Advertisement

Travel in India

जुनी परंपरा टिकवूनही आधुनिकता जपणारे ‘दादर’

Dipali NaphadeDipali Naphade  |  Sep 16, 2020
जुनी परंपरा टिकवूनही आधुनिकता जपणारे ‘दादर’

Advertisement

मुंबई म्हटली की बऱ्याचदा अगदी मुंबईबाहेरील लोकांना पण सर्वात पहिल्यांदा डोळ्यासमोर जर कोणतं स्थळ दिसत असेल तर ते म्हणजे ‘दादर’. दादर हे मुंबईतील खरं तर मध्यवर्ती केंद्र नेहमीच मानलं गेलं आहे. आपण अशाच काही ठिकाणांबद्दल आता काही सिरीजमधून जाणून घेणार आहोत आणि त्यातील पहिलं ठिकाण आहे ते म्हणजे दादर. दादरला उतरल्यानंतर नक्की काय काय पाहायचं आणि तिथून काय घ्यायचं किंवा तिथली वैशिष्ट्य काय आहेत ते आपण जाणून घेऊया.

आपली जुनी परंपरा टिकवून ठेऊन आधुनिकता जपणारं दादर. अजूनही बरीचशी लोकं आहेत जी दादर सोडून कुठेही दुसरीकडे राहायला जायचं नावही काढत नाहीत. अगदी जुन्या इमारती असोत अथवा अगदी पूर्वपरंपरा जपणाऱ्या इमारती असतो. दादर पूर्व आणि दादर पश्चिम या दोन्ही भागांची वैशिष्ट्य आहेत आणि त्यामुळेच दादर म्हटलं की मुंबई असं एक समीकरणच झालं आहे.

दादर मार्केट

Instagram

दादरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दादरचे मार्केट. दादर पश्चिमेला स्टेशनच्या बाहेर अगदी पाऊल टाकल्यापासून सुरू होणारे हे सर्वात मोठे मार्केट आहे. इथले फुल मार्केट असो वा चप्पल मार्केट असो अथवा रस्त्यांवरील फॅशन मार्केट असो. इथे खरेदी करायला गेल्यानंतर वेळ कसा निघून गेला याबद्दल एकदाही जाणीव होत नाही. अगदी पाय दुखायची वेळ येते पण हे मार्केट बघून संपत नाही. हा मार्केट परिसर नेहमीच गजबजलेला असतो आणि हेच याचे मोठे वैशिष्ट्य आहे. 

वस्तूंचे माहेरघर

अशी कोणतीही गोष्ट नाही जी दादरमध्ये तुम्ही खरेदी करू शकत नाही. वस्तूंचे माहेरघर असा जर शब्द दादरसाठी वापरला तर तो नक्कीच वावगा ठरणार नाही. अगदी केसांच्या पिनांपासून ते पायातल्या वेगवेगळ्या फॅशनेबल चप्पलपर्यंत, साडीपासून ते अगदी शॉर्ट स्कर्टपर्यंत, ओढण्यांपासून ते अगदी लेगिन्सपर्यंत, कानातल्यापासून ते नेलपॉलिशपर्यंत सगळ्या फॅशनचे माहेरघर अगदी इतकंच नाही तर लहान मुलांच्या खेळण्यापासून ते घरातील सर्व वस्तूंपर्यंतची सर्व दुकाने दादरमध्ये सापडतील. अगदी शॉपिंग मॉलमध्ये मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे सापडतात आणि मुळात इथेही तुम्हाला शॉपिंग मॉल सापडतीलच.

दादरला उतरल्यानंतर कोणतीही वस्तू मिळाली नाही असं कधीच होणार नाही. अगदी हक्काने बरेचदा चाकरमानीदेखील दादर स्टेशनला उतरून वस्तूंची खरेदी करून पुन्हा ट्रेन पकडून घरी गेल्याचे अनेक अनुभव सगळ्यांना ऐकायला मिळत असतील. कोणताही नवा आलेला वाटसरूदेखील एकदा तरी दादर गाठणारच. दादर पूर्वेला असणारे स्ट्रीटवरील मार्केट असो अथवा दादर पश्चिमेला सुविधाच्या गल्लीतील मार्केट असो दोन्हीकडे जाऊन भाव केल्याशिवाय वस्तू विकत घेतल्याचा आनंद हा अवर्णनीय आहे. हुज्जत घालून घेतलेल्या वस्तूंची मजाच काही और असते. तर इथे आलेल्या बऱ्याच जणांना दादरमध्ये जागा असावी असं वाटल्याशिवाय राहात नाही. 

खाण्याची रेलचेल

Instagram

दादर म्हटलं की डोळ्यासमोर खाण्याची अगदी पूर्वपरंपरागत असणारी काही हॉटेल्स आणि दुकानं ही येतातच. त्यादिवशी दादर परिसर पूर्ण होतच नाही. तर शॉपिंग करून झाल्यानंतर भूक लागतेच. मग अशावेळी अनेक पर्याय तुम्हाला दादरमध्ये उपलब्ध आहेत. श्रीकृष्ण वडापाव असो अथवा प्रकाशकडचे पियुष असो, पणशीकरकडचे पेढे असोत अथवा आस्वादमधील मिसळ पाव असो, याचा आस्वाद घेतल्याशिवाय दादरवरून निघणे शक्यच नाही. दादर इतके मोठे आहे की,  तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला खाण्याची तदात लागू देणार नाही. तुम्ही कुठेही जा कधीच उपाशी राहणार नाही. कारण तुम्हाला अगदी पावलापावलावर खाण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतील. इथे आल्यानंतर तुमचं प्रत्येक गोष्टीत समाधान होईल यात अजिबात शंका नाही. 

शिवाजी पार्कचा कट्टा

Instagram

दादर म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो शिवाजी पार्क आणि तिथला कट्टा. या कट्ट्यावर बसून किती जण मोठे झाले आहेत. आजही महाविद्यालय आणि शाळांमधील मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सर्वच जण या कट्ट्यावर बसून मनातील कितीतरी सुखदुःख एकमेकांबरोबर वाटून घेत असतात. इतकंच नाही तर अगदी प्रेमात बुडालेल्या जोडप्यांचेही शिवाजी पार्क साक्षीदार आहे. मुळात इथल्या मैदानात खेळून मोठा झालेला सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांना कधीही विसरता येणार नाही. अशा थोर व्यक्तींच्या घडण्यात शिवाजी पार्कचाही मोठा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. आज तुम्ही एखादे सामान्य माणूस असाल पण इथेच स्वप्न पाहत नक्की उद्याचे स्टार असाल!

मुंबईत आवर्जून भेट द्यायला हवी अशा फॅशन स्ट्रीट्स (Fashion Streets In Mumbai)

परंपरा आणि आधुनिकता जपणाऱ्या इमारतींचा मेळ

Instagram

दादरचं वैशिष्ट्य म्हणजे इथे अनेक उंचउंच इमारती निर्माण झाल्या आहेत. मात्र आजही अनेक इमारतींनी आपला वारसा जपून ठेवला आहे. इथे अनेक नव्या आणि जुन्या इमारती आहेत. त्यापैकी हिंदू कॉलनी, पारसी कॉलनी पाहिल्यानंतर आजही मन भारावून जाते. गोंगाटाच्या या शहरात अशी शांतता असणाऱ्या इमारती मन प्रसन्न करून जातात. इथे आल्यानंतर आजही प्रत्येकाच्या मनात एकदा तरी येतं की, आपण नशीबवान असतो आणि आपल्याला अशा घरात राहायला मिळालं असतं. पण तरीही या ठिकाणी गेल्यानंतर मन आपोआपच शांत आणि प्रसन्न होतं. हा वारसा इथे राहणाऱ्या लोकांनी अजूनही जपून ठेवला आहे. तर इथल्या काही ठिकाणी असणाऱ्या चाळींचा वारसाही तसाच जपला आहे. इथे मध्यमवर्गीय संस्कृतीही जपून ठेवण्यात त्यांना यश मिळालं आहे. तसंच डॉ. बाबासाहेबांचा वारसा जपलेली चैत्यभूमी हीदेखील दादरची शान आहे. 

नवरात्रीसाठी मुंबईत कुठे करता येईल मनसोक्त शॉपिंग

नारळी बाग आणि दादर चौपाटी

Instagram

हा तर सगळ्यांचा कुतूहलाचा आणि आवडीचा विषय. दादर चौपाटीला कोणी गेलं नाही असं होणारच नाही. त्यातही नारळी बाग तर बऱ्याचदा आपल्याला प्रेमी युगुलांनी फुललेली दिसून येते. नेहमीच गजबजलेला हा परिसर तरीही इथे जाऊ नये असं कधीच वाटत नाही. कायम माणसांनी फुललेले हे परिसर हवेहवेसे वाटतात. 

सुट्टी संपतेय.. मुंबईतील या ठिकाणी करा स्वस्त आणि मस्त शाळेची खरेदी

कबुतरखाना

Instagram

तर आजही या ठिकाणी कबुतरांसाठी असलेले खास ठिकाण आहे ते म्हणजे कबुतरखाना. इथे अनेक माणसं येऊन कबुतरांना खाणं देऊन जातात आणि दिवसभर तुम्हाला या ठिकाणी कबुतरांचा जथ्था बसलेला दिसून येतो. 

दादर हे नेहमीच मुंबईसाठी अभिमानास्पद ठिकाण राहिले आहे. कोणताही सण असो अथवा नसो दादर रिकामं कधीही दिसणार नाही हे मात्र नक्की. अशाचा अजून एका मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणाची माहिती आणि वैशिष्ट्य तुम्हाला पुढच्या लेखात नक्की वाचायला मिळेल. तुम्हाला आमचा हा लेख कसा वाटतो आहे हे मात्र आम्हाला कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक