पावसाळा अनेक आजार घेऊन येतो. या दिवसात पावसात भिजणे, थंड पाणी पिणे किंवा थंडाव्यामुळे सर्दी होणे हे अगदी स्वाभाविक असते. बाहेर मस्त वातावरण असताना अशी सर्दी झालेली असेल तर अगदी नकोसे होऊन जाते. अशा पावसाळी सर्दीपासून सुटका मिळवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय नक्कीच कामी येतील. सर्दीसाठी घरगुती उपाय अनेक जण करत असतील. पण हे काही असे उपाय आहेत. जे तुम्हाला या सर्दीच्या दिवसात पटकन आराम देतील. शिवाय तोंडाची चवही घालवणार नाहीत.
कांद्याचा रस
पांढऱ्या कांद्याचा रस हा देखील सर्दीसाठी खूपच चांगला मानला जातो. यासाठी तुम्हाला पांढरा कांदा हवा. एका भांड्यात पाणी गरम करुन त्यामध्ये तुम्हाला कांद्याचे उभे काप घालायचे आहेत. त्यासोबत त्यामध्ये काळा गुळ घालून तो चांगला उकळून घ्यायचा आहे. कांदा चांगला पारदर्शक झाला म्हणजे तुमचा रस हा तयार झाला असे समजून जा. याला कांद्याचा काढा असे देखील म्हटले जाते. पण हा काढा गोड लागतो. त्यात थोड्यासा कांद्याचा अर्क असतो. त्यामुळे कांद्याची चव येते. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तो गरम किंवा थंड दोन ते तीन वेळा प्या. तुम्हाला नक्कीच आराम मिळण्यास मदत मिळेल.
कच्चा कांदा आणि गुळ
कच्चा कांदा हा देखील सर्दीवर फारच परिणामकारक असा आहे. तुम्हाला कच्चा कांदा घेऊन तो तसाच करा करा चावून खायचा आहे. कांद्याचा घास आणि त्यानंतर गुळाचा घास घ्यायचा आहे. यासाठी पांढरा कांदा खाल तर तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. त्यामुळे शक्यतो पांढरा कांदा असेल तर फारच उत्तम. कांदा खाल्ल्यामुळे तुम्हाला थोडेसे डोळ्यात पाणी आल्यासारखे होईल किंवा तिखट लागेल पण त्यामुळे तुमची सर्दी बरी होण्यास मदत मिळेल.
आलेपाक
आल्यापासून तयार करण्यात आलेला आलेपाक हा देखील सर्दीसाठी खूपच जास्त चांगला असतो. घरी आले आणून ते किसून त्यामध्ये जर गुळ घालून शिजवले तर घरगुती आलेपाक तयार होतो. आल्याची ही वडी थोडी तिखट लागेल. पण त्यामुळे चोंदलेले नाक मोकळे होण्यास मदत मिळेल. सर्दी जितकी वाहून जाईल तितकी चांगली असते.त्यामुळे हा उपाय तुम्ही अगदी नक्की करुन पाहायला हवा.
लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर उपाय
सुंठपावडर आणि गुळ
जर तुम्हाला आलेपाक करण्याइतका वेळ नसेल तर तुम्हाला सुंठवडा घेऊन देखील त्याचे सेवन करणे फायद्याचे ठरु शकते. त्यासाठी तुम्ही एका भांड्यात सुंठपावडर आणि थोडीशी साखर किंवा गुळाची पावडर घेऊन ती एकत्र करायची आहे. त्यानंतर ही तयार पूड एक चमचा खाऊन त्यावर गरम पाणी प्यायचे आहे. त्यामुळेही सर्दी कमी होण्यास मदत मिळेल.
मीठाचे पाणी
सर्दीसाठी किंवा खोकल्यासाठी मीठाचे पाणी हे औषधासारखे काम करते. यासाठी तुम्हाला एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यामध्ये मीठ घालायचे आहे. या पाण्याचा गुळण्या केल्यामुळे घशाची खवखव कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळेही सर्दी बरी होण्यास मदत मिळते. जर घशाला कोरड पडली असेल तर ती देखील बरी होण्यास मदत मिळते. त्यामुळे वरील कोणताही पर्याय करायचा नसेल तर तुम्ही मीठाच्या पाण्याचा उपाय करु शकता.
आता पावसाळ्यात सर्दीवर हे घरगुती उपाय करायला अजिबात विसरु नका.