‘मन झालं बाजिंद’ ही नवीकोरी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रदर्शित होण्याआधीच या मालिकेची चर्चा सध्या सर्वत्र होतेय. आधीच मालिकेच्या शीर्षकाचा अर्थ न समजल्यामुळे या मालिकेबद्दल प्रेक्षकांना खूप उत्सुकता लागली होती. आता आणखी एक विषय मालिकेची उत्कंठा वाढवणारा ठरतोय. या मालिकेचे भन्नाट प्रोमोज आणि त्यातील रांगडा नायक आणि सुंदर नायिका यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्री श्वेता राजन या मालिकेत मुख्य भूमिका साकारतेय. या मालिकेविषयी आणि तिच्या भूमिकेविषयी तिने चाहत्यांशी संवाद साधला. आश्चर्य म्हणजे तिच्या मते या मालिकेत प्रेमाचा रंग चक्क पिवळा आहे. जाणून घेऊया या मालिकेविषयी आणखी बरंच काही…
बाजिंद म्हणजे काय ?
माझ्या मते बाजिंद म्हणजे निर्भीड. बाजिंद म्हणजे तो जो न घाबरता आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करतो.मी या मालिकेत कृष्णा हि व्यक्तिरेखा साकारतेय. कृष्णाचे आई वडील नाही आहेत, ती लहानाची मोठी मामा मामींकडे झाली आहे. तिच्या मामा मामींनी तिला अगदी फुलासारखं जपलंय. कृष्णावरचं प्रेम कमी होऊ नये म्हणून मामा मामींनी स्वतःच मूल देखील होऊ दिलं नाही, तिची सगळी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मामा मामी झटत आहेत. कृष्णाला देखील परिस्थितीची जाणीव आहे. ती खूप समंजस आणि जबाबदार आहे. तिचं सीए बनायचं स्वप्न आहे. जरी परिस्थिती नसली तरी हि ती खूप मोठी स्वप्नं बघतेय. तिला खूप उच्च शिक्षण घ्यायचंय आणि मामा मामींवर असलेलं गरिबीचं ओझं तिला दूर करायचं आहे आणि त्यासाठी तिचे प्रयत्न चालू आहेत.
मालिकेत प्रेमाचा रंग पिवळा आहे याचा अर्थ काय ?
आपण आजवर कायम पाहत आलो आहे कि प्रेमाचा रंग हा गुलाबी असतो. पण या मालिकेत प्रेमाचा रंग पिवळा आहे. पिवळा या हा रंग बुद्धीचं, मांगल्याचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये पिवळ्या रंगाच्या हळदीला खूप मान असतो. या मालिकेतील नायक राया याचा हळदीचा कारखाना आहे. त्याच्या कामाचा पसारा खूप मोठा आहे आणि राया स्वभावाने देखील प्रेमाची उधळण करणारा आहे. तो खऱ्या अर्थाने बाजिंद आहे. तसेच मामा मामींकडे राहणारी कृष्णा हि संयमी आणि विचार करून वागणारी आहे. या दोघांची एक प्रेम कहाणी बेधुंद बेभान अशी आहे.
या मालिकेसाठी तुझी निवड कशी झाली?
मी कृष्णाच्या व्यक्तिरेखेसाठी ऑडिशन दिलं आणि त्यानंतर माझी या मालिकेसाठी निवड झाली. सगळेजण या मालिकेसाठी खूपच उत्सुक आहेत याचा मला खूप आनंद आहे. प्रोमोज रिलीज झाल्यापासून आम्हाला खूप सारे मेसेजेस सोशल मीडियाद्वारे येत आहेत. सगळ्यांना प्रोमो आणि त्यातील बॅकग्राउंड म्युजिक देखील खूप आवडतंय त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष मालिकेकडे लागलं आहे.
मालिका प्रेक्षकांनी का पाहावी?
मी या मालिकेतून प्रेक्षकांना भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि मला खात्री आहे कि प्रेक्षकांना देखील कृष्णा आणि रायाची हि बेभान प्रेमकहाणी नक्की आवडेल.
नव्या हाथी मोर खण साडीतील सोनालीच्या लुकने चाहते घायाळ
रितेश देशमुखचा डिजिटल डेब्यू, प्रदर्शित झाला फर्स्ट लुक
‘इंडियन आयडल’फेम सायली कांबळेचे ‘कोल्हापूर डायरीज’ द्वारे सिनेसृष्टीत पदार्पण