आलिया भटच्या आगामी चित्रपटांविषयी सर्वच चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. कारण आलिया भट सध्या गरोदर आहे. त्यामुळे आलिया आणि रणबीर कपूरच्या बाळाच्या जन्माआधी आलिया ज्या चित्रपटात काम करत आहे ते सर्वांसाठी खास असणार आहेत. नुकताच तिच्या डार्लिंग्स चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट खास असण्याचं आणखी एक कारण म्हणजे आलिया या चित्रपटाची निर्माती सुद्धा आहे. चित्रपटाचं पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक वाट पाहत होते. मात्र या ट्रेलरला अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कथानक आणि आलियाची भूमिका दोन्हीही नेहमीपेक्षा नक्कीच वेगळं आहे.
कधी प्रदर्शित होणार डार्लिंग्स
डार्लिंग्स चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आलिया भट धाकड अंदाजमध्ये प्रेक्षकांसमोर येते. आलियाने स्वतः चित्रपटाचं ट्रेलर तिच्या इन्स्टा अकाउंटवरून शेअर केलं असून तिने शेअर केलं आहे की, निर्माती म्हणून हा माझा पहिला चित्रपट आहे. मी खूप उत्साही, नर्व्हस आणि भावनिक झाली आहे. डार्लिंग्सचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात आलियासह शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मैथ्यूज यांच्या मुख्य भूमिका आहेत. 5 ऑगस्टला डार्लिंग्स नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.
काय आहे कथानक
डार्लिंग्स चित्रपटात आलियाचे नाव बदरुनिसा असून तिचं वेगळंच रूप ट्रेलरमध्ये दिसत आहे. आलिया तिचा पती हमजा (विजय शर्मा) ला किडनॅप केल्याची तक्रार तिची आई शेफालीसह पोलिस स्टेशनमध्ये नोंदवताना दिसत आहे. जसं जसं कथानक पुढे जातं तस तसं प्रेक्षकांच्या लक्षात येतं की हमजाला याच दोघींनी किडनॅप केलं आहे. याच्यासाठी त्यांनी जुल्फी नावाच्या व्यक्तीची मदत घेतली आहे. डार्लिंग्स चित्रपट एक डार्क कॉमेडी असून मुंबईतील एका आई आणि मुलीच्या जीवनावर आधारीत आहे. सहाजिकच या चित्रपटातून आलिया भटचं एक वेगळंच रूप प्रेक्षकांना दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करत असल्यामुळे हा चित्रपट तिच्यासाठी नक्कीच खास आहे.