पार्लरमध्ये गेल्यानंतर हल्ली अगदी हॉटेलप्रमाणे मेन्यू कार्डच असते. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या ब्युटी ट्रिटमेंट पार्लरमध्ये असतात की, त्या सगळ्या गोष्टी माहीत करुन घ्यायला तुम्हाला थोडा वेळ तरी नक्कीच लागेल.पार्लरमध्ये जास्त करुन आयब्रोज, वॅक्सिंग केले जाते. तुम्ही वॅक्सिंग करायला गेलात तरी तुम्हाला कोणते वॅक्स करायचे असा प्रश्न विचारला जातो. आता वेगवेगळ्या वॅक्स काय फायदे आणि कोणी कोणते वॅक्स करायला हवे ते जाणून घेऊया.
रिका वॅक्स (Rica Wax)
हल्ली सगळ्याच पार्लरमध्ये वॅक्सचा हा नवा प्रकार पाहायला मिळतो. या वॅक्सला वितळवण्यासाठी एक वेगळी मशीन वापरली जाते. इतर वॅक्सप्रमाणे हे वॅक्स दिसत नाही. रिका वॅक्स हे नॅचरल वॅक्स असून या वॅक्सचे मूळ इटली आहे. तुम्हाला ingrown केसांचा त्रास असेल तर तुम्ही हे वॅक्स निवडायला काहीच हरकत नाही. हे वॅक्स करताना दुखत नाही. म्हणून हल्ली या वॅक्सची चलती असते. हे वॅक्स वापरताना ते आधी वितळवले जाते.लाकडी चमच्याच्या वापर करुन ते तुमच्या केस असलेल्या भागाला लावले जाते. हे वॅक्स वाळवून कोणत्याही पट्टीचा वापर न करता. सुकलेले वॅक्स ओढून काढले जाते.
चेहरा, बिकिनी, बॅक अशा भागांसाठी आवर्जून वापरला जातो. इतर वॅक्स प्रमाणे हे वॅक्स पाण्याने निघत नाही. तर ते काढण्यासाठी विशिष्ट तेलाचा वापर केला जातो. ते वापरल्यानंतरच हे वॅक्स निघते. जर तुम्हाला घरी हे वॅक्स वापरायचे असेल तर ते वापरणे सोपे नाही. त्यासाठी तुम्हाली थोडी तरी त्याची माहिती करुन घेणे गरजेचे असते. बाजारात या वॅक्सचे लहान लहान ग्रॅन्युअल्स मिळतात.
*या वॅक्स बद्दल आणखी विशेष सांगायचे झाले तर इतर वॅक्सिंगपेक्षा ते महाग असते.
अॅलोवेरा वॅक्स (Aloe Vera Wax)
जर तुमची त्वचा कोरडी किंवा सेन्सिटीव्ह असेल तर तुम्ही अॅलोवेरा वॅक्सची निवड करायला हवी, हे वॅक्स इतर साध्या वॅक्सप्रमाणे दिसते. पण याचा रंग अॅलोवेरा असल्यामुळे पुसट हिरवा असतो. या वॅक्सचा वापर केल्यानंतर तुम्हाला तुमची त्वचा एकदम छान मुलायम लागते. तुमच्या त्वचेला आवश्यक असलेला ओलावा मिळतो. हे वॅक्सही रिका वॅक्सप्रमाणे थोडे जड असते. म्हणून वॅक्स झाल्यानंतर ते त्वचेवरुन काढण्यासाठी पाणी आणि ऑलिव्ह ऑईल किवा एखादे तेल एकत्र केले जाते आणि ते तुमच्या त्वचेवर स्प्रे केले जाते.
चॉकलेट वॅक्स (Chocolate Wax)
जर तुमची त्वचा टॅन झाली असेल तर तुम्ही चॉकलेट निवडायला हवे. तुमच्या त्वचेवरील टॅन काढण्यासाठी हे वॅक्स एकदम परफेक्ट आहे. शिवाय तुमच्या त्वचेला ग्लो आणण्यासाठी देखील हे वॅक्स खूपच चांगले आहे. आता चॉकलेट वॅक्स हे रिकामध्ये सुद्धा मिळते आणि साध्या वॅक्समध्ये देखील हे वॅक्स उपलब्ध आहे. तुम्ही या दोघांपैकी कोणतेही वॅक्स केले तरी चालू शकते.
साधे वॅक्स करताना वॅक्स काढण्यासाठी पट्टीचा वापर केला जातो. आता या वॅक्सबाबतची सगळ्यात चांगली गोष्ट अशी की, या वॅक्सचा वापर केल्यानंतर तुम्हाला लगेच केस येत नाही. साधारण 6 आठवडे तरी तुम्हाला वॅक्सिंगची काळजी करावी लागत नाही. जर तुम्हाला सतत पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग करण्याचा कंटाळा असेल तर तुम्ही हे वॅक्स वापरु शकता.
* आता केसांची वाढ ही वेगवेगळी असू शकते. पण चांगले चॉकलेट वॅक्स केले तर तुमचे केस लगेच वाढत नाहीत.
स्ट्रॉबेरी वॅक्स ( Strawberry Wax)
फ्लेवर्ड वॅक्सचा हा एक प्रकार आहे. अनेक ठिकाणी हे वॅक्स आजही वापरले जाते. स्ट्रॉबेरीमध्ये असलेले व्हिटॅमिन C तुमच्या त्वचेला मुलायम आणि चांगले ठेवते. त्यामुळे तुम्ही स्ट्रॉबेरी वॅक्स देखील करु शकता. या वॅक्सची किंमत ही इतर हनी वॅक्स इतकीच असते. त्यामुळे तुम्हाला जर अगदी साधे वॅक्स करायचे असेल तर तुम्ही या वॅक्सची निवड करु शकता.
हनी वॅक्स ( Honey Wax)
बेसिक वॅक्सचा हा प्रकार जो अगदी सगळीकडे मिळतो. वापरायला अगदी सोपा असा हा वॅक्सचा प्रकार आहे. अगदी कोणत्याही त्वचेसाठी हे वॅक्स चालू शकते. हनी वॅक्स घरी देखील बनवता येते. त्यामुळे खूप जण असा प्रकारचे वॅक्स घरी देखील बनवतात. या प्रकारच्या वॅक्सचा तसा फार कोणाला त्रास होत नाही. जर तुम्ही पहिल्यांदा वॅक्स करणार असाल तर तुम्ही हे अगदी बेसिक वॅक्स करुन पाहा.