या चित्रपटाची प्रतिक्षा संपली असून प्रेक्षकांना अगदी दोनच महिने वाट पाहावी लागणार आहे.
तुम्हालाही अनन्याची ही गोष्ट पाहायची असेल तर तुम्ही नक्कीच थोडी वाट बघायला हवी