मधुमेहामुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. मधुमेहासारखा आजार हा स्त्रीच्या आरोग्याच्या प्रत्येक पैलूवर परिणाम करू शकतो. मधुमेह हा आजार हृदय, मूत्रपिंड, गर्भधारणा आणि वंध्यत्वाच्या समस्या निर्माण करून स्त्रीच्या एकूण आरोग्यावर परिणाम करू शकते. नियमितपणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे, सक्रिय राहणे आणि संतुलित आहार घेणे तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करू शकते. मधुमेह हा आजार गंभीर असून याची वेळीच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः महिलांनी. कारण आपल्या कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष करण्याची महिलांची जास्त पद्धत असते.
जेव्हा एखाद्याच्या रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त होते तेव्हा मधुमेह होतो. मधुमेह असलेल्या स्त्रियांमध्ये योनीतून स्त्राव, योनीमार्गाला खाज सुटणे, वेदना होणे, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS), सेक्स ड्राइव्ह कमी होणे आणि वारंवार लघवी होणे यांसारखी लक्षणे दिसतात. मधुमेहामुळे स्त्रीला गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यता वाढते ज्याचे वेळेवर व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
काय आहेत गंभीर समस्या
पुण्यातील मदरहूड हॉस्पिटलच्या स्त्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ डॉ. राजेश्वरी पवार यांनी सांगितले की, मधुमेहामुळे स्त्री ला हृदयविकाराचा धोका वाढतो ज्यामध्ये गुंतागुंत वाढून हृदयविकाराचा झटका येतो. स्त्रियांना अंधत्व, मूत्रपिंडाचा आजार आणि नैराश्य यासारखी गंभीर गुंतागुंतदेखील दिसू शकते. मधुमेह असलेल्या महिलांना मूत्रमार्गात संक्रमण (यूटीआय) आणि योनीतून यीस्ट संसर्ग होऊ शकतो, मासिक पाळीत बदल झाल्यामुळे मासिक पाळी जास्त स्राव व वेदना होऊ शकतात. मधुमेहामुळे कमी सेक्स ड्राइव्ह, मज्जातंतूंचे नुकसान, रजोनिवृत्तीच्या समस्या, इन्सुलिनच्या प्रतिकारामुळे पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) मुळे वंध्यत्व होऊ शकते आणि गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तातील साखरेची पातळी देखील गर्भधारणेदरम्यानचा मधुमेह म्हणून ओळखला जातो यामुळे अकाली प्रसूती, गर्भपात होऊ शकतो तसेच बाळांमध्ये जन्मजात दोष देखील आढळून येऊ शकतात.
मासिक पाळीच्या अनियमततेशी संबंधित
पुण्यातील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी क्लिनीकच्या वंधत्व निवारण तज्ज्ञ डॉ. निशा पानसरे सांगतात, टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेह दोन्ही मासिक पाळीच्या अनियमिततेशी आणि कमी प्रजनन दराशी संबंधित आहेत. हल्लीच्या बैठ्या जीवनशैलीमुळे तरुण स्त्रियांनाही त्यांच्या प्रजनन काळात मधुमेह झाल्याचे निदान झाले आहे. मधुमेही स्त्रियांमध्ये फेलोपियन ट्यूब सारख्या पुनरुत्पादक अवयवांना संसर्ग होऊन त्याचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. रक्तातील ग्लुकोजच्या उच्च पातळीमुळे गर्भपात किंवा गर्भात जन्मजात दोष निर्माण होतात. त्यामुळे मधुमेही रूग्णांसाठी नाश्ताही महत्त्वाचा असतो. रक्तातील वाढत्या ग्लुकोज पातळीमुळे तसे वाढत्या गर्भासाठी जास्त पोषणामुळे मॅक्रोसोमिया (बिग बेबी सिंड्रोम) होऊ शकतो. थकवा, नैराश्य, ताणतणाव आणि चिंता यांमुळे, मधुमेह असलेल्या अनेक स्त्रियांची लैंगिक इच्छा कमी असते. योनीतून स्नेहन कमी झाल्यामुळे, स्त्रियांना संभोग करताना वेदना आणि अस्वस्थता जाणवू शकते.”
प्रत्येक स्त्री ने संतुलित जीवनशैलीला चिकटून राहणे अत्यावश्यक आहे. फायबरयुक्त आहार आणि ताजी फळे, भाज्या, तृणधान्य, शेंगा आणि मसूर यांचा समावेश असलेले अन्न खा. जंक फूड, तेलकट, प्रक्रिया केलेले आणि हवाबंद डब्यातील पदार्थ कमी करा.शर्करायुक्त पेय, मिठाई, शीतपेयाचे सेवन टाळा. तसेच, मीठाचे सेवन कमी करा. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि इष्टतम वजन राखण्यासाठी दररोज व्यायाम करा आणि दररोज रक्तातील साखरेची पातळी तपासा. अनियंत्रित मधुमेहामुळे उच्च विकृती आणि मृत्यू दर होऊ शकतो. म्हणून, वेळीच काळजी घ्या आणि निरोगी जीवन जगा असेही डॉ पवार यांनी स्पष्ट केले.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक