जांभूळ हे उन्हाळ्यात मिळणारं एक हंगामी फळ आहे. एप्रिल ते जुलै या काळात सकाळी रस्त्यावर पिकलेल्या निळ्या जांभळट रंगाच्या जांभळांचा सडा पडलेला दिसतो. जांभळाची फळं, पानं, साल आणि बिया सर्वच गोष्टी औषधी गुणधर्माच्या असतात. जांभूळ हे थंड गुणधर्माचे, चवीला रूचकर, अॅंटि बायोटिक आणि पाचक असते. जांभूळ खाण्यामुळे पित्त, वात आणि कफ हे त्रिदोष संतुलित राहतात. एवंढच नाही मधुमेहींसाठी जांबळांची फळं,पानं,साल आणि बिया या सर्वच गोष्टी गुणकारी ठरतात. यासाठीच जाणून घ्या उन्हाळ्यात जांभूळ खाण्याचे फायदे
जांभूळ खाण्याचे फायदे
जांभळामध्ये लोह, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात.
वजन कमी होते –
जांभळामध्ये कॅलरिज खूप कमी प्रमाणात असतात. ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही उन्हाळ्यात जांभूळ खाऊ शकता. शिवाय जांभळात फायबर्स आणि इतर पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. सतत भूक न लागल्यामुळे तुम्ही चुकीचे पदार्थ खात नाही. वजन नियंत्रित ठेवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. वजन कमी करण्यासोबतच जांभूळ खाण्यामुळे तुमची पचनशक्तीदेखील सुधारते. जांभळात व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर अससते. ज्यामुळे तुमच्या पचनशक्तीला चालना मिळते.
मधुमेहींसाठी उत्तम –
जांभूळ मधुमेहींसाठी एक अतिशय उत्तम औषध आहे. जांभळामध्ये अनेक अॅंटि डायबेटिक गुणधर्म आढळतात. या गुणधर्मांमुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण राहते. जांभळाची फळे, बिया, पाने, साल अशा सर्वच गोष्टींचा वापर मधुमेही औषधाप्रमाणे करू शकतात. वर्षभर वापर करण्यासाठी जांभळाच्या बिया सुकवून त्याची पावडर पाण्यातून घेतल्यास चांगला लाभ होतो. हा एक आयुर्वेदिक उपचार असून यामुळे रक्तातील साखर नियंत्रित झाल्याचे अनेक संशोधनात आढळून आले आहे.
त्वचेसाठी फायदेशीर –
जांभळामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध होते, शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळाल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होतो. शिवाय जांभळामध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर असते जे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात नियमित जांभूळ खाण्यामुळे तुम्हाला त्वचेच्या समस्या कमी जाणवतात.
कॅन्सरचा धोका कमी होतो –
जांभूळ खाण्यामुळे फ्री रेडिकल्सपासून तुमच्या शरीराला असणारा कॅन्सरचा धोका कमी होतो. जांभूळ फळात बायोअॅक्टिव्ह फायटोकेमिकल्स असतात. सहाजिकच यामुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ होत नाही. ज्यांना केमोथेरपी सुरू आहे अशा लोकांना जांभळाचा रस पिण्ययाचा सल्ला दिला जातो. जांभळामध्ये असलेले पोषक गुणधर्म शरीरातील सर्व अवयवांवर चांगला परिणाम करतात आणि तुम्हाला कॅन्सरच्या धोक्यापासून दूर ठेवतात.
ह्रदयाच्या समस्या कमी होतात –
जांभळात भरपूर मिनरल्स आणि अॅंटि ऑक्सिडंट असतात. या गुणधर्मांमुळे तुम्हाला जांभूळ ह्रदयरोगांपासून दूर ठेवते. जांभळाचे नियमित सेवन केल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो ज्यामुळे ह्रदयविकार, हायपरटेंशन, स्ट्रोक अथवा इतर कार्डिओ वेस्कुलर विकार होण्याची शक्यता कमी होते. रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित जांभूळ खाणे फायद्याचे ठरते.
डोळ्यांसाठी वरदान –
जांभूळ तुमच्या डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरते. कारण जांभळामुळे तुमच्या शरीरातील डोळ्यांना कनेक्ट होणारे सर्व टिश्यूज आणि डोळ्यातील कॉर्निया निरोगी राहतो. ज्यांना दृष्टीबाबत समस्या आहेत अथवा कमी वयात चष्मा आहे अशा लोकांना नियमित जांभूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. जांभळाचा रस पिण्यामुळे तुमची दृष्टी पुन्हा चांगली होऊ शकते. यासाठी तुमच्या जीवनशैलीत उन्हाळ्यात जांभूळ खाण्याची सवय अॅड करा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
उन्हाळ्यात यासाठी खायलाच हवेत ताडगोळे
उन्हाळ्यात ही 5 फळं ठेवतील तुम्हाला ‘हायड्रेट’
काळी द्राक्षं खाण्याचे फायदे (Black Grapes Benefits In Marathi)