नववर्षाची सुरुवात प्रत्येकजण नाविण्यपूर्ण बदल करुन करत असतो. नव्या वर्षात काहीतरी नवीन करण्याकडेच सर्वांचा कल असतो. या नववर्षाच्या सुरुवातीला अभिनेते अशोक सराफ यांचंदेखील एक ‘फ्रेश’ नाटक रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचं नाव ‘व्हॅक्यूम क्लीनर’ असं आहे. नुकतच या नाटकाचं पोस्टर रिलीज झालं आहे. काही दिवसांपासून या नाटकाचं प्रमोशन जरा ‘हटके’ पद्धतीने करण्यात येत होतं. ‘ऑनलाईन मागवलाय…नव्या वर्षात येतोय’ अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे नेमकं काय मागवलं आहे आणि नवीन वर्षात काय येतंय याबाबत प्रेक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र नववर्षाच्या सुरुवातीलाच #Vacuumcleaner चं पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट झाल्याने या ‘प्रमोशनल पोस्टचं’ गुपित उघड झालं आहे.
‘व्हॅक्यूम क्लीनर’ बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
नववर्षात अनेक दर्जेदार नाटकं रंगभूमीवर येत आहेत. जानेवारी महिन्यात म्हणजेच वर्षाच्या सरुवातीलाच ‘व्हॅक्यूम क्लीनर’ हे नवकोरं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला भेटीला येत आहे. या नाटकाच्या पोस्टरवरुन या नाटकात अभिनेते ‘अशोक सराफ आणि अभिनेत्री निर्मिती सावंत’ यांच्या प्रमूख भूमिका आहेत हे उघड झालं आहे. या दोन्ही दिग्गज कलाकारांच्या जोडीवरुन आणि नाटकाच्या हटके नावावरुन हे ‘कॉमेडी नाटक’ असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. व्हॅक्यूम क्लीनर नाटकाचं दिग्दर्शन आणि लेखन ‘चिन्मय मांडलेकर’ याचं आहे. तर या नाटकाची निर्मिती निवेदिता सराफ,संज्योत वैद्य,श्रीपाद पद्माकर,दिलीप जाधव यांनी केली आहे.
प्रमोशनचा नवा ‘फंडा’
मराठी नाटक आणि चित्रपटांच्या प्रमोशनसाठी सध्या जरा ‘हटके’ पद्धत वापरण्यात येत आहे. सोशल मीडियावर एखादी भन्नाट अथवा रहस्यमय पोस्ट करुन प्रेक्षकांना आधी कोड्यात टाकलं जात आहे. सोशल मीडियावर या पोस्टची भरपूर चर्चा झाल्यावर मग त्यामागचं गुपित उघड करण्यात येतं. यापूर्वी प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी देखील ‘गुडन्यूज आहे’ ही पोस्ट टाकून त्यांच्या ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचं प्रमोशन केलं होतं. व्हॅक्यूम क्लीनर या नाटकाच्या प्रमोशनसाठी देखील हाच फंडा वापरण्यात आला होता. ‘ऑनलाईन मागवलाय…नव्या वर्षात येतोय’ अशा पोस्टने प्रेक्षकांमध्ये आधी उत्सुकता निर्माण करण्यात आली होती. थर्टी फर्स्टच्या आधी नाटकाचं पोस्टर रिलीज करुन “थर्टी फर्स्टच्या पार्टीनंतर ‘Vacuum Cleaner’ ची गरज भासणाऱ्या सर्वांना Happy New Year” अशा पद्धतीने नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यामुळे सहाजिकच व्हॅक्यूम क्लीनर या नाटकात नेमकं काय मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे याबाबत नाट्यरसिकांच्या मनात उस्तुकता निर्माण झाली आहे.
फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम