आपल्याकडे बाळाला आंघोळ घालण्याच्या आधी आवर्जून मालिश केली जाते. बाळाला झोपवण्यासाठी किंवा बाळाचे पोट गॅसेसमुळे फुगले असेल आणि दुखत असेल तर गॅसेस कमी होण्यासाठी हळुवारपणे मसाज करण्याने तुमच्या बाळाला आराम मिळतो आणि हे सामर्थ्य तुमच्या कोमल स्पर्शात आहे. बाळाची हाडे बळकट होण्यासाठी आणि गॅस होऊ नये म्हणून तसेच त्याला आराम मिळावा म्हणून बाळाला छानपैकी मालिश घराघरांत केली जाते. आपल्यासारख्या मोठ्या माणसांनाही जर हात, पाय, मान, खांदे, पाठ, कंबर आणि डोक्याला छान मसाज मिळाला तर आपणही छान रिलॅक्स होतो. असेच बाळांचे देखील आहे. तान्ह्या बाळाला मालिश करण्याचे फायदे आणि पद्धत माहिती असली पाहिजे जेणे करून बाळांना योग्य प्रकारे मालिश करता येऊ शकेल.
बाळांना मालिश का करावी

बाळांना मालिश करण्याचे महत्व खरं तर भारतीयांना वेगळे सांगण्याची गरज नाहीच. आपल्याकडे पिढ्यानुपिढ्या बाळांना मालिश केली जात आहे. लहान मुलांना हलक्या हाताने केलेला मसाज खूप आरामदायी आणि उपचारात्मक वाटतो. पंचेंद्रियांपैकी केवळ स्पर्शाचे ज्ञान नवजात बाळाला असते. बाकी काही कळत नसले तरी आईचा स्पर्श बाळाला बरोबर कळतो. त्यामुळेच लहान मुलांची निरोगी वाढ होण्यास मदत करण्यासाठी त्यांची मालिश केली जाते. बाळाला मालिश केल्यामुळे त्याच्या पोटातील त्रास आणि दात येताना होणारा त्रास कमी करण्यास मदत होते. तसेच त्याच्या स्नायूंच्या विकासास चालना देण्यास, जेव्हा तो गोंधळलेला असतो तेव्हा त्याला शांत करण्यास आणि त्याला रिलॅक्स होऊन झोपण्यासाठी देखील मालिशमुळे मदत होते. मसाज करताना बाळाचे अंग हळुवार चोळल्यामुळे आणि स्पर्श केल्यामुळे बाळाचे व आईचे बॉण्डिंग अधिक घट्ट होते.
बाळाची मालिश कशी करावी?
बाळांना मसाज करणे हा तुमच्या बाळासोबत आनंदी वेळ घालवण्याचा एक सुंदर मार्ग आहे. बाळांना मसाज करण्यासाठी नैसर्गिक बेबी ऑइल किंवा मॉइश्चरायझर्सचा वापर केला जाऊ शकतो. बाळाची त्वचा खूप नाजूक असते. त्यामुळे कुठलेही सुगंधी तेल बाळाच्या त्वचेवर लावू नये. बदामाचे तेल, खोबरेल तेल, जोजोबा ऑइल हे तुम्ही बाळाच्या मसाजसाठी वापरू शकता. पण चुकूनही शेंगदाण्याचे तेल, सोयाबीन तेल, टी ट्री ऑइल बाळाच्या मसाजसाठी वापरू नका. त्याने बाळाच्या नाजूक त्वचेला त्रास होऊ शकतो.
बाळाची मालिश करताना हळुवार स्ट्रोक द्या आणि बाळाच्या त्वचेवर आपली बोटे सहजतेने फिरवा. त्यानंतर, बाळाच्या हातांना व पायांना मसाज करा.मनगट, घोटा, गुढगा, कोपर आणि बोटांनाही हळुवार मसाज करा. बाळाला हळुवार पालथे झोपवून बाळाच्या पाठीला, कंबरेला आणि माकडहाडालाही हळुवार मालिश करा. आई-वडिलांच्या हातांचे सुखदायक स्ट्रोक बाळामध्ये ऑक्सिटोसिन हार्मोनचे उत्पादन वाढवू शकतात. मसाज करताना बाळाशी गप्पा मारा, त्याला गाणे म्हणून दाखवा. बाळांना आपण बोललेले फारसे काही कळत नसले तरी त्यांना आईवडिलांचा आवाज नक्की कळतो आणि आईचा आवाज ऐकून बाळाला सुरक्षित वाटते आणि ते अधिक अलर्ट होतात.
बाळाला मसाज केल्याचे संभाव्य फायदे

बाळाला नियमित मसाज केल्याचे अनेक फायदे होतात. नवजात बाळाला मालिश केल्याने बाळ शांत, आरामशीर राहण्यास, रडणे कमी होण्यास आणि बाळाला चांगली झोप लागण्यास मदत होते. तसेच मालिश केल्याने बाळाची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते आणि शारीरिक व मानसिक शक्ती वाढण्यास प्रोत्साहन मिळते. मसाज केल्याने बाळाच्या मेंदूत ऑक्सिटोसिन, प्रोलॅक्टिन आणि एंडोर्फिनसारखी संप्रेरके उत्तेजित होतात जे बाळाचा मूड सुधारतात. नियमित मसाज केल्यास बाळाच्या झोपेचा कालावधी सुधारतो आणि विश्रांतीची पातळी वाढते. मसाजमुळे बाळाच्या स्नायूंचा टोन सुधारतो आणि कडकपणा कमी होतो. बाळाच्या झोपेचे चक्र नियंत्रित होते.बाळाला पूर्ण अंगाला मालिश केल्याने आणि मसाजदरम्यान बाळाचे स्ट्रेचिंग करून घेतल्याने बाळाला पोटाचे त्रास कमी होतात. मालिश पचनसंस्थेचे टोनिंग करण्यास मदत करते व बाळाला गॅसचा त्रास कमी होतो.आई किंवा बाबांनी मसाज केल्यामुळे बाळाचा भावनिक ताण दूर होण्यास मदत होते.
म्हणून नियमितपणे व काळजीपूर्वक बाळाची मालिश करावी.
फोटो क्रेडिट- istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक