Shiv Rajmudra In Marathi – निश्चयाचा महामेरू ! बहुत जनांसी आधारू !अखंड स्थितीचा निर्धारू ! श्रीमंत योगी !! छत्रपती शिवाजी महाराजांचे असे वर्णन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपले दैवतच आहेत. त्यांचे नुसते नाव जरी उच्चारले तरी संपूर्ण हिंदूंच्या व खास करून मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. त्यांनी रयतेसाठी घेतलेल्या कष्टांबद्दल वाचले, असंख्य मावळ्यांनी केलेले बलिदान आठवले की मराठी माणसाच्या डोळ्यांत पाणी आले नाही आणि हात जोडले गेले नाहीत तरच नवल! महाराजांचे संपूर्ण आयुष्यच एका दीपस्तंभाप्रमाणे आहे. त्यांचा जीवनपट इतका भव्य आहे की, तो शिकण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले तरीही ते कमीच पडेल. त्यांच्या जीवनाचे जितके अवलोकन करावे तितके कमीच आहे. त्यांचे सर्वच गुण हे कालातीत आहेत. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांची अर्थनीती, युद्धनीती, राजनीती व इतर असंख्य गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे काही ना काही अर्थ दडलेला होता. जसे की त्यांची राजमुद्रा!
हिंदुस्थानावर सतत झालेल्या परकीय मुस्लिम आक्रमणानंतर, बहुतांश राजांच्या राजमुद्रा या बहुतेक अरबी, पर्शियन किंवा उर्दू भाषांमध्ये बनविल्या गेल्या. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू साम्राज्याची, स्वराज्याची स्थापना केली, तेव्हा त्यांनी मात्र त्यांच्या राजमुद्रेसाठी (Shiv Rajmudra In Marathi) आपल्या देववाणी, गीर्वाणवाणी संस्कृतभाषेची निवड केली. महाराजांनी शेकडो वर्षांनंतर पहिल्यांदाच संस्कृत राजमुद्रा प्रचलित केली. म्हणून या राजमुद्रेचे विशेष महत्व आहे. या राजमुद्रेचा अर्थ (Rajmudra In Marathi) सर्व हिंदूंना ठाऊक असलाच पाहिजे. राजमुद्रेची माहिती (Rajmudra Chi Mahiti) तशी बऱ्याच ठिकाणी मिळेल पण ती ऐतिहासिक दस्तऐवजांप्रमाणे योग्यच असायला हवी. चला तर जाणून घेऊ राजमुद्रा अर्थ आणि राजमुद्रा माहिती.
अधिक वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांचे शेर, गर्जा महाराष्ट्र माझा
राजमुद्रा अर्थ – राजमुद्रा म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर ऑफिशियल स्टॅम्प होय. आज जसा प्रत्येक कंपनीचा, प्रत्येक ऑफिसचा स्टॅम्प असतो, तसाच पूर्वीही असायचा. आजही सिग्नीचर आणि स्टॅम्पला महत्व आहे. एखाद्या कामाच्या कागदपत्रांवर जर कंपनीचा स्टॅम्प नसेल तर ती कागदपत्रे खरी किंवा ग्राह्य धरली जात नाहीत. तसेच पूर्वीही होते.
राज्यकारभार चालवताना अनेक आदेश निघत. अनेक संदेश हाताखालच्या अधिकाऱ्यांना पाठवावे लागत. तसेच शेजारी राज्यातील, देशातील अधिकाऱ्यांनाही काही माहिती पत्रांद्वारे, खलित्यांद्वारे पोचवली जात असे. त्यावर मुद्रेची मोहर उमटवली जात असे. राजमुद्रा ही त्या त्या राजाची व राज्याची ओळख असे. आज जशी प्रत्येक देशाची वेगळी राजमुद्रा असते, तशीच त्याकाळी देखील होतीच. पण आपल्याला शिवमुद्रा (Shiv Rajmudra chi mahiti) महत्वाची, कारण ती आपल्या महाराजांची, स्वराज्याची राजमुद्रा आहे. हे स्वराज्य अत्यंत कष्टाने, शौर्याने, बलिदानाने प्रसंगी युक्तीने व मुत्सद्देगिरी करून महाराजांनी मिळवून दिले होते.
महाराज हे द्रष्टे होते, ते एक संघटक ,सेनापती, स्वातंत्र्ययोद्धे तसेच स्फुर्तिदाते देखील होते. ते युगपुरुष होते. महाराज हे पुण्यवंत तर होतेच शिवाय नीतीवंत देखील होते. रयतेचा स्वतःच्या अपत्याप्रमाणे सांभाळ करणारे गोब्राह्णणप्रतिपालक होते. कलियुगात असा राजा झाला नाही आणि होणारही नाही. ते श्रीमंत तर होतेच पण योगीही होते. त्यांच्या स्वभावात निग्रह होता. पण मोहाला त्यांच्या आयुष्यात कुठेही स्थान नव्हते. त्यांचा उत्साह एखाद्या बालकाला लाजवेल असा होता पण त्यांच्या स्वभावात चंचलता नव्हती. सर्वांसाठी त्यांच्या मनात ममता होती. पण दुष्टांना शासन केल्याशिवाय ते सोडत नसत. असे अष्टपैलू, मुत्सद्दी, अष्टावधानी, थोर सेनानी, धर्माभिमानी परंतु सहिष्णू, लोकहितदक्ष आणि चारित्र्यसंपन्न असे आपले छत्रपती शिवाजी महाराज होते. म्हणूनच त्यांचे मावळे त्यांच्या एका शब्दाखातर स्वराज्यासाठी हसत हसत प्राणांची आहुती देण्यासही मागेपुढे पाहत नव्हते. त्यांच्याच कष्टांमुळे, शौर्यामुळे भगवा टिकला व स्वराज्य निर्माण झाले. महाराष्ट्रात रामराज्य आले. धन्य धन्य ते शिवराय व धन्य धन्य त्या जिजाऊ! राजमाता जिजाबाई यांच्या रूपाने प्रत्यक्ष जगदंबाच प्रकट झाली, अशीच सर्वांची धारणा आहे. आपल्या या दैवतांबद्दल पुढच्या पिढीला देखील सांगितले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तके वाचली पाहिजेत, त्यांच्याबद्दल बोलले पाहिजे.
पुण्याच्या आसपास सह्याद्री डोंगररांगातून पूर्वेकडे अनेक लहान प्रवाह वाहतात. ह्यांनी वेढलेल्या अत्यंत ओबडधोबड दर्या सामान्यत: मावळ किंवा खोरे या नावाने ओळखल्या जातात. एकत्रितपणे ते मावळ प्रांत म्हणून ओळखले जात असे. या भागातील रहिवासी ज्यांना मावळे म्हणतात, ते अत्यंत कष्टाळू लोक होते. डोंगर-दऱ्यांनी भरलेल्या या प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे काम सुरू केले. स्वराज्याच्या पायाभरणीसाठी त्यांनी मावळ प्रदेशातील भौगोलिक वैशिष्ट्यांचा कुशलतेने उपयोग करून घेतला. त्यांनी लोकांच्या मनात विश्वास आणि आपुलकीची भावना निर्माण केली. त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात अनेक सहकारी, सोबती आणि मावळे त्यांच्यासोबत होते. स्वराज्याच्या स्थापनेतील शिवाजी महाराजांचे उद्दिष्ट त्यांच्या राजमुद्रेत स्पष्टपणे व्यक्त केले आहे. या मुद्रेद्वारे महाराजांनी आपल्या जनतेला ‘प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे सतत वाढत जाणारे, शहाजीपुत्र शिवाजीचे राज्य सदैव प्रजेच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहील’, अशी ग्वाही दिली आहे.
भारतातील परकीय आक्रमणानंतर बनवलेल्या राजमुद्रा बहुतेक अरबी, फारसी किंवा उर्दू भाषेत बनवल्या गेल्या होत्या. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यावर संस्कृतमध्ये राजमुद्रा तयार झाली. भारतात अनेक वर्षांनी प्रथमच संस्कृतभाषेत राजमुद्रा बनवली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि राजमुद्रावर कोरलेला संस्कृत श्लोक आणि त्या श्लोकाचा हिंदी, मराठी किंवा इंग्रजी भाषेतील अर्थ सर्वत्र सहज सापडतो. आणि तो अर्थ बहुतेक खरा आहे. परंतु अनेक ठिकाणी दिलेले अर्थ हे अतिशयोक्तीपूर्ण आहेत आणि ते अर्थ वाचल्यानंतर आपल्याला मूळ श्लोकाबद्दल काहीच समजत नाही.
वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तके
आपल्याला जी शिवाजी महाराजांची प्रचलित अष्टकोनी राजमुद्रा माहित आहे ती त्यांना त्यांच्या वडिलांनी म्हणजेच शहाजी महाराजांनी जेव्हा शिवाजी महाराज हे जिजाऊंसमवेत पुण्यात आले तेव्हा त्यांना दिली होती. त्यावेळी शिवरायांचे वय हे केवळ 12 वर्षांचे होते. मुघलसम्राट अकबराच्या काळापासून मुघलांना दक्षिणेत साम्राज्यविस्तार करायचा होता. मुघलांनी निजामशाहीतील राज्य जिंकण्यासाठी मोहीम सुरू केली. या मोहिमेत विजापूरच्या आदिलशहाने मुघलांशी युती केली. श्री शहाजी राजे यांनी निजामशाही वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु मुघल आणि आदिलशाही यांच्या एकत्रित सैन्यापुढे त्यांचे सैन्यबळ कमी पडले. निजामशाहीचा अंत झाला. त्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाचे सरदार झाले आणि त्यांची कर्नाटकात नियुक्ती झाली. पुणे, सुपे, इंदापूर आणि चाकण परगणा यांचा समावेश असलेला भीमा आणि नीरा नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश शहाजी राजे यांना जहागीर म्हणून देण्यात आला होता. शहाजीराजे यांना बंगळूरचीही जहागीर देण्यात आली होती.
जिजाऊसाहेब व शिवराय हे शिवराय बारा वर्षांचे होईपर्यंत बंगळूर येथे शहाजीराजांसोबत काही वर्षे राहिले. त्यानंतर शहाजीराजांनी पुण्याचा कारभार शिवराय आणि जिजाऊ यांच्याकडे सोपवला. हा राज्यकारभार चालवण्यासाठी शिवराय जिजाऊंसमवेत पुण्यास आले. इसवी सन 1630 मध्ये श्री शहाजी राजे यांनी जिजाऊसाहेब आणि शिवरायांसाठी लाल महालाची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज आपला पहिला किल्ला काबीज करेपर्यंत अनेक वर्षे येथे राहिले. शिवाजी महाराज जेव्हा बंगळुरूहून पुण्यात आले, त्यावेळी अष्टप्रधान मंडळ त्यांच्यासमवेत होते व त्यावेळी एक स्वतंत्र राजमुद्रा शहाजी महाराजांनी त्यांना दिली होती. शिवाजी महाराजांची गाणी आणि पोवाडे यातून देखील आपल्याला बरीच माहिती मिळते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंसह जेव्हा पुण्याचा कारभार हाती घेतला तेव्हा त्यांनी जी स्वतंत्र राजमुद्रा करवून घेतली ती खालीलप्रमाणे आहे.
“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।”
अन्वय- प्रतिपद्-चन्द्र-लेखा इव वर्धिष्णुः विश्ववन्दिता।
शाहसूनोः शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते॥
प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र असलेल्या शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी विराजमान आहे. किंवा प्रतिपदेच्या चंद्रा प्रमाणे वाढत जाणारी व विश्वात सर्वानी वंदलेली शहाजी पुत्र शिवाजी यांची ही मुद्रा सर्वांच्या कल्याणासाठी विलसत आहे.
शिवरायांसाठी त्यांची प्रजा म्हणजे त्यांचे अपत्य होते. त्यांच्या रयतेवर त्यांचे एखाद्या पित्याप्रमाणे प्रेम होते व पित्याच्या प्रेमानेच ते संपूर्ण प्रजेचा सांभाळ करीत असत. हिंदवी स्वराज्य हे रयतेचे राज्य आहे. या राज्यात लेकीसुना ,गायीवासरे , संतसज्जन सगळे मोकळा श्वास घेऊ शकतात.त्यांना धोका नाही तर ते सुखी व सुरक्षित राहू शकतील. शिवरायांनी हे हिंदवी स्वराज्य रयतेसाठी निर्माण केले आहे. त्यांच्या राज्यात मोगलाई नाही. निष्पापांवर अन्याय होणार नाही आणि तो कदापि सहन केला जाणार नाही. हे नीतीचे राज्य असेल. न्यायाचे राज्य असेल. जो अन्याय करेल त्याला कडक शासन होईल.
तसेच हे हिंदवी स्वराज्य आता सगळीकडे चंद्राप्रमाणे वाढत जाईल. व या मुद्रेचा लौकिक संपूर्ण जगात पसरेल. शिवरायांच्या या स्वराज्यात प्रजेचे कल्याण हेच मुख्य उद्दिष्ट्य असेल असाच काहीसा संदेश राजमुद्रेतून मिळतो. राजमुद्रा म्हणते – मुद्रा भद्राय राजते. म्हणजेच ही राजमुद्रा लोककल्याणाची आहे. ही त्याकाळी अतिशय क्रांतिकारी कल्पना होती. कारण तो काळ असा होता जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणचे सुलतान प्रजेवर अत्याचार करत असत. राजाचे राज्य हे प्रजेच्या कल्याणासाठी असावे अशी कल्पना इतर कोणीही केली नाही. म्हणून ही राजमुद्रा एकमेवाद्वितीय आहे.
शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अर्थ काय ते आपण पाहिले. ही राजमुद्रा खूप काही सांगून जाते. एक गोष्ट म्हणजे राजमुद्रा संस्कृत भाषेत आहे. म्हणजेच शिवाजी महाराज हे संस्कृतप्रेमी होते, हे या गोष्टीवरून सिद्ध होते. हिंदवी स्वराज्य स्थापन करताना त्यांची दूरदृष्टी किती होती हे यावरून आपल्याला दिसून येते. हिंदुस्थानावर परकीय आक्रमणे झाली त्यानंतर आपल्या संस्कृत भाषेचे महत्व कमी झाले. जनसामान्यांपर्यंत तर संस्कृतभाषा पोचत देखील नव्हती. आपली वेद -पुराणे, उपनिषदे, सर्व धर्मग्रंथ, महाकाव्ये ही संस्कृत भाषेतच आहेत. तरीही परकीय आक्रमणानंतर उर्दू व फारसी भाषा जास्त प्रचलित होऊ लागली. लोक आपली संस्कृतभाषा, गीर्वाणवाणी विसरून जाऊ लागले. स्वराज्य स्थापन करताना आपल्या मूळ भाषेचे, आपल्या सनातन धर्माची ओळख असलेल्या संस्कृतभाषेचे जतन करण्यासाठीच दूरदृष्टीने शिवरायांनी राजमुद्रा संस्कृतभाषेत बनवून घेतली असावी असाच अंदाज आपण लावू शकतो. तसेच यातून परकीयांना देखील संदेश जातो की कितीही आक्रमणे झाली तरीही आमचा धर्म, आमची संस्कृती, आमची मूळ भाषा कोणीही संपवू शकत नाही. ती हजारो वर्षांपासून टिकून आहे आणि शिवरायांच्या राज्यात तर तिला कुणीही धक्का लावू शकत नाही असा एक संदेश शिवरायांनी राजमुद्रेसाठी संस्कृतभाषेची निवड करून संपूर्ण जगाला दिला असे आपण म्हणू शकतो.
शिवरायांच्या राजमुद्रेत त्यांच्या नावापुढे आधी त्यांच्या वडिलांचे नाव आहे. शाहसूनोः शिवस्य म्हणजे शहाजीचा मुलगा शिवाजी असा त्याचा अर्थ होतो. राज्यकारभाराच्या जबाबदारीमुळे शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच वडिलांपासून लांब राहावे लागले. त्यामुळे त्यांना वडिलांचा प्रत्यक्ष सहवास जास्त काळ लाभू शकला नाही. जरी पत्रांतून ख्यालीखुशाली कळत असली तरीही त्यांना वडिलांचे प्रेम प्रत्यक्ष असे फारसे अनुभवता आले नाही. पण तरीही त्यांचे त्यांच्या पित्यावर निरातिशय प्रेम होते व आऊसाहेबांप्रमाणेच ते वडिलांनाही परमेश्वराच्या जागीच मानत असत. त्यांच्या मनातील वडिलांविषयीचे प्रेम व आदर राजमुद्रेत दिसून येतो. हे जिजाऊसाहेबांचे प्रेम व संस्कार व त्यांनी दिलेली शिकवण आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही संस्कृत भाषेत आहे.
शिवरायांची राजमुद्रा ही देवनागरी लिपीत लिहिलेली आहे.
शककर्ते शिवराय या ग्रंथात दिल्यानुसार ही मुद्रा शके १५६१ प्रमाथी नाम संवत्सराचे अश्विन शु. ८ च्या पत्रात उपलब्ध आहे. परंतु यात अनेक मतांतरे असू शकतात.
राजमुद्रेच्या लेखकाबद्दल दस्तऐवज उपलब्ध नाहीत. अष्टप्रधान मंडळापैकीच कोणीतरी राजमुद्रा लिहिली असावी असे तज्ज्ञांचे मत आहे.
शककर्ते शिवराय या ग्रंथात दिल्यानुसार ही मुद्रा इसवी सन १५६१ मध्ये तयार झाली असावी.
**वरील माहिती ही उपलब्ध ऐतिहासिक दस्तऐवज, पुस्तके व ऑनलाईन स्रोतांच्या आधारे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.तरी इतिहास तज्ज्ञांना यात काही चूक आढळल्यास कृपया योग्य माहिती सांगावी जेणे करून आम्हाला यात योग्य बदल करता येतील. जय भवानी जय शिवाजी!
हेही वाचा :