बॉलीवूडचं यंग ब्रिगेड पंतप्रधान मोदींच्या भेटीला दिल्लीला गेलं होतं. बॉलीवूडमधील सध्याचे आघाडीचे चेहरे आणि तरूण अभिनेते आणि अभिनेत्रींनी पंतप्रधान मोदी यांची दिल्लीला जाऊन भेट घेतली. बॉलीवूडचा ‘सिम्बा’ रणवीर सिंग, रणबीर कपूर, आलिया भट, आयुषमान खुराणा, विकी कौशल, वरूण धवन, भूमी पेडणेकर, राजकुमार राव, दिग्दर्शक रोहित शेट्टी, करण जोहर, एकता कपूर मोठी टोळी एकाच वेळी दिल्लीला पंतप्रधान मोदींना भेटायला रवाना झाली होती. मात्र एकाच वेळी हे सर्व पंतप्रधान मोदी यांना नक्की का भेटायला गेले होते याचं कारण अद्यापही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यामुळे सध्या सर्वांनाच याचं कुतूहल आणि उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र सोशल मीडियावर सर्वांनी फोटो शेअर केल्यामुळे नक्की यामागचं काय कारण आहे याबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच बॉलीवूड शिष्टमंडळाने घेतली भेट
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींना मुंबई दौऱ्यावर असताना अक्षय कुमार, करण जोहर, सिद्धार्थ रॉय कपूर, अजय देवगण यासारखे कलाकार जाऊन भेटून आले होते. यावेळी बॉलीवूडमधील शिष्टमंडळाने मोदींशी चित्रपटक्षेत्रातील उद्योगासंबंधित चर्चा केली आणि चित्रपटांच्या तिकीटांवरील जीएसटी दर कमी करण्याची मागणीदेखील केली होती. या चर्चेनंतर जीएसटी दर कमीदेखील करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा खास दिल्लीमध्ये जाऊन इतक्या सर्व सेलिब्रिटींनी भेट घेण्याचं नक्की कारण काय आहे हे मात्र कळू शकलेलं नाही. पण तरीही यामागे नक्कीच काहीतरी खास कारण असण्याची शक्यता सध्या सगळीकडे वर्तवली जात आहे.
रणवीरची जादूची झप्पी
रणवीर सिंग जिथे जातो तिथे आपला वेगळेपणा दाखवून देतो. तो जसा आहे तसा वागतो. त्यामुळे आपल्यातलाच एक वाटतो. देशाच्या पंतप्रधानांना भेटायला गेल्यानंतर ‘जादूकी झप्पी, पंतप्रधान मोदींना भेटून आनंद झाला’ अशी कॅप्शन देत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. हा फोटो रणवीरने आपल्या इन्स्टावरून शेअर केला आहे. रणवीर नेहमीच ज्यांना भेटतो त्यांची गळाभेट घेताना दिसतो. मात्र देशाचे पंतप्रधान यांनादेखील रणवीर त्याच तऱ्हेने भेटलेला फोटोमध्ये दिसून येत आहे. इतर कलाकारांनी केवळ मोदींशी हातमिळवणी केली असता रणवीरने मात्र बिनधास्त त्यांना ‘जादू की झप्पी’ दिल्याचं दिसत आहे. रणवीर कधीही कोणत्याही गोष्टीत लाजताना दिसून येत नाही.
करण जोहरने आयोजित केली भेट
निर्माता – दिग्दर्शक करण जोहरने ही भेट घडवून आणल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय बऱ्याच अभिनेत्यांनी शेअर केलेल्या पोस्टमधूनही असंच चित्र स्पष्ट होत आहे. इतक्या वर्षात पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधानांनी एकाच वेळी इतक्या सर्व कलाकारांची भेट घेतल्याचं दिसून येत आहे. चित्रपट उद्योगातील शिष्टमंडळामध्ये अनेक कलाकार आणि दिग्दर्शक यांचा समावेश आहे. मागच्या भेटीदरम्यान कोणत्याही अभिनेत्री अथवा दिग्दर्शिकेचा समावेश नव्हता असा तक्रारीचा सूर होता. अर्थात चित्रपटसृष्टीतील कोणतीही महिला प्रतिनिधी त्यावेळी उपस्थित नव्हती. त्यावरून बऱ्याच जणांना सोशल मीडियावर ट्रोलदेखील करण्यात आलं होतं. मात्र यावेळी एकता कपूर, आलिया भट, भूमी पेडणेकर यांचाही पंतप्रधानांच्या भेटीमध्ये समावेश करण्यात आला होता. सध्याचे आघाडीचे कलाकार यादरम्यान एकत्र दिसून आले.
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम