चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या सणाचं महत्त्व महाराष्ट्रात फार आहे. याच दिवसात सुरू होतं ते नऊ दिवसांचं चैत्र नवरात्राचं पर्व. जर तुमची इच्छा असेल की, येणाऱ्या नवीन वर्षात तुम्हाला कोणत्याही संकटांचा सामना करावा लागू नये. तर नववर्षाच्या पहिल्या दिवशी काय करावं हे अवश्य जाणून घ्या.
चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या पहिल्या तिथीला सूर्योदयासोबत प्रारंभ होतं ते नववर्ष आणि चैत्रातलं नवरात्र. गुढीपाडव्याच्या दिवशी परंपरेनुसार,आपल्या घरासमोर किंवा घराच्या छतावर गुढी उभारली जाते. लाकडाची काठी, चांदी किंवा पितळीचा तांब्या, साखरेची माळ, रेशमी वस्त्राचा वापर करून गुढी उभारली जाते. या गुढीला कडुनिंबाची पानं, आंब्याचं डहाळ आणि फुलांनी सजवलं जातं. त्याची पूजा करून गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. गुढी उभारण्यामागे नेमका विचार कोणता? तर असं म्हणतात की, नववर्षाच्या पहिल्या दिवशी गुढी उभारल्याने तुमच्या कुटुंबात वर्षभर सुख-समृद्धी कायम राहते.
- गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदय होताच गुढी उभारावी. हळदी-कुंकू, फुल आणि अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी. अशी मान्यता आहे की, या दिवशी उपवास केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
गुढीपाडव्यासाठी खास मंत्र
गुढीपाडव्याला पूजा करताना खालील मंत्राचं उच्चारण करावे. ओम ब्रम्हध्वजाय नम: असा मंत्र म्हणावा आणि पूजा करावी. गुढीला नमस्कार करावा.
या मंत्रामागील धारणा अशी आहे की, ज्या दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टीची निर्मिती केली. त्या चैत्रातल्या दिवसाला नववर्ष मानले जाते. असंही म्हणतात की, चैत्र प्रतिपदेच्या दिवशी दुर्गा देवी प्रकट झाली आणि देवीच्या सूचनेवरून ज्या दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टीची निर्मिती केली तो दिवस हाच. म्हणून महाराष्ट्रात आणि हिंदू धर्मात गुढीपाडव्याच महत्त्व अधिक आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी करा हे उपाय वर्षभर राहील समृद्धी
- नववर्षाच्या पहिल्या दिवशी श्री गणपतीसोबत देवी लक्ष्मीची षोडशोपचारे पूजन करावे. शक्य असल्यास पंच पक्वान्नाचा नैवेद्य दाखवावा. यामुळे धनासंबंधित सर्व समस्या दूर होतात.
- नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या दुकान किंवा व्यापाराच्या ठिकाणी मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला हळद वाहावी. काही दिवसातच तुम्हाला अचानक आर्थिक वृद्धी होत असल्याचं लक्षात येईल.
- गुडीपाडव्याच्या निमित्ताने आपण नेहमीच चांगले कपडे परिधान करतो. मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना भेटून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. पण जर याच दिवशी अगदी एक वाडगा तांदूळ जर एखाद्या गरजू व्यक्तीला दान केल्यास तुम्हाला नक्कीच लाभ होईल.
- नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने गणपतीच्या देवळात जाऊन दर्शन घ्यावं आणि पाच सुपाऱ्या किंवा 21 दुर्वा बाप्पाला वाहाव्या तुम्हाला वर्षभर धनधान्याची उणीव भासणार नाही.
- गुढीपाडव्यासोबतच चैत्र नवरात्राला या दिवशी सुरूवात होते. हे औचित्य साधून संध्याकाळी कुटुंबाच्या सुखशांतीसाठी शक्य असल्यास पूर्ण कुटुंबासोबत एकत्र बसून श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. श्री दुर्गा सप्तशतीच्या सामूहिक पठणाने घर आणि कुटुंबात सदैव सुख-शांती आणि समृद्धी कायम राहते.
- देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुढीच्या पूजनासोबतच 11 कवड्यांचीही पूजा करावी. या कवड्या पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवाव्या. असं केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते, अशी मान्यता आहे.