हास्य हे प्रत्येकालाच आवडतं. एका हास्याने तुम्ही मित्र बनवू शकता आणि तुमच्या हास्याने एखाद्या रडणाऱ्या व्यक्तीला हसवूही शकता. मराठी मनोरंजन विश्वात तर अशी अनेक व्यक्तीमत्त्वं (comedian marathi) आहेत. ज्यांनी मराठी प्रेक्षक रसिकांना अगदी खळखळू हसवलं आहे. विनोद आणि ते असं जणू समीरकरणच आपल्याकडे आहे. पण लक्षात घ्या कोणालाही हसवणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही. म्हणूनच जगभरात साजरा केला जातो जागतिक हास्य दिन. हा दिवस मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. याच दिनाच्या निमित्ताने POPxoMarathi तुम्हाला खास मराठीतील विनोदवीर (marathi comedian) आणि काही स्टँडअप कॉमेडियन्स यांची थोडक्यात ओळख या लेखात करून देत आहे. त्यांचे गाजलेले चित्रपट, पुस्तकं किंवा डायलॉग्ज्स याबद्दल तुम्हाला लेखात वाचायला मिळेल. मग पाहा तुमचा आवडता विनोदी अभिनेता यात आहे की नाही ते.
निखळ विनोद म्हणताच डोळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते पु ल देशपांडे म्हणजेच पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचं. ज्यांना भाई आणि पुलं म्हणूनही त्यांचे रसिक चाहते ओळखतात. महाराष्ट्राचं हास्यदैवत असं त्यांना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण अगदी आजच्या पिढीलाही त्यांचे विनोद आवडतात. पुलंचं व्यक्तिमत्त्व म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होय. कारण पु.ल हे फक्त विनोदी लेखकच नाहीतर त्यांनी शिक्षक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक आणि वक्ते अशा विविध भूमिका त्यांच्या कारकिर्दीत पार पाडल्या. पु.ल यांनी त्याकाळी एकपात्री-बहुपात्री नाटकंही केली. पु.ल देशपांडे यांनी मराठी भाषेला दिलेला साहित्याचा ठेवा हा अमूल्य आहे. त्यांचं लिखाण हे अगदी सहज आणि सरळ विनोद असणारं होतं. तसंच त्याचवेळी सामाजिक परिस्थितीबाबत टिचक्या देणारंही होतं. पु.ल यांनी मराठी रसिकांना दिलेली अनेक पात्रं अजरामर झाली आहेत. जसं अंतू बर्वा, सखाराम गटणे, परोपकारी गंपू. पु.लंच्या जीवनावर आधारित ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ हा दोन भागातला चित्रपट, हिंदी मालिका ‘नमुने’, तसंच त्यांच्या अनेक साहित्यकृतींवर नाटकं आणि चित्रपट आले. यावरूनच त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना येईल.
वाचा – Funny Jokes In Marathi For Friends
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव असणारे मराठी अभिनेते म्हणजे दादा कोंडके. अभिनय कमाल, कॉमेडी कमाल, गीतलेखक आणि लेखक अशा सर्व भूमिका त्यांनी पार पाडल्या. कष्टाळू आणि सिनेमाघरांमध्ये मनोरंजनासाठी येणाऱ्या प्रेक्षकांचं त्यांना भरभरून मनोरंजन केलं. त्यांचे सिनेमा तब्बल 25 आठवड्यांपेक्षा जास्त सिनेमागृहात चालत असतं. ज्यामुळे त्यांचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात आलं. मराठी चित्रपटांमध्ये कॉमेडीची एक वेगळी बाजू त्यांनी प्रेक्षकांना दाखवली. डबल मिनिंग कॉमेडी त्यांनी मराठी चित्रपटात आणली. यासाठी त्यांच्यावर भरपूर टिकाही झाली. परंतु तरीही त्यांच्या चित्रपटांना भरपूर पैसा मिळाला. तांबडी माती या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. चंदू जमादार, राम राम गंगाराम, राम राम आत्माराम, एकटा जीव सदाशिव, तुमचं आमचं जमलं, अंधेरी रात में दिया तेरे हाथ में हे त्यांचे गाजलेले चित्रपट. 1994 साली आलेला सासरचं धोतर हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता. विच्छा माझी पूरी करा हे त्यांचं नाटक खूप चाललं. 1975 साली आलेल्या पांडू हवालदार या चित्रपटातील त्यांची भूमिका इतकी लोकप्रिय झाली की, लोक आजही महाराष्ट्रातील हवालदारांना पांडू नावाने बोलावतात. त्यांची निर्मिती असलेला सोंगाड्या चित्रपट 1971 साली आला. त्यांचं स्वप्न महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होणं हे होतं पण ते अपूर्णचं राहिलं.
मी आलो.. मी पाहिलं.. मी लढलो.. मी जिंकून घेतलं सारं असं म्हणणारा ‘धडाकेबाज’ असं बिरूद लाभलेला मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. तब्बल 15 वर्ष त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. तसंच अनेक हिंदी चित्रपटातही काम केलं. धडाकेबाज हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सिनेमा तुफान चालला. काही नाटकांमध्ये अभिनय केल्यानंतर खरी संधी मिळाली ती पुरूषोत्तम बेर्डे यांच्या टूर टूर या नाटकात. मराठी चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एक पाठोपाठ एक रेकॉर्डब्रेक सिनेमा केले. ज्यामध्ये धूमधडाका, धडाकेबाज, थरथराट, अशी ही बनवाबनवी, हमाल दे धमाल यासारख्या चित्रपटांचा समावशे आहे. अशी ही बनवाबनवी चित्रपट तर आजच्या पिढीलाही आवडणारा चित्रपट आहे. बॉलीवूडमध्येही लक्ष्मीकांत यांनी खूप नाव कमावलं. मैंने प्यार किया, हम आपके है कौन, साजन, 100 डेज आणि बेटा सारख्या अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलं. नाट्यजगतातही शांतता कोर्ट चालू आहे आणि बिघडले स्वर्गाचे दार या नाटकांनी त्यांना खूप यश मिळवून दिलं.
मराठीत विनोद म्हटल्यावर लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डेंचे चित्रपट डोळ्यांसमोर येतात. ज्यामध्ये त्यांचा गाजलेला चित्रपट झपाटलेला, अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा, धडाकेबाज, अफलातून अशा एक से एक चित्रपटांचा समावेश आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत मामा म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. ज्यांना आत्तापर्यंत अभिनयासाठी पाच फिल्मफेअर अवॉर्ड्स, महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार पांडू हवालदार चित्रपटासाठी, सवाई हवालदारसाठी स्क्रीन अवॉर्ड तर भोजपुरी चित्रपट माईका बिटुआसाठी त्यांना पुरस्कार मिळाला आहे. अशोक सराफ यांना तब्बल 10 राज्य सरकारचे पुरस्कार मराठी चित्रपटासाठी तर बेस्ट कॉमेडिअन म्हणून महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हा पुरस्कार मिळाला आहे. 80 च्या दशकात अशोक यांनी अनेक मराठी चित्रपटात हिरोची भूमिका केली. त्यांच्या यशस्वी चित्रपटांमध्ये एक डाव भूताचा, धूम धडाका, गंमत जम्मत, अशी ही बनवाबनवी आणि वझीर चा समावेश आहे. तर हिंदी मालिकांमधील हम पांच ही त्यांची गाजलेली मालिका होती. बॉलीवूडमधील भूमिकांमध्येही करणअर्जुनमधील मुन्शीजी, येस बॉसमधील शाहरूखचा मित्र आणि सिंघममधील अजय देवगणसोबत हेड कॉन्स्टेबलची त्यांची भूमिका गाजली.
अशोक मामांचे अशी ही बनवाबनवीमधील अनेक डायलॉग्ज्स अगदी आजच्या पिढीलाही तोंडपाठ आहेत. त्यांच्या गाजलेल्या विनोदी सिनेमांमध्ये धूम धडाका, अशी ही बनवाबनवी, गंमत जंमत, बिनकामाचा नवरा, एकापेक्षा एक, फेकाफेकी, नवरा माझा नवसाचा यासारख्या चित्रपटांचा समावेश होतो.
मराठी रंगभूमीवरील सुपरस्टार अशी ओळख असलेलं व्यक्तीमत्त्व म्हणजे प्रशांत दामले. गेली 35 वर्ष ते मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम करत आहेत. मराठी रंगभूमीशी तर प्रशांत दामले यांचा 1983 पासूनचा संबंध आहे. आत्तापर्यंत त्यांनी 27 नाटकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. 35 वर्षांच्या या अभिनयाच्या प्रवासात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. प्रशांत दामले यांच्या नावावर 4 लिम्का बुक रेकॉर्ड्स आहेत. प्रशांत यानी 37 मराठी चित्रपट आणि 24 मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. प्रशांत यांच्या गेला माधव कुणीकडे या नाटकाचा 2013 साली तब्बल 10,700 वा प्रयोग पार पडला. जे नाटक गेली 15 वर्ष सुरू आहे. फक्त नाटक आणि चित्रपटच नाहीतर अगदी रेसिपी शोज आणि सूत्रसंचालनाचं कामही ते अगदी खुबीने करतात. त्यांचा आम्ही सारे खवय्ये आणि आज काय स्पेशल या पाककला कार्यक्रमांना भरपूर यश मिळालं.
प्रशांत दामले हे जरी आता रंगभूमीवर जास्त दिसत असले तरी त्यांचे गाजलेले विनोदी सिनेमाही आहेतच. ज्यामध्ये सवत माझी लाडकी, मुंबई पुणे मुंबई 2, चार दिवस प्रेमाचे, आत्मविश्वास, तू तिथे मी यासारख्या चित्रपटांचा समावेश होतो.
गलगले निघाले..हा डायलॉग प्रसिद्ध करणारा अभिनेता म्हणजे भरत जाधव. अभिनेता ते निर्माता असा प्रवास भरत जाधव यांनी आज मराठी चित्रपटसृष्टीत पूर्ण केला आहे. भरत यांच्या ऑल द बेस्ट नाटकाचे तब्बल 3000 प्रयोग झाले. त्यानंतर आलेलं सही रे सही हे नाटकंही भरपूर चाललं. तसंच जत्रा या चित्रपटातील कोंबडी पळाली हे गाणं तर सगळ्यांना माहीत आहेच. भरत जाधव यांच्या वेबसाईटवर मेन्शन केल्यानुसार त्यांनी आत्तापर्यंत 85 चित्रपट, 8 मालिका आणि नाटकाचे तब्बल 8500 प्रयोग केले आहेत. भरत यांनी आपल्या करिअरला 1985 साली आलेल्या महाराष्ट्राची लोकधार या कार्यक्रमापासून सुरूवात केली. अभिनेता म्हणून ओळख मिळाली ती श्रीमंत दामोदरपंत या नाटकाने.
भरत जाधव यांच्या गाजलेल्या नाटकांसोबतच अनेक गाजलेल्या चित्रपटांचाही समावेश आहे. ज्यामध्ये जत्रा, पछाडलेला, येड्यांची जत्रा, खो-खो, श्रीमंत दामोदरपंत, खबरदार यांचा समावेश आहे.
दोन दशकात मकरंद अनासपुरे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं असं स्थान बनवलं आहे. 1992 साली शुभ मंगल सावधान या चित्रपटातून त्यांनी डेब्यू केलं. डेब्यूपासूनच त्यांनी विनोदी बाजाच्या भूमिका केल्या. तसंच त्यांनी काही हिंदी चित्रपटातही भूमिका केल्या. ज्यामध्ये यशवंत, वास्तव, जिस देश में गंगा रहता है आणि वजूद यांचा समावेश आहे. चित्रपटांसोबतच त्यांनी मराठी मालिकांमध्येही काम केलं आहे. ज्यामध्ये बेधुंद मनाची लहर, तिसरा डोळा, शेजार, आमच्यासारखे आम्हीच आणि कॉमेडीची बुलेट ट्रेन यासारख्या रिएलिटी शोचा समावेश आहे. अभिनयासोबतच त्यांनी 2005 साली आलेल्या स्ट्रगलर चित्रपटाचे संवाद लिहीले होते. तर तुफान चालेल्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा आणि डँबीस या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं होतं. 2017 साली आलेल्या थँक्यू विठ्ठला या नाटकात त्यांनी महेश मांजरेकरांसोबत काम केलं आहे.
मकरंद यांच्या गाजलेल्या सिनेमांमध्ये नाना मामा, गाढवाचं लग्न, कायद्याचं बोला, असा मी तसा मी, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, रंगा पतंगा, उलाढाल यांचा समावेश होतो. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजराचे डायलॉग्ज्स तर अनेकांना तोंडपाठ आहेत.
मराठी चित्रपट आणि नाटक सृष्टीतील प्रसिद्ध नाव म्हणजे विजय पाटकर. त्यांनी मराठीसोबतच अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ज्यामध्ये तेजाब, अपना सपना मनी मनी, गोलमाल 3, तीस मार खान, डॅडी कूल, ऑल द बेस्ट : फन बिगीन्स आणि सिंघम सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आहेत. कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांची अभिनयाला सुरूवात केली. 1988 साली त्यांना एन चंद्रा यांचा तेजाब मिळाला. त्यांच्या विनोदावर चार्ली चॅप्लिनचा प्रभाव आहे. त्यांना एका जाहिरातीतील अभिनयासाठी आयफा अवॉर्डसुद्धा मिळालं होतं. तर हलकंफुलकं या नाटकासाठी मराठी नाट्य परिषदेचाही पुरस्कार मिळाला होता. 2006 साली त्यांनी एक उनाड दिवस या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली. तसं स्त्री भ्रूण हत्त्येवरील रिवायत या चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं. आत्तापर्यंत त्यांनी तब्बल 8 चित्रपटाचं दिग्दर्शन आणि तीन चित्रपटांची निर्मिती केली आहे.
विजय पाटकर यांच्या गाजलेल्या विनोदी सिनेमांमध्ये हिंदी आणि मराठी दोन्हींचा समावेश आहे. ज्यामध्ये तेजाब, सिंबा, सिंघम, गोलमाल अगेन, नवरा माझा नवसाचा ही नावं आहेत.
सिद्धार्थ रामचंद्र जाधव हा फक्त मराठीच नाहीतर हिंदीतही नाव कमावलेला विनोदी अभिनेता आहे. सिद्धार्थने मराठी मालिका, चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. ज्यामध्ये गोलमाल सीरिज आणि सिंबासारख्या यशस्वी चित्रटांचं नाव सामील आहे. सिद्धार्थचं पहिलं प्रेम हे मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक असल्याचं तो सांगतो. एवढंच नाहीतर सिद्धार्थने एका बंगाली चित्रपटातही अभिनय केला आहे. ज्याचं नाव होतं अमी सुभाष बोलची. धुरळा या मल्टीस्टारर चित्रपटातील त्याच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.
सिद्धार्थची मराठीतील एंट्रीच विनोदी नट म्हणून झाली असल्याने त्याचे अनेक विनोदी सिनेमे आहेत. ज्यामध्ये बकुळा नामदेव घोटाळे, धुरळा, दे धक्का, जत्रा, टाईम प्लीज, इरादा पक्का या सिनेमांचा समावेश होतो.
डॉ निलेश साबळे हे नाव मराठी विनोदविश्वात अजरामर झालं आहे ते चला हवा येऊ द्या या रिएलिटी शोमुळे. या शोने निलेश साबळे आणि त्यांच्या कलाकारांच्या टीमला घराघरात पोचवलं. योगायोगाने निलेश साबळेंचा डेब्यूसुद्धा रिएलिटी शो महाराष्ट्राचा सुपरस्टार यानेच झाला होता. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत नवरा माझा भवरा या चित्रपटातून निलेशने डेब्यू केलं. तसंच होम मिनिस्टर आणि फू बाई फू सारख्या रिएलिटी शोमध्येही काम केलं. आज मराठी टीव्ही जगतात नंबर एक वर असणाऱ्या शो चला हवा येऊ द्या चा भक्कम आधारस्तंभ म्हणून निलेश साबळे यांच्याकडे पाहिलं जातं. या शोच्या माध्यमातून त्यांनी मराठी सृष्टीला अनेक विनोदवीर दिले आणि मराठी माणसाची विनोदाची नस अगदी अचूक पकडली. या शोचं ते लिखाण आणि दिग्दर्शनही करतात.
भालचंद्र कदम म्हणजे भाऊ कदम हे मराठी विनोदी नाट्यविश्व आणि चित्रपटातील प्रसिद्ध नाव आहे. मुख्यतः त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी ते ओळखले जातात. त्यांनी 1991 साली करिअरला सुरूवात केली. तेव्हा ते नाटकात काम करत असतं. त्यानंतर फू बाई फू या शोने त्यांना ओळख मिळाली. भाऊंना त्यांच्या कॉमेडीतील टायमिंगसाठी ओळखलं जातं. निलेश साबळे यांच्यासोबतच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने तब्बल 400 भागांचा पल्ला गाठला आहे.
भारत गणेशपुरे हे महाराष्ट्रातील घराघरात पोचलेलं व्यक्तिमत्त्व आहे. ज्याचं श्रेय जातं ते चला हवा येऊ द्या या विनोदी शो ला. पण खरंतर अभिनेता म्हणून भारत गणेशपुरे यांनी हिंदी, कोकणी आणि अगदी बंगाली चित्रपटातही काम केलं आहे. 2001 साली आलेल्या तंबू में बांबू या चित्रपटातून डेब्यू केलं. त्यानंतर एक चालीस की लास्ट लोकल, अमी शुभाश बोलटी, डॉ प्रकाश बाबा आमटे, उंगली, शेगाविचा योगी गजानन, कापूस कोंड्याची गोष्ट, बराड अ बॅरन लँड ऑॉफ फर्टाईल ड्रीम्स आणि शूर आम्ही सरदार या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2017 साली आलेल्या परेश मोकाशीच्या चि व चिसौकां या चित्रपटात त्यांनी सूत्रधाराची भूमिका केली. पण त्यांना आज घराघरात पोचवलं आहे ते चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोने.
मराठी विनोद विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये आवर्जून नाव घेतलं जातं ते निर्मिती सावंत यांचं. निर्मिती यांनी खरंतर 1992 मध्ये अभिनयाला मराठी चित्रपट शुभमंगल सावधान मधून सुरूवात केली. त्यानंतर बिनधास्त या चित्रपटात त्यांना चांगला ब्रेक मिळाला. पण गंगूबाई नॉनमॅट्रीक या पंढरीनाथ कांबळेसोबतच्या विनोदी मालिकेने त्यांना जबरदस्त प्रसिद्धी मिळाली. तसंच जाऊ बाई जोरात या नाटकाने त्यांच्या करिअरला वेगळ्याच उंचीवर नेलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. आजवर त्यांनी अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. तसंच त्यांनी रिएलिटी शो फू बाई फूचं ही जजिंगही केलं होतं. अशोक सराफ यांच्यासोबतच त्यांचं व्हॅक्यूम क्लीनर हे नाटकही चालत आहे.
निर्मिती सावंत यांच्या गाजलेल्या विनोदी भूमिका या सिनेमा, नाटक आणि टीव्ही या तिन्ही माध्यमांतील आहेत. यामध्ये खबरदार, कुमारी गंगूबाई नॉनमॅट्रिक, चल धर पकड, सासू नंबरी, जावई दस नंबरी, जाऊ बाई जोरात, व्हॅक्यूम क्लीनर या चित्रपटांचा आणि नाटकांचा समावेश होतो.
युवापिढीतील सध्या सर्वात जास्त लोकप्रिय असलेलं आणि जगात भारी शब्दाला प्रसिद्धी देणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे सारंग साठ्ये. सारंगने मराठी विनोदी विश्वाला आलेली मरगळ झटकून भारतीय डिजीटल पार्टी म्हणजेच भाडिपाची स्थापना केली. तो स्वतः एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक आहे. त्याने केलेला पुणेरी जगात भारी हा स्टँडअप शोला तुफान व्ह्यूज मिळाले. भाडिपाच्या व्हिडिओजने मराठी युवा पिढीला खूप एंटरटेन केलं. तसंच मराठी विनोदवीरांना यामुळे हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. सारंगने अनेक उत्तम कलाकृती आणि उपक्रम भाडिपाच्या माध्यमताून केले.
हेही वाचा-
जागतिक हास्य दिन साजरा करा हे मराठी विनोदी चित्रपट पाहून
तुम्हालाही नक्की तोंडपाठ असतील हे मराठीतील प्रसिद्ध डायलॉग्ज्स
World Laughter Day: भन्नाट मराठी जोक्स ज्यांनी तुम्हाला खूप हसवले